कढईतल्या गरम गरम तेलामध्ये जीरे, मोहरी, हिंग आणि हळद टाकलं. जिरे-मोहरी तडतडण्याचा आवाज आला. मग त्यात कढीपत्ता, चिरलेली मिरची टाकली. इतक्यात श्रेयाची आई आतमध्ये आली.
''अगं, मुलाकडची मंडळी आलीत. कांदेपोहे राहू दे. अगोदर चहा कर.''
''थांब गं आई... गोंधळ नको घालूस... गॅसवर दुसऱ्या बाजूला ठेवलाय मी चहा.'' श्रेया आईवर चिडतच म्हणाली.
''बरं... पोहे धुतलेस ना व्यवस्थीत? बाजूला हो आता, मी परतवते पोहे... तू तयारी कर जा लवकर आणि हो, त्या मेघाताईंच्या मुलीच्या शेजारणीच्या घरी बारशाला जाताना जो ड्रेस घातला होतास ना! तो ड्रेस घाल... सकाळी जो ड्रेस मला दाखवलेलास त्याचे हात बरोबर नाहीत... जा चल लवकर... बाई गं... चहा पण उकळला बघ... जा ना तू... अजून इथेच का उभी?'' स्वयंपाकघराचा ताबा घेत आई श्रेयाला बजावत होती.
आज श्रेयाचा बघण्याचा कार्यक्रम होता. श्रेयाचे बाबा सकाळीच बाजारात जाऊन आले होते. बाजारातून काय आणायचं या सगळया गोष्टी तेच एकटे बघत असत. श्रेयाच्या आईला त्यांनी कधीही कसलीही धावपळ करु दिली नव्हती. श्रेया एकटीच असल्याने ते तिची खुप काळजी घेत असत. आज तिचा बघण्याचा कार्यक्रम म्हणजे तिच्या आयुष्याताला सर्वात महत्त्वाचा क्षण, या क्षणामध्ये त्यांना कसलीही कमतरता ठेवायची नव्हती. बाजारातून त्यांनी काही गोडधोड आणि आमरस आणला होता. शेजारच्या सोनावणे काकूदेखील श्रेयाच्या आईला मदत करायला आल्या होत्या.
''काय गं सुलभा ? श्रेया कुठे आहे ? बाहेर पाहुणे आलेत बघ...''
''बघ ना... अभिजीत आणि त्याच्या घरची मंडळी आलीत आणि इकडे बघते तर ती अजून स्वयंपाकघरातच होती, जरा कप दे मला तिकडून... धुवून दे...''
सोनावणे काकूू कप धुवू लागतात. ''मग? आता कुठे गेली ती?''
''तयार होतेय... चहा ओततेस का? नको... मीच ओतते... तू जा आणि बघ तिला काही मदत हवी आहे का तिथे...''
''हो... आणि हे घे... मंगेश सांगत होता लिंबू पाहिजेत म्हणून...'' लिंबू देत सोनावणे काकू लगेचच श्रेयाच्या खोलीमध्ये जातात.
YOU ARE READING
Punha Navyane Suruvaat
Science Fictionएक अशी कथा, जिथे सर्व काही संपतं आणि सर्वांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. ही सुरुवात नव्या जगाची आहे, नव्या जगण्याची आहे, जगण्याची नाही तर नव्याने जगवण्याची आहे, नव्याने घर शोधण्याची आहे, गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कमावण्याची आहे...