प्रकरण 6

482 3 0
                                    

सकाळी लवकरच अभिजीतची संपूर्ण टीम आणि अमेरिकन नौसेनेतील अधिकारी मेजर रॉजर्ड लेक्चर रुममध्ये उपस्थित असतात. आपल्या टीममधील सर्वांना पाहून अभिजीतला बरं वाटतं. तो मेजर रॉजर्ड यांची त्याच्या टीमसोबत ओळख करुन देतो. अभिजीतच्या टीममध्ये पाणबुडी चालवणारा कप्तान ब्रुस, रडार ऑपरेटर मोहम्मद, बाहेरील जगासोबत सांकेतीक भाषेमध्ये संपर्क करणारा त्सेन्ग चू, मरीन इंजिनियर जेन, सॅटेलाईट सांभाळणारी बार्बरा, संशोधन करणारे अभिजीत, स्टिफन आणि त्यांचा सहाय्यक अल्बर्ट अशा नऊ जणांची ही टीम असते. अभिजीतच्या टीममध्ये प्रत्येकाने जीवविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, भूविज्ञान, इलेक्ट्रॉनीय, चित्रकला या सगळ्या विषयांचं ज्ञान संपादित केलं होतं. एखादी व्यक्ती उपलब्ध नसेल तर दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीचं काम करु शकते इतकी अभिजीतने आपल्या टीममध्ये लवचिकता आणलेली होती. 'इंटरनॅशनल काउन्सिल फॉर द एक्स्प्लोरेशन ऑफ द सी' मध्ये हे सर्वजण एकत्रच रुजू झाले होते. तेव्हापासून म्हणजे पाच वर्षांपूर्वीपासून ते सर्वजण एकत्र काम करत होते.

अभिजीत, ''मित्रांनो, आज आपण एका मोठ्या आणि गंभीर मोहिमेसाठी इथे एकत्र आलो आहोत. आपण ज्या मोहिमेसाठी जाणार आहोत तिथून पुन्हा येण्याची शक्यता शुन्याच्या बरोबरीची आहे. जर आपल्यापैकी कुणाला या मोहिमेमध्ये यायचं नसेल तर त्याने आत्ताच तसं सांगावं. न येण्याचं कारण देखील मी समजू शकतो, प्रत्येकाला आपला आणि आपल्या कुटूंबाचा विचार करण्याचं पुर्ण स्वातंत्र आहे.'' कोणीही हात वर करत नाही. अभिजीत पुढे बोलू लागतो, ''पुन्हा विचार करा. नंतर कुणालाही ही मोहिम अर्ध्यावर सोडता येणार नाही.'' तरीही कोणी काही बोलत नाही.

बार्बरा, ''आपल्याला आता काय करावं लागेल?''

अभिजीतला तिची उत्सुकता पाहून बरं वाटतं. मेजर रॉजर्ड आणि टीममधील प्रत्येक जण मोहिमेवर जाण्यासाठी उत्सुक असतो.

अभिजीत, ''आपण संपूर्ण मोहिम महासागराच्या आतमधून करणार आहोत, यासाठी अमेरिकी नौसेना आपल्याला पाणबुडी देणार आहे... पाणबुडीची माहिती आपल्याला असली तरी आपला संपूर्ण प्रवास हा महासागरामधूनच होणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला महासागर म्हणजे काय, या संकल्पनेची माहिती पुन्हा एकदा घ्यावी लागेल... इथे प्रत्येकजन त्याबाबत ज्ञानी आहे याची मला पूर्ण कल्पना आहे... तरीही मला कोणत्याही बाबतीत धोका पत्कारायचा नाहीये... यासाठी आपल्यामध्ये सर्वात कमी ज्ञान असलेल्या अल्बर्टला मी काल महासागराविषयी माहिती घ्यायला सांगितली... मेजर रॉजर्ड यांनादेखील महासागराविषयी महत्त्वपूर्ण माहिती आहे, तरीही पुन्हा एकदा उजळणी करणं आपल्यासाठी महत्त्वाचं नसलं तरी गरजेचं आहे... अल्बर्ट आता आपल्याला महासागराविषयीची माहिती देईल आणि आपण ती व्यवस्थितपणे ऐकू म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित माहिती मिळाली असं मी समजेन... तर अल्बर्ट...!!''

Punha Navyane SuruvaatWhere stories live. Discover now