प्रकरण 19

196 1 0
                                    

जहाजाच्या रडारवर देखील पाणबूडी दिसत होती. काही सैनिक मोठ्या दुर्बिणीमधून पाणबूडीचा अंदाज घेतात. ते जहाज ब्राझिलचं असतं. जहाजाचे कप्तान थॉमस पाणबूडीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, मोहम्मद त्यांना ताबडतोब प्रतिसाद देतो. कप्तान थॉमस त्यांना जहाजावर येण्याचं निमंत्रण देतात. पाणबूडी जहाजाच्या जवळ पोहोचल्यावर पाण्याच्या वर येते. अभिजीत आणि मेजर रॉजर्ड पाणबूडीबाहेर येऊन सैनिकांना पाण्यात दोर सोडायला सांगतात. सैनिकांनी आधीच तशी तयारी केलेली असते. ते जहाजामधून दोरखंड आणि त्यालाच लागून असलेली एक शिडी पाण्यात सोडतात. इतक्यात त्या सैनिकांजवळ दोन लहान मुली येतात. खाली कोण आहे हे त्या डोकावून बघतात तर, त्यांचे वडील मेजर रॉजर्ड त्यांना दिसतात. वडील जिवंत आणि सुखरुप असल्याचं पाहून त्यांना अत्यानंद होतो आणि त्या मोठ्याने ओरडू लागतात.

''डॅडा... डॅडा...''

ओळखीचा आवाज ऐकू आल्याने मेजर रॉजर्ड वर बघतात, त्यांना त्यांच्या मुली जहाजावर सुखरुप असल्याच्या दिसतात. मुलींना पाहून ते देखील भलतेच खुश होतात. ते देखील मोठ्याने ओरडू लागतात.

''प्रेस्ता... जिनिया... मी सुखरुप आहे... बघा मी तुमच्यासमोर उभा आहे... आता मी कायम तुमच्यासोबतच राहणार आहे... लव यु माय एंजल्स...''

मेजर रॉजर्ड यांना कधी आपण आपल्या मुलींना भेटतोय आणि त्या दोघींना कडेवर घेऊन त्यांचे मुके घेतोय, असं झालं होतं. सैनिकांनी पाणबूडीपर्यंत सोडलेली शीडी आणि दोरखंड पकडून मेजर रॉजर्ड आणि अभिजीत सर्वांना जहाजावर जायला सांगतात. मोहम्मद, जेन, स्टिफन आणि ब्रुस एकेक करुन वर जातात. बार्बरा आतमधून काही पेपर्स घेऊन येते. ते पेपर घेऊन तिला वर जाता येत नाही, अभिजीत ते पेपर्स आपल्या हातात घेतो आणि तिला वर जायला सांगतो. बार्बरा, तिच्या पाठोपाठ अभिजीत आणि मेजर रॉजर्ड सर्वात शेवटी असे ते तिघे जहाजावर जाऊ लागतात. मेजर रॉजर्ड वर येत असताना सतत आपल्या मुलींकडेच बघत असतात. मुलीदेखील त्यांची वर येण्याची वाट पाहत असतात. वर जात असताना अचानक बार्बराचा तोल जाऊन पाय घसरतो आणि बार्बरा 30 फूट उंचीवरुन पाण्यात पडते. अभिजीतच्या हातात पेपर्स असल्याने तो तिला पकडू शकला नाही वा पाण्यात उडी मारु शकला नाही. पण मेजर रॉजर्ड यांनी लगेच पाण्यात उडी मारली. अभिजीत तसाच मध्ये थांबून राहीला. जहाजावरुन सैनिकांनी ओरडून त्याला वर यायला सांगितलं तेव्हा तो जहाजावर पोहोचला. पेपर्स एका सैनिकाकडे देऊन तो खाली पाहू लागला. पोहता येत असून देखील बार्बराला हातपाय हलवता येत नव्हते. मेजर रॉजर्ड पोहत तिच्यापर्यंत पोहोचतात आणि तिला पकडून पाण्याबाहेर काढतात. दोघेही सुखरुप दिसल्याने अभिजीतच्या जीवात जीव येतो. तो थोडा बाजूला होतो तोच मेजर रॉजर्ड यांच्या मुली आरडाओरड करु लागतात. अभिजीत लगेचच खाली बघतो. शार्क मास्यांनी त्या दोघांवर हल्ला केलेला असतो. काहीच करता येत नव्हतं, उशीर झाला होता. तीन शार्क मासे तिथे आले होते. त्यांनी त्या दोघांच्या शरीराचे तुकडे केले होते. जहाजाखालच्या पाण्याचा थोडा भाग त्यांच्या रक्ताने लाल रंगाचा झाला होता.

Punha Navyane SuruvaatWhere stories live. Discover now