माझा मुलगा लहान होता पण वऱ्हाडेंची एक कन्या आणि एक मुलगा थोडे मोठे होते. त्यामुळे आम्ही ठरवलेल्या ट्रीपला मुलांना नेने आम्हाला काही प्रशस्त वाटले नाही. तेव्हा एकदाच ओव्हरनाईट ट्रिप करावी आणि परत यावे असे ठरले. तोवर आमचा मुलगा माझ्या भावाच्या घरी आणि त्यांची मुले त्यांचे आईवडील सांभाळतील असे ठरले. कारण ज्या गोष्टी आमच्या चौघांच्याही मनात हुरहूर घालत होत्या त्यांच्या समाधानासाठी आम्हाला इतर जबाबदारी त्यावेळेला नको होती. कोकणात जायचा आमचा प्लॅन फिक्स झालाच होता. फक्त हा बदल मी सुचवला. जो चौघांनाही बरोबरच वाटला. थोड्या मोकळया जबाबदारी विरहित वातावरणात मन स्वस्थ राहते आणि सकारात्मक निर्णय घेते.
एकाच गाडीतून आम्ही चौघेही आक्षी गावाकडे निघालो. कोकणातले हे गाव मी निवडले कारण ते अतिशय छोटे आणि निवांत आहे. शिवाय. आम्हाला प्रवास कमी हवा होता. सुट्टीच्या दिवशी न जात आम्ही हटकून गुरुवार शुक्रवार निवडला जेणेकरून गर्दी कमी राहील. शिवाय मी एक स्वतंत्र २ बेडरूमचा बंगला निवडला. ज्याच्या आऊट हाऊस मध्ये केअर टेकर राहात होता.ज जो खाण्यापिण्याची व्यवस्था पाहणार होता. आम्ही चौघांनीही सुट्ट्या टाकल्या होत्या. सकाळी सातलाच आम्ही निघालो. गाडी एका फूडमार्ट जवळ सकाळच्या नाश्त्यासाठी थांबवली. थंडी होती. चारू आणि मी शेजारी बसलो होतो. तिच्या समोर संगीता आणि माझ्यासमोर वऱ्हाडे होते. इकडच्या तिकडच्या जुजबी गप्पा चालल्या होत्या.
संगीता फार काही विषय काढून बोलत नव्हती. पण मी मुद्दाम तिला बोलते करण्यासाठी मुद्दाम तिचा अभिप्राय घेण्याचा प्रयत्न करत होतो. चारूने एकदोन वेळा मला टोचलेही. पण मला ताकाला जाऊन भांडे लपवायला आवडत नाही असेच वागायला आवडते हा स्वभाव तिला माहित होता. शेवटी नाश्ता उरकल्यावर आम्ही गाडी जवळ आलो. त्या दोघी बाथरूमला गेल्या होत्या. फूडमार्ट पर्यंत मी गाडी चालवत आणली होती. तेव्हा आता वर्हाडेना गाडीची चावी देत. मी डोळा मारला आणि मागचे दार उघडून. मी मागे बसलो. त्या दोघी बोलत आल्या. चारूने दार उघडले आणि मला मागे बसलेला पाहून ती चमकली.