चर्मसुखाची प्राप्ती करून प्रसाद आणि नयना गाढ झोपले होते. वातावरणात शांतता होती. वादळ येण्याच्या पूर्वी जी शांतता असते ना ती शांतता ! पहाट होत आलेली प्रसादला बाहेरच्या पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. त्याने उठून कपडे घातले. नयनाच्या नग्न अंगावर जवळच तिची असलेली साडी पसरवून प्रसादने तिथून काढता पाय घेतला.
असेच काही क्षण गेले अन् नयनाच्या मोबाईलची रिंग वाजली. झोपेतून जागी होत तिने मोबाईल स्क्रीन पाहिली. अनोळख्या नंबरवरून कॉल आलेला. तिने तो कॉल अनिच्छेनेच उचलला. तिकडून त्या अनोळखी व्यक्तीने जे सांगितले ते ऐकून मात्र नयनाला भोवळच येऊ लागली. क्षणभर तिला काही सुचले नाही. पंकज ज्या कॅब ने घरी येत होता त्या कॅबचा नॅशनल हायवेवर अपघात झालेला. पहाटेच्या धुक्यांनी घात केलेला.आनंदाने भरून निघालेल्या त्या घरात क्षणार्धात सुतकी शोककळा पसरली. पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित, तरुण उद्योजक गेल्याने थोड्याच वेळात त्यांच्या घरी लोकांचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागले. आक्रोश आणि विलापाने वातावरण खूपच भेसूर वाटू लागलेले. नयना तर शून्यात पोहोचलेली. ज्या माणसाच्या सुखासाठी तिने आपल्या आब्रुशी तडजोड केलेली आज तोच माणूस ते सुख भोगण्याच्या वेळीच निघून गेलेला.
ह्या सर्व गोंगाटाला चिरत अँबुलन्सच्या साईरनचा तो कर्कश आवाज जवळ येऊ लागला. पंकजला घेऊन अँबुलन्स येत होती. जमलेल्या लोकांची चलबिचल सुरू झाली. अँबुलन्स जवळ येताच रडण्याचा आवाज आणखीन वाढला. पंकजचे प्रेत बाहेर काढताच एकच तो आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ठरला.
घराच्या दिवाणखान्यात तो अचेतन देह ठेवण्यात आला. आतापर्यंत नयनाने थोपवून धरलेला अश्रूंचा बांध पंकजचे ते कलेवार पाहताच फुटला. एक अस्पष्टशी किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली. नयनाला आता केलेल्या कुकर्माची शरम वाटू लागलेली. पण आता वेळ निघून गेलेली. तिच्या हक्काचे माणूस आता जग सोडून गेलेलं. नयनाच्या पुढील आयुष्याचा आधार तिच्या पोटात वाढत असलेला तो जीव होता.