गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. नेहा हा नवखा प्रदेश सारं काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहळत होती. इन्स्पेक्टर चारूशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. केतकी मात्र शून्यात नजर हरवुन बसली होती.
"चल, उतर गाडीतून. " दरडावण्याने ती भानावर आली. निमूटपणे उतरून ती नेहा शेजारी थांबली. नेहाने तिचा हात आपल्या हातात घट्ट दाबुन धरला. आणि डोळ्यात विश्वासाने पाहिले. तेवढ्यात दोघीना हाताला धरून जवळजवळ ओढतच चौकीत नेले गेले.
इन्स्पेक्टर चारूशीला मोरे चोकीत शिरताच आतमध्ये एकच धावाधावा सुरु झाली. कोणी आपला टेबल आवरे तर कोणी आपला युनिफॉर्म नीट करे. एका महिला पोलीसने तर चक्क गजऱ्याची पुडी पट्टदिशी मुठीत दाबत ड्रॉवरमध्ये फिरकावली. कोपऱ्यातली दोघांची मिसळ पावाच्या दोन भरल्या डिश लपवताना बरीच धांदल उडाली. कदाचित नित्याची करमणूक असावी म्ह्णून इन्स्पेक्टर मोऱ्यांनी सर्व प्रकाराकडे कानाडोळा केला. पण नेहाच्या चाणाक्ष नजरेतुन मात्र यातील एकही गोष्ट सुटली नाही. पण आपण पोलीस चोकीत आहोत या कल्पनेने केतकीला कापरं भरलं.
इन्स्पेक्टर मोरे डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर ठेवत समोरच्या फाईल्सकडे नजर टाकुन खुर्चीत बसल्या. नेहा आणि केतकीला खासकन ओढत त्यांच्यासमोर येऊन बसवले गेले. या ओढाताणीने वैतागलेल्या नेहाने त्या पोलीस बाईवर जळजळीत एक कटाक्ष टाकला. तशी पोलीस सहकारी जरा चपापली. तेवढ्यात इन्स्पेक्टर मोऱ्यांनी दोघीना विचारले,
"तुमच्यापैकी गाडी कोण चालवतं ?"
दोन क्षण दोघीही गप्प बसल्या. नंतर केतकीकडे पाहत तिला डोळ्यानी खुणावत नेहा इन्स्पेक्टर मोऱ्यांना म्हणाली.
"फक्त मी चालवते."
"या 'फक्त' चा अर्थ नक्कीच दोघीही चालवता असाच आहे ना केतकी?? केतकीकडे क्रोधीत नजरेने पाहत इन्स्पेक्टर मोऱ्यांनी आवाज चढवला.
" हो" त्यांच्या या अनपेक्षित हल्ल्याने भेदरलेली केतकी उत्तरली.

ŞİMDİ OKUDUĞUN
ब्लॅक इन गोवा
Gizem / GerilimMATURE CONTENT 18+ मैत्री ही फक्त मैत्री असते. ओढून ताणुन पांघरलेला बुरखा मैत्री ठरत नाही. मैत्रीच्या परीकक्षा विस्तिर्ण असतात. तो एक अति तेजस्वी झरोखा आहे. एका मनात उमटुन दुसऱ्या मनापर्यंत पोहचण्याचा त्याचा प्रवास अनोखा आणि अद्भुतरम्य आहे. तो अनुभव...