"नीता अगं असं काय बोलतेस त्याच्याशी, तो त्याचं काम करतोय आणि पैसे घेतोय ना. असं वागू नये लोकांशी." निताची सासू तीला म्हणत होती.
कारण प्लंबर ला झापत होती. नळ बसवून झाला कि नीटपने साफसफाई करण्यावरून आणि मजुरीच्या पैशावरून त्याला विनाकारणच बडबड चालली होती तिची."अगं 20 रुपयांचे दोन पेन घेतल्याने कुठं मी गरीब होणारे आणि तो गरीब म्हातारा श्रीमंत होणारे. त्याची काहीतरी गरज भागेल ना त्या पैशात म्हणून घेतले." प्राची निताची मैत्रीण तीला सिग्नल वर थांबलेल्या कार मध्ये बसून बोलत होती. कारण नीता म्हणत होती कशाला असं रस्त्यावरच्या लोकांकडून काहीही विकत घेते. फालतू गोष्टी गळ्यात मारतात उगाच.
" तू नको मागे उभी राहू आणि सारखी टॉर्चर करु त्याला. मी बोललोय त्याला नीट कर म्हणून आणि त्याचं नेहमीच काम आहे ते.. करेल तो व्यवस्थित. " विनीत निताचा नवरा तीला बाजूला घेत बोलला. कारण ती घरात पेंटिंग करणाऱ्या पेंटरला कामावरून वाजवी पेक्षा विनाकारण जास्त सूचना देऊन भंडाऊन सोडत होती.
थोडक्यात... नीता जितकी सुंदर, सुबक, आकर्षक आणि नीटनेटकी अशी विवाहित स्त्री होती त्यापेक्षा जास्त गरीब आणि खालच्या दर्जाचे आयुष्य जगणाऱ्या लोकांबद्दल तिडिक असणारी, आढ्यताखोर आणि घमेंडी व्यक्ती होती. तिचं तसं वागणं कितीही समजावलं तरी बदलत नव्हतं. जेव्हा केव्हा अशा लोकांशी तिचा सामना होतं तेव्हा तेव्हा तिने स्वतःच्या वाईट वागण्याचाच अनुभव त्या लोकांना दिला.
नीता आणि तिचा नवरा विनीत दोघानी मिळून एका शहराबाहेरील एरिया मध्ये सुरु झालेल्या नव्या स्कीम मध्ये घर घेतलं होतं. ती एका नव्या आयटी पार्क मध्ये जॉबला होती. नवऱ्याचा पार्टनरशिप मध्ये इलेक्टिकल प्रोजेकट्स चा बिजिनेस होता. त्यामुळे तो आठवड्यातून एक दोन दिवस प्रवासात पण असायचा. दोघांचं वैवाहिक जीवन छान चाललं होतं. विनीत चं बिजिनेस सेटलमेंट झाल्यावर मुलं जन्माला घालायची प्लॅनिंग निताला मान्य होती. आर्थिक परिस्थिती सध्याही उत्तम होती. पण तरीही आणखी काही गोष्टी व्हायच्या होत्या.