उजव्या अंगठ्याचे नख तुटून त्यातून भयानक कळ आणि सोबत रक्त जात होते. थंडीची रात्र असल्यामुळे ठणका जरा जास्तच जाणवत होता. ती काही कळ येण्याची एकच जागा नव्हती अंगावर, कमरेमध्ये, हनुवटीवर, गुढगा, खांदे. सगळे सगळे काही ठणकत होते. एक दातही पडला होता. तोंडातून वाहिलेले रक्त खुरट्या दाढीतून ओघळताना सुकले होते. कपडे धुळीनं चिखलाने माखले होते. गालफाड, कपाळ, कानशिले सगळे काही माराने सुजले होते. हाताची बोटे बुटांच्या पायाखाली चेंगरून सोलटून आग आग करत होती. अंगात उठायची ताकत नव्हती. शर्ट पॅन्ट फाटली होती. जोड्यांचा पत्ता नव्हता. हॅन्डबॅग कुठंतरी अंधारातच पडली होती. शोधायला आणि शोधण्यासाठी उठायला अंगात त्राण नव्हते.
योगेश भोजने उर्फ भोजने मास्तर.
आयुष्याची पातळी खालावत जाऊन शेवटी आता तो गावकुसाबाहेरील रस्त्यावर मार खाऊन पडला होता. त्याच्यासारख्या प्रतिष्ठित कार्यात असणाऱ्या माणसावर हि वेळ काही पहिल्यांदा आली नव्हती पण त्या त्या वेळी तो निसटला होता. दरवेळी तसेच घडेल असे थोडी असते. ह्यावेळी नियतीच्या कचाट्यात सापडला आणि तुडवला गेला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतात पडला होता. पावसाळ्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता. वारा झोंबत होता. उठता येणार नव्हते त्यामुळे पडल्यापडल्या मदतीची वाट पाहण्यावाचून गत्यंतर नव्हते. तोवर गत आयुष्याने केलेल्या चुकांची भरपाई कशी केली ते आठवण्याचा चाळा मनाने सुरु केला.
योगेश तसा फार अवगुणी नव्हता. माध्यमिक वर्गांवर इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल शिकवणारा साधा झेडपीचा शाळामास्तर. आठ दहा वर्षे शिक्षण सेवक म्हणून काढल्यावर वयाच्या ३६व्या वर्षी पर्मनंट झाला. तोवर धड नोकरी नव्हती त्यामुळे लग्न नव्हते. कशीबशी आयुष्याची गाडी इतरांची प्रगती, इतरांच्या चांगल्या नोकऱ्या, सुंदर मुलींसोबत इतरांचे लग्न आणि त्यांचे बहरलेले आयुष्य बघत पुढे पुढे सरकत होती. पण त्याच्याही आयुष्यात दैवाने उशिरा का होईना बरे दिवस लिहिले होते. नोकरीला लागल्यावर त्याचा भाव वाढला. सगळीकडे प्रशंसा, प्रतिष्ठा आणि कौतुक मिळू लागले. झेडपी ची मास्तरकीची नोकरी म्हणजे आयुष्यभराची सुरक्षितता होती. वय निसटून चालले होते तेव्हा आई-वडिलांना त्याच्या लग्नासाठी विचारपूसही आपसूक सुरु झाली. योगेशचे वय जास्त असल्यामुळे त्याला स्थळे काही नीटशी मिळेनात. वय झालेल्या किंवा काही अडचण असलेल्या मुली सांगून येत होत्या. त्यात त्याला हुंडयाचीसुद्धा अपेक्षा होती. एका नातेवाईकाने तर चक्क विधवा मुलगी सुचवली. तेव्हा मात्र त्याचा सय्यम सुटला. नातेवाईकाच्या नादाला लागण्यापेक्षा त्याने सरळ तालुक्यातील एका वधुवर सूचक मंडळात नाव नोंदवले.