मीना ने दीर्घ श्वास घेत बोलण्यास सुरवात केली.
"खुप वर्षापूर्वी गावात एक गोष्ट घडली होती. पण खुप भयानक होतं ते. तेव्हा आमचं गाव खुप छोटं होतं. म्हणजे गाव कमी जंगल जास्त होतं. गावातील लोकं तेव्हा पण मिळून मिसळून राहत असे. एकमेकांना मदत करायला तत्पर असायची. श्रीमंत असो वा गरीब सर्वच जण गुण्या गोविंदाने राहायचे. पण गावामध्ये अशी गोष्ट घडली तशी आधी कधीच घडली नव्हती. एक तरुण आणि तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले. तो तरुण खुप गरीब होता आणि तरुणी एका श्रीमंत बापाची मुलगी. दोघेही एकमेकांशी लपून छपून भेटू लागले. हळूहळू दोघेही एकमेकांच्या खुप जवळ येत गेले. एकदा गावावाल्यांनी दोघांना नको त्या अवस्थेत जंगलात रंगेहाथ पकडले."
"पंचायत बसली."
"गावातील सर्व वरिष्ठ लोक, पाच पंच, मान्यवर लोक सभेला आली होती."
"सर्वच गावकऱ्यांनी दोघांना धारेवर धरलं. संस्काराचे पाठ सुनावले. गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे पंचानी एक निर्णय घेतला. दोघांना एक सक्त ताकीद देण्यात आली. आजपासून दोघांनी एकमेकांना भेटणं तर सोड..एकमेकांचं तोंड सुद्धा बघायचं नाही. असं त्यांना सांगण्यात आलं. आणि त्याच बरोबर पंचानी घोषणा केली की ह्यापुढे गावामध्ये कोणीही असे घाणेरडे कृत्य केलं तर त्याला कडक शिक्षा देण्यात येईल. चुकीला माफी नाही."
"मग" मीना एक क्षण गप्प होताच रेश्माने अधीरतेने तिला विचारले.
"मग काही दिवस दोघे एकमेकांना भेटले नाही. गावकऱ्यांना सुद्धा तसं काही दिसण्यात आलं नाही. लोकांना वाटलं दोघांना पंचायत मध्ये चांगलीच तंबी बसल्याने दोघे आता सुधारले. पण वास्तविकता गोष्ट वेगळी होती. त्या तरुणाचे लपून छपून तरुणीला भेटणे सुरुच होते. पण कोणाला त्यांनी ठावठीकाणा लागू दिला नाही. एक दिवस तरुणीच्या घरी एकच गोंधळ उडाला. तरुणी सकाळपासुन घरातून गायब होती. तिला सकाळच्या प्रहरी लवकर उठायची सवय होती. पण त्यादिवशी तिने आपल्या खोलीचा दरवाजा उघडलाच नाही. तिची आई जेव्हा तिला उठवायला गेली तर खोलीतुन कसलाच आवाज आला नाही. तिच्या आईने ओरडून घरातल्या पुरुषांना बोलवून घेतले. पुरुषानी दरवाजा तोडला तेव्हा खिडकीतुन ओढण्यांची माळ बाहेरच्या दिशेला लटकत होती. मुलगी घरातून फरार झाली होती."