सकाळी सदा जेव्हा झोपून उठला तेव्हा छातीत हलकेसे दुखू लागले. कोणी छातीत सुई टोचतंय असं त्याला वाटत होते.
आपल्या छातीकडे पाहताच त्याला धक्काच बसला. तीन नखांनी ओरखडा मारलेल्या रेषा छातीवर डाव्या बाजूपासून उजव्या बाजूपर्यन्त उमटल्या गेल्या होत्या. सदा घाबरला. तो लगेच छोटा आरसा घेऊन छातीवरच्या जखमा पाहू लागला.
छातीवर जिथे तीन ओरखडे होते त्याच्या आजूबाजूला थोडी सूज सुद्धा आली होती. सदाला अचानक झालेल्या जखमेचे आश्चर्य वाटले. आश्चर्य होणं तसं स्वाभाविकच होत. कारण रात्री झोपताना छातीवर कसलीच जखम नव्हती. छातीच काय पूर्ण शरीरावर त्याच्या कसलाच डाग नव्हता.
छातीवर ओरबडलेल्या निशाणाकडे पाहताना त्याला अचानक काल संध्याकाळी दिनू आणि भिवा बरोबर झालेल्या चर्चेची आठवण झाली. आणि त्याचबरोबर आठवण आली ती चर्चेचा प्रमुख विषय ' रेश्मा आणि बाळू'.
तशा तर त्या तिघांच्या बऱ्याच विषयावर गप्पा रंगल्या होत्या. 'रेश्मा आणि बाळू चा विषय त्यांच्या गप्पामधल्या अंशत: भाग होता. पण सदाच्या पूर्ण शरीरभर झिणझीण्या उठत होत्या.
अनायसे त्याला अपरिचित भयाचा अनुभव आला.
त्याचं मन संशयाच्या जाळ्यात फिरत होते. कदाचित ह्या सर्वाचा बाळूच्या मृत्युशी संबंध नसेल ना ? नाही तर संध्याकाळच्या वेळेस जंगलाचा विषय काढल्याने कुठली वाईट शक्ती तर आपल्याकडे आकर्षित झाली नसेल ना?
सदा आता भितीने थरथर कापू लागला.
बायकोला त्याने ह्यातले काहीच सांगितले नाही. सकाळची औपचारीक कार्य पूर्ण करून दुकान उघडण्याच्या नावाने लवकर घराबाहेर पडला.
जलद गतीने पावले टाकत तो भिवाच्या घरी आला.
भिवा नेहमी सकाळी लवकर उठत असे. सदा त्याच्या घरी पोचला तेव्हा तो जागाच होता. सदाने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग भिवाला सांगितला आणि शर्ट काढून त्याने आपले छातीवरचे तीन ओरखडे सुद्धा त्याला दाखवले. भिवाला तर विश्वासच बसत नव्हता. साधारणत: असे निशाण कुठल्यातरी टोकदार वस्तूनेच होऊ शकते. छातीवरचे निशाण ताजंतवानच दिसत होतं. भिवाला तो प्रकार जरा विचित्रच वाटला. त्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हते.