सदाच्या घरातुन निघाल्यावर भिवा दुकानापर्यंत जाताना कुणीतरी आपला पाठलाग करत आहे असा त्याला भास होत होता. डोक्यात एवढे विचार चालू होते की कामात काहीच लक्ष लागत नव्हते. दुकानात काम करताना सुद्धा त्याच्याकडुन काही ना काही चुकी होत होती. तो विचारचक्राच्या जाळ्यात एवढा अडकला की छातीवरच्या घावाची ही त्याला आठवण झाली नाही.
संध्याकाळी तो नेहमीच्या चहाच्या टपरीवर न जाता नदीजवळच्या टपरीवर गेला. तिथे त्याला हरीश भेटला. हरीश आपल्या दोन्ही नाविकांकडुन त्या दिवशीची मिळकत घेऊन घराकडे जात होता. तेव्हा अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. चहाची टपरी जवळच असल्यामुळे आडोसा घ्यायला तो टपरीमध्ये घुसला.
गावातले चहा वाले वा दैनिक विक्री करणारे दुकानदार आपलं दुकान जरा मोठं आणि खुल्या जागेत मांडत असत. दुकानात एवढी जागा असायची की दहा माणसे आरामात आतमध्ये बसू शकत होते.
त्यादिवशी दुकानात भिवा आणि चहावाले विष्णू काकामिळून चार जण होते. हरीश त्यामध्ये सामील झाला. हरीश आणि विष्णू काका चांगले मित्र होते. त्या दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. भिवा आपल्याच विचारात मग्न होऊन चहा आणि बिडीचा चुसका घेत होता. आता पाऊसाचा मारा जास्त चालू असताना बाबु सुद्धा दुकानात धावत आला. अवकाळी पावसाचा कोणालाच अंदाज आला नव्हता. त्यामुळे कोणाकडे छत्री असण्याचे कारणच नव्हते.
बाबु तर पुरता भिजून गेला होता. आल्या आल्या त्याने एक गरम भजी आणि चहाची ऑर्डर दिली.
भिवा ला कोपऱ्यात बसलेला पाहून तो त्याच्याकडे गेला आणि खुशाली विचारू लागला.
"अरं भिवा..कसा हायेस मित्रा ?"
भिवाने वर डोकं काढून बाबुकडे पाहिले आणि बिडी शिलगावत म्हणाला.
"मला काय धाड भरलीया..म्या ठिक हाय,..तू बोल"
"बस ..माझं पण ठिकच चाललंय".
"हम्म"
बाबुच्या उत्तरावर भिवा 'हम्म' असं प्रत्युत्तर देऊन पुन्हा एकदा विचारात मग्न झाला.