हे बघा कोणत्या ही मुलाला जर उल्टी आली की बस मध्ये करायची नाही . हो हे पिशवी मी सर्व मुलांना दिली आहे त्यामुळे काही कारण मी ऐकणार नाही . मी मोठ्या आवाजात साऱ्या मुलांना सांगत होतो , मात्र हे काय माझ्या कडे कुणी बघत सुध्दा नव्हते . जाऊद्या म्हटले आणि बसलो गुपचूप आपल्या जागेवर .
अरे हो तुम्हाला सांगतो मी कुठे जात आहे ते तर , मी आणि सतिश काका या वायफळ मुलांना ((वायफळ का तर तुम्हाला पुढे कळेल .)) घेऊन सहलीला जात आहोत . कुठे तर येथेच चिखलदरा . नाही म्हणजे जवळपासचे एक पाहण्या सारखे ठिकाण फक्त तेच आहे ना . तर आम्ही घेऊन जात आहोत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील मुलांना घेऊन . हो त्यांच्या सोबत त्यांचे शिक्षक आहेत पण हे मुल त्यांना ऐकतील तर मग खूप झाले . कुणाचे ऐकतील ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुल कुठे . (( मी स्वतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलो आहे , त्यामुळे वाईट नका वाटून घेऊ . बाकी आपली मर्जी .))
आता पर्यंत जवळपास तीन मुलांनी उल्टी केली होती आणि त्यामुळे साऱ्या बस मध्ये चांगला वास येत होता . ठीक आहे लहान मुलांना होतो त्रास चढ उतार असला की मात्र रस्ता चांगला लागला की हे पोट्टे जोर जोरात ओरडत होते . अहो मगाशी एका मुलाने एक रबराची पाल त्यांच्याच एका सरांच्या अंगावर टाकली . मग काय त्या सरांनी इतक्या जोरात उडी घेतली ती आपल्या जागेवरून की थेट माझ्या पुढे येऊन पडले . कसातरी मी त्यांना उभे राहण्यात मदत केली . त्यामुळे मी खूप त्रसलो होतो या मुलांना ,माझ्या सारखीच परिस्थिती हे त्यांच्या मॅडम आणि सर यांची सुध्दा होती .
बस जवळपास अर्ध्या एका तासात चिखलदरा येथे पोहचणार होती , तेवढ्यात एक मुलगा म्हणाला सर आम्हाला भूक लागली आहे . मग काय नाईलाजाने बस थांबवावी लागली . बस थांबली आणि एका मागे एक सारे मुल आणि मुली बाहेर आले .
ते आपले नाश्ता करायला गेले आणि मी बस मध्ये हवा आहे का नाही ते बघू लागलो . अहो टायर कसे आहेत ते हो नाहीतर तुम्हाला तर माहीत आहे , महामंडळ यांची सध्या काय स्थिती आहे .
अबे पोरा हे चिल्लर पार्टी लय आवाज करू रायले बरं , यांचा काही बंदोबस्त कर लेका . सतिश काका मला म्हणाले , आता त्यांना काय सांगू हे मुल माझे काय आपल्या शिशकांचे सुध्दा ऐकत नाही आहेत . हो काका बघतो मी काही तरी करतो , पण तुम्हाला इतके टेंशन का बरे आले . मी लगेच काकांना विचारले , अरे मगा एक पोट्ट माया जवळ आलं आणि म्हणते कसे ??? मी चालू का आबा गाडी . मी ऐकताच हसू लागलो आणि काकांना म्हणालो अहो मग द्यायचे असते ना त्याच्या हातात गाडी . टुले हसू येते लेका , मले किती त्रास दिला त्या पोट्ट्या नी . काका अतिशय गंभीर आवाजात मला म्हणाले , अहो काका तुम्ही काळजी नका करू . एकदा आपण चिखलदरा येथे पोहचलो की मग मी तुम्हाला त्यांची कशी मजा घ्यायची ते सांगतो . या वर काका आणि मी चांगले हसलो .