उत्क्रांतीची गोष्ट

308 2 0
                                    

१८३१ सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये एचएमएस बीगल नावाच्या जहाजातून बावीस वर्षांचा चार्ल्स डार्विन
निसर्गशास्त्रज्ञ म्हणून दक्षिण अमेरिकेच्या प्रवासाला निघाला होता. दक्षिण अमेरिकेतील नैसर्गिक वैविध्याचा
धांडोळा घेणे, तेथील जीवजातींच्या नोंदी करणे असा त्या प्रवासाचा सरळ साधा हेतू होता. या प्रवासादरम्यान,
दक्षिण अमेरिकेत आढळलेल्या जैविक वैविध्याचा, प्रसाराचा एकंदर आकृतीबंध पाहून तो चकित झाला.
गालापागोज़ बेटसमूहातील प्रत्येक बेटावरील पुष्कळशा वनस्पती, प्राणी खूप एकमेकांसारखे होते, तरी ते खूप
वेगळेही होते. म्हणजे एका बेटावर केवळ हापूस, एका बेटावर पायरी, एकावर केवळ रायवळ आंब्याची
झाडे असावीत तसे काहीसे. तिथे त्याने फ़िंच पक्ष्याच्या ज्या १३ उपजातींची नोंद केली. त्यांना आता डार्विनचे
फिंच असे म्हणतात.

१८३७ मध्ये इंग्लंडला परतल्यावर त्याने जमवलेल्या माहितीचे वर्गीकरण सुरू केले. त्याच्या असे लक्षात आले
की प्रत्येक प्रकारच्या फिंच पक्षाची चोच त्या त्या बेटावर सापडणाऱ्या फळांवर ताव मारण्याच्या दृष्टीने
घडलेली आहे. त्याच दरम्यान थॉमस माल्थसने लोकसंख्यावाढीविषयीच्या एका निबंधात असे सिद्ध केले होते की
'मूलभूत गरजा (अन्न, निवारा) भागताहेत तोपर्यंत जीवांची संख्या अखंड वाढत राहील. माणसाने सुद्धा
अपत्यसंख्येवर नियंत्रण ठेवले नाही तर लवकरच अन्नधान्याच्या तुटवड्याला सामोरे जायला लागेल.' डार्विनने
हाच नियम सगळ्या जीवसृष्टीला लावून पाहिला. म्हणजे समजा एका डबक्यात जास्तीत जास्त वीस बेडूक राहू
शकतात, तर साधारण १८-२२ बेडूक होईपर्यंत बेडकांची संख्या वाढत राहील. मग ती स्थिरावेल. डबक्यात
जागा मिळवण्यासाठी बेडकांना एकमेकांशी स्पर्धा करावी लागेल. जे उपलब्ध सामग्रीचा जास्तीत जास्त
परिणामकारकरित्या उपयोग करू शकतील तेच जगतील. सलग ७/८ वर्षे या विषयावर काम करून तो
'जीवजाती कशा निर्माण होतात' या (त्या काळातल्या एका महत्तम) समस्येच्या उत्तराशी येऊन ठेपला.
१८४४ मध्ये काही निबंध लिहून त्याने आपले विचार आपल्या गुरुंना (डॉ लाइल) कळवले.

'जीवजातींचा उगम मुख्यत्वे नैसर्गिक निवडीमुळे होतो' हा त्याचा निष्कर्ष तर्कदृष्ट्या अतिशय बळकट होता.
उदाहरणांची मालिकाच त्याने आपल्या निबंधात सादर केली होती. पण तरी पुढची २०/२५ वर्षे हे संशोधन
त्याने बासनात गुंडाळून ठेवले, कारण चर्च! त्या काळात (आणि तसे पाहिले तर अजूनही) ख्रिश्चन चर्चाचा
आणि पर्यायाने युरोपातील बहुसंख्य जनतेचा 'देवाने सात दिवसात सगळी सृष्टी निर्माण केली' या
बायबलामधील वचनावर पूर्ण विश्वास होता. जीवजाती नैसर्गिकरीत्या, म्हणजे साध्या शब्दात 'आपोआप' तयार
होतात हा विचार पृथ्वी सूर्याभोवती फिरते या निष्कर्षाहूनही जास्त धक्कादायक होता. जनक्षोभाच्या भीतीने
डार्विनने आपल्या निष्कर्षांना प्रयोगांची, अधिकाधिक निरीक्षणांची जोड देण्याचे निमित्त करत त्यांचे प्रकाशन
पुढे पुढे ढकलले.

पुढे मलाय बेटांवर जैविक वैविध्याविषयी संशोधन करणाऱ्या आल्फ्रेड रसेल वॉलेसनी नैसर्गिक निवडीविषयी
अगदी डार्विनसारखाच निष्कर्ष काढला. आणि योगायोगाने १८५८ मध्ये त्यांनी आपला शोधनिबंध डार्विनलाच
वाचायला म्हणून पाठवला. तेव्हा आणखी कोणी तेच तेच पुन्हा पुन्हा शोधण्यात शक्ती, वेळ घालवू नये म्हणून
आणि आपल्या कष्टांचे योग्य ते श्रेय मिळावे म्हणूनही डार्विनने शेवटी १८५९ मध्ये 'नैसर्गिक निवड व
जीवजातींचे मूळ' (ऑन ओरिजिन ऑफ स्पिसीज़ बाय नॅचरल सिलेक्शन) हे त्याचे सुप्रसिद्ध पुस्तक प्रकाशित
केले. त्यातही नैसर्गिक निवड हे जीवजाती कशा निर्माण होऊ शकतील याची केवळ शक्यता वर्तवणारे एक
गृहीतक (हायपोथिसिस) आहे अशी भूमिका डार्विनने घेतली होती. शिवाय जनमताच्या विरोधात जाण्याच्या
भीतीने त्याने या पुस्तकात त्याने माणसाच्या उत्क्रांतीविषयी अगदी निसटते उल्लेख केले होते. माणूस हा
वेगळा, असामान्य, देवाने स्वतःची प्रतिमा म्हणून बनवलेला जीव आहे, ही बायबलप्रणित कल्पना खोडून
काढणे सोपे काम नव्हते. इतकी काळजी घेऊनही, डार्विनच्या अंदाजाप्रमाणे या पुस्तकाने बरीच वादळे
निर्माण केली. जगातले विद्वान, शास्त्रज्ञ, विचारवंत सगळ्यांमध्ये दोन तट पडले. डार्विनला मानणारा गट
तेव्हा अर्थातच खूप छोटा होता. तरी, सगळ्या शंका, प्रश्न पचवून डार्विनचे हे गृहीतक काळाच्या कसोटीवर
उतरले व सिद्धांत म्हणून मान्यता पावले.

*पुष्कळदा *सजीवांची उत्पत्ती व जीवजातींची उत्पत्ती यात सामान्य माणसाची गल्लत होते. दोन्ही गोष्टी
जीवसृष्टीच्या अस्तित्वाशी निगडित असल्या तरी त्या अगदी वेगळ्या वेगळ्या आहेत. सजीवांची उत्पत्ती म्हणजे
कार्बन, नायट्रोजन, पाणी इत्यादी निर्जीव रासायनिक द्रव्यांपासून नीलहरित शैवाल, एकपेशीय सजीव यांची
निर्मिती. ती नक्की कशी झाली याचे बरेच सिद्धांत आहेत. ते पुन्हा कधीतरी पाहू.

जीवजातींच्या उत्पत्तीचा सिद्धांत म्हणजे ससा, कासव, उंट, हत्ती, गरूड, चिमणी, नारळ, कमळ असे वैविध्य
जीवसृष्टीत कसे निर्माण झाले त्याचा सिद्धांत. (नैसर्गिक निवडीद्वारे) उत्क्रांती, एका प्रकारच्या सजीवांत
बदल होऊन दुसऱ्या प्रकारचे सजीव तयार होणे हा जीवजातींच्या उत्पत्तींचा मान्यताप्राप्त सिद्धांत आहे.

फ्रेंच शास्त्रज्ञ लामार्कने सर्वप्रथम उत्क्रांतीचे गृहीतक मांडले. लामार्क फ्रान्समध्ये नैसर्गिक इतिहासाच्या
संग्रहालयात प्राध्यापक होता. सुरुवातीला वनस्पतीशास्त्रज्ञ व नंतर अपृष्ठवंशीय प्राण्यांचा तज्ज्ञ म्हणून काम
करताना त्याने संग्रहालयातील हजारो नमुन्यांचा कसून अभ्यास केला. त्याने असे मत मांडले की जीवसृष्टी
मुळातच प्रागतिक आहे. म्हणजे उपयुक्त व फायद्याचे गुणधर्म वंशपरंपरेने एका पिढीतून दुसरीत संक्रमित
होताना ठळक होत जातात. निरुपयोगी, तोट्याच्या गोष्टींचा ऱ्हास होत जातो. ही क्रिया अतिशय हळू
चाललेली असल्याने लक्षात येत नाही. म्हणजे आज अस्तित्वात असलेले सर्व सजीव उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर
आहेत. माणूस सगळ्यात वरच्या टप्प्यावर. तर एकपेशीय जीव सगळ्यात खालच्या. कोट्यवधी वर्षांनंतर
आताच्या एकपेशीय जीवाचे वंशज माणसासारखे असतील. तर निर्मात्याचे (देवाचे) कार्य केवळ नवे नवे
एकपेशीय जीव तयार करण्याचे आहे. लामार्कच्या हयातीत त्याच्या गृहीतकाची बरीच खिल्ली उडवली गेली.
त्याच्या समकालीनांपैकी कोणीही उघडपणे त्याची बाजू घेतली नाही. पुढे डार्विनच्या गृहीतकाने मांडलेले प्रश्न
(फिंचाच्या १३ उपजाती कशाला? बदलत्या परिसराचा सजीवसृष्टीवर कसा परिणाम होतो? इ) लामार्कच्या
प्रागतिक उत्क्रांतीच्या गृहीतकाने सुटले नाहीत. तेव्हा हळूहळू लामार्क व त्याची प्रागतिक उत्क्रांती विस्मृतीत
गेले.

डार्विनने (व वॉलेसने मिळून) मांडलेली 'नैसर्गिक निवडीने होणाऱ्या उत्क्रांती'ची कल्पना व लामार्कची
प्रागतिक उत्क्रांतीची कल्पना यातील महत्वाचा फरक म्हणजे डार्विन-वॉलेस यांच्या मते आजचे सजीव त्यांच्या
परीने परिपूर्ण आहेत. त्यांच्यातील बदल 'प्रगती'च्या उद्देशाने होत नाहीत. उत्क्रांतीचे 'टप्पे' परिसरातील
बदलांच्या प्रभावाने पडतात. मूलतः प्रगतीची 'ही दिशा' अशी कोणती दिशा नाही. आणि महत्वाचे म्हणजे
सजीव (एकाच जीवजातीत असला तरी) एकमेकांहून वेगळे वेगळे असतात. आनुवंशिकतेने गुणधर्म एका
पिढीतून दुसरीत जातात पण १००% जसेच्या तसे नाही.१ [1] जे गुणधर्म संक्रमित होतात तेही 'हे
प्रगतीसाठी आवश्यक' असे ठरवून होत नाहीत.

एक उदाहरण घेऊ. 'क' नावाच्या जंगलात १०० चरणाऱ्या 'च' प्राण्यांची प्रत्येकी १० या प्रमाणे ५००
पिले झाली. परंतु समजा काही कारणाने जमीनीवर गवत उगवेनासे झाले. ५०० पैकी उंचीच्या क्रमाने जी
पहिली १००/१२५ पिले होती त्यांनी झाडावरची पाने खाऊन गुजराण केली. तुलनेने अधिक खायला मिळाल्याने
ती जास्त प्रमाणात टिकून राहिली. पुढे त्यांची पिले त्यांच्या सारखी उंच होण्याची शक्यता जास्त, त्यामुळे त्यांचे
वंशसातत्य राहण्याची शक्यता जास्त; तसेच लाखो वर्षांनंतर त्यांच्यातून जिराफसदृश 'ज' प्राणी निर्माण
होण्याचीही! पण 'ज' व्हायचे असे ठरवून हे प्राणी उंच झाले नाहीत. जे उंच होत गेले ते टिकले इतकेच.
मात्र 'क' पासून दूर, 'ख' जंगलात जिथे गवत पुष्कळ प्रमाणात होते, बुटके प्राणीही मजेत टिकून
राहिले. कारण तिथे पहिले १०० कदाचित पळण्याच्या वेगावर किंवा आणखी दुसऱ्या निकषांवर ठरले. त्यामुळे
उंच-बुटक्या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांनी एकत्रित प्रजनन केले. लाखो वर्षांनंतर तिथे 'छ' प्रकारचे ('च'
पासूनच पण वेगळ्या निकषाने निर्माण झालेले) प्राणी होते. तसेच पुढे झाडांच्या पानांच्या किमान उंचीशी 'ज'
प्राण्यांची उंची जेंव्हा मिळती जुळती झाली तेव्हा पहिले १०० प्राणी निवडण्याचा निकष बदलला! मग त्या
गटातील तुलनेने बुटके (पण 'च', 'छ' पेक्षा बरेच उंच) प्राणीही प्रजनन करू लागले. त्यामुळे एका
मर्यादेनंतर 'ज' उंच झाले नाहीत.

बदलत्या निकषांनुसार पहिल्या ५०० तील १००/१२५ 'निवडणे', पुन्हा त्यांच्या पिलांतून पुढचे १००/१२५
या चक्राला डार्विनने 'नैसर्गिक निवड' (natural selection) असे नाव दिले आहे. यातून 'च'
प्राण्यांपासून 'छ' आणि 'ज' अशा भिन्न जाती तयार झाल्या.

नैसर्गिक निवडीप्रमाणे कृत्रिम, म्हणजे मनुष्यप्रणित निवडीतूनही उत्क्रांती घडून येते. पेरणी करताना
शेतकरी चांगल्यात चांगले बियाणे निवडून ते लावतो. येणाऱ्या पिकातले उत्तम बी पुन्हा पुढच्या खेपेसाठी
साठवून ठेवतो. 'चांगल्याच चांगले', 'उत्तम' म्हणजे चवीला चांगले, दिसायला चांगले, किंवा आकाराने मोठे
असे काही असेल, ते पेरणाऱ्यांच्या मतावर ठरेल; ही झाली माणसाची निवड.

जेमतेम पाकळ्यांचा जंगली गुलाब पाहून कोण त्याला फुलांचा राजा म्हणेल? आता आपल्या बागेतला गुलाब आणि
जंगली गुलाब या दोन वेगळ्या उपजाती म्हणाव्यात इतका त्यांत फरक झाला आहे. तसेच कोबी आणि फ्लॉवरचे
उदाहरण घेता येईल. या दोन्हीची मूळ जंगली वनस्पती एकच आहे. कोबीच्या बाबतीत ज्या रोपाचे कोवळे
कोंब जास्त गेंदेदार त्याच्या बिया घेऊन पुन्हा पुन्हा लावण्यात आल्या. तर फ्लॉवरच्या बाबतीत फुलावर लक्ष
केंद्रित करण्यात आले. आता कोबीच्या बिया लावून फ्लॉवर मिळणार नाही! म्हणून कोबी व फ्लॉवर या दोन
वेगळ्या उपजीवजाती झाल्या. 'उप', कारण, अजूनही कोबी आणि फ्लॉवरचा संकर करून 'फ़्लॉबी' अशी
एखादी भाजी बनवणे शक्य आहे!

कोबीचे उदाहरण पाहून असे वाटेल की उत्क्रांती वर्ष सहा महिन्यात होणारी गोष्ट असेल. पण तसे नाही.
माणसाने शेती करायला सुरुवात केली तेव्हा, म्हणजे मानववंशशास्त्रज्ञांच्या मते १० ते १५ हजार वर्षांपूर्वी,
या जंगली वनस्पतींना 'माणसाळवण्याचे' काम सुरू झाले. तेव्हा आता आपल्याला, या (अजूनही संकर करता
येईल अशा) उपजीवजाती मिळाल्या. माणूस आणि चिंपांझी अशा दोन (संकर करता येणार नाही अशा) भिन्न
जीवजाती मिळायला कदाचित दीड-दोन लाख वर्षे थांबावे लागेल. पण तेच जर एक दिवस आयुष्यमान
असलेल्या जिवाणूच्या उत्क्रांतीविषयी बोलायचे तर ती पाच-पन्नास वर्षात होईल. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा
'किती वर्षे' हा नसून 'किती पिढ्या' हा आहे. प्रत्येक पिढीत जगण्याच्या स्पर्धेत कोण टिकते, कोण
सगळ्यात जास्त संतती निर्माण करते, त्यावर कोणते गुणधर्म पुढे जाणार व कोणते नामशेष होणार हे ठरते.

पूर्वी डास मारण्यासाठी डीडीटी हे रसायन अत्यंत प्रभावी होते. पण ते डासांचे समूळ उच्चाटन करू शकत
नाही. त्यामुळे जे जगले वाचले त्या डासांमध्ये डीडीटी असतानाही टिकून राहण्याची शक्ती होती. त्यांच्या
वंशजांमध्ये ती आनुवंशिकतेने येते व एखाद्या भागात डासनिर्मूलनासाठी बराच काळ केवळ डीडीटी वापरत
राहिले तर तिथे डीडीटीला दाद न देणारी डासांची फौज तयार होते. हे डास साध्या डासांबरोबरही प्रजनन
करू शकतात. म्हणजे ती वेगळी जीवजाती नाही. आपण डीडीटी फवारायचे थांबलो तर थोड्याच काळात
डासांतील डीडीटीरोधाची शक्ती नष्टप्राय झालेली दिसते. कारण, नवे डास जुन्या डीडीटीरोधी आणि साध्या
डासांचे एकत्रित वंशज असतात. जगण्यासाठी संघर्षात डीडीटीरोधाचा निकष पहिल्या क्रमांकाचा नसेल तिथे
दुसरा कुठलातरी निकष महत्वाचा ठरतो व डीडीटीरोध मागे पडतो.

एखादी नवी उपजाती बनवण्यासाठी एखाद्या गटावर नैसर्गिक निवडीचा दबाव किमान किती काळ राहावा हे
यातून लक्षात येते. जर साध्या डासांमध्ये आणि डीडीटीरोधक डासांमध्ये एकत्र प्रजनन झाले नाही तर
डीडीटीरोधक डासांची नवी जाती निर्माण होईल. जी डीडीटी फवारली नाही तरी टिकून राहील. नैसर्गिक
निवडीतून होणाऱ्या उत्क्रांतीचा महत्वाचा नियम म्हणजे एका 'च' जीवजातीतील एखादा गट 'ज' मूळ
समूहापासून वेगळा पडून इतका बदलतो की तो मूळ 'च' प्राण्यांसह (नैसर्गिकरीत्या) संतती निर्माण करू
शकत नाही. (मनुष्यप्रणित संकर२ [2] तुलनेने 'जवळच्या' जीवजातीत होतात; उदा. घोडा व गाढव यांचा
संकर करून खेचर. पण निसर्गतः तसे ते होत नाहीत.)

उत्क्रांतीत प्रजननाची भूमिका महत्वाची असल्याने, जोडीदार निवडीचे निकषही महत्वाचे ठरतात. प्रजननाची
क्षमता केवळ मादीकडे असल्याने तिला आकृष्ट करण्यासाठी नरांना विविध मार्ग अवलंबावे लागतात. सहसा
जगण्याच्या संघर्षात कोणते गुणधर्म उपयोगी ठरतात हे मादीला सहजप्रेरणेने ठरवता येते. उदा. सुगरण
पक्ष्याची मादी नराची घरटे बनविण्याचे कौशल्य पाहून त्याला निवडते. म्हणजे पिले सुरक्षित राहावीत हे तर
आहेच, पण तिला होणाऱ्या पिलांतील नरांत ते कौशल्य आनुवंशिकतेने येऊन तिचा वंश टिकण्याची शक्यता वाढते
हेही महत्वाचे आहे. तरी मोराचा पिसारा, कोंबड्याचा तुरा अशा सकृतदर्शनी निरुपयोगी वाटणाऱ्या गोष्टी
माद्यांच्या 'सौदर्यदृष्टीमुळे' उत्क्रांत झाल्या आहेत. तर काळवीटाची शिंगे, गोरिला, रानरेडा अशा प्राण्यांतील
नर व मादीच्या आकारातील फरक मुख्यतः नरांच्या स्पर्धेतून निर्माण झाला आहे. एकंदरीत एका वाक्यात
सांगायचे तर जिथे जिथे नर व मादी एकमेकांपासून अत्यंत वेगळे दिसतात त्या जातीत हा वेगळेपणा लैंगिक
निवडीतून, म्हणजे (साधारणतः) नरांना एकमेकांशी स्पर्धा करायला लागून, निर्माण झाला आहे.

माणसाच्या उत्क्रांतीचा विचार करताना या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावा लागेल. अंतिम सामाईक पूर्वजातून३
[3] केवळ चिम्पांझी किंवा केवळ माणूस का तयार झाला नाही या प्रश्नाचे उत्तर या दोन गटांना कोणत्या
वेगळ्या परिसरात रहावे लागले, कोणत्या वेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले याच्या उत्तरात आहे. पुढच्या
लेखात आपण माणसाच्या उत्क्रांतीच्या सव्हाना गृहीतकाचा विचार करू.

-------------------------

१कोणते गुणधर्म वाहून नेले जातात हे कसे ठरते हे डार्विनला माहित नव्हते, कारण तेव्हा जनुकांचा शोधही
लागला नव्हता नव्हते. पण काही गुणधर्म एकमेकांचे जोडीदार असतात हे मात्र तेव्हा ज्ञात होते. उदा.
सहसा मुलग्यांमध्ये आढळणारा हिमोफिलिया.

२जनुकीय बदलांनी घडवले जाणारे संकर जीवशास्त्रीयदृष्ट्या दूरच्या जीवजातीतही आता शक्य झाले आहेत.
'संकर न होऊ शकणाऱ्या त्या वेगवेगळ्या जीवजाती' हे डार्विनचे मत मी वर लिहिले आहे.

३अंतिम सामाईक पूर्वज = चिंपाझी, गोरिला, बोनोबो आणि मनुष्य यांचा सामाईक पूर्वज कपी.  

Night WalkOpowieści tętniące życiem. Odkryj je teraz