गरीब घरचा कलाम

261 6 1
                                    

घाटकोपर रेल्वे स्थानक म्हणजे एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी एकत्र बघायला मिळतात, जसे कि भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करणारी मध्य रेल्वे, रस्ते वाहतूक करणारी बेस्ट बससेवा, आंतरराष्ट्रीय प्रवासाची धुरा सांभाळणारी विमान वाहतूक घाटकोपर रेल्वेच्या अगदी छतावरून जाते आणि आधुनिक प्रवासाची ओळख म्हणजे मुंबईमधील पहिली मेट्रो तुम्हाला इथेच बघायला मिळते. म्हणजे एकूणच जलप्रवास सोडला कि प्रवासाची इतर साधने तुम्हाला इथेच बघता येतात.

भारत देशाची प्रगती बघत असताना घाटकोपर स्टेशनच्या बाजूलाच एक मोठा नाला वाहत असतो ज्याला लागूनच झोपडपट्टीची एक रांग असते. अब्दुल तिथेच राहत असतो. सहावीच्या वर्गात शिकणारा तो आपल्या आई वडील आणि काकांबरोबर नाल्याजवळच्या झोपडीत राहतो.

"अब्बू, हे पाणी कुठून येतं?" अब्दुल विचारतो.

"तिथे समोर जो मोठ्ठा मॉल आहे ना! तिथून आणि त्याजवळच्या टॉवरमधून येतं हे पाणी." अब्दुलचे वडील म्हणतात.

"इतकं पाणी? आपल्या नळाला फक्त एक तास पाणी येतं. मग या टॉवरमधल्या लोकांना इतकं पाणी कसं मिळतं?" अब्दुल विचारतो.

यावेळी त्याचे बाबा गप्प बसतात. अब्दुलच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर त्याच्या मनाचं समाधान होतं असं नाही, त्याचा पुढचा प्रश्न तयारच असतो.

"तू शिकून मोठा हो, तेव्हा तुला समजेल असं का होतं ते. आता आत जा आणि अम्मीला विचार जेवण झालं का? मला खूप भूक लागली आहे." अब्दुलचे वडील म्हणतात.

अब्दुल लगेच धावत घरात जातो. त्याचे वडील त्या वाहणाऱ्या नाल्याकडे बघत विचारांत हरवतात. आम्ही खरंच एक तास जेवढं पाणी मिळेल ते साठवून त्यात समाधान मानतो. मग ही मोठी माणसं नक्की करतात तरी काय? एवढं पाणी ते कशासाठी वापरतात? त्यांच्याही मनात अब्दुलसारखे प्रश्न डोकावू लागतात.

"अब्बू... जेवण झालंय, जेवायला या!" अब्दुल दारातूनच ओरडतो.

"आलो बेटा..." म्हणत ते नाल्याजवळून उठतात.

Night WalkDonde viven las historias. Descúbrelo ahora