विवाह करताना गुण मिलनाचा भाग महत्त्वाचा मानला जातो. वर्ण (1)+ वश्य (2)+ तारा/नक्षत्र (3)+ योनी (4)+ मैत्री (5)+गण (6)+भूकूट (7)+नाडी (8)=36 गुण.... यापैकी कमीत कमी 18 गुण जुळणे आवश्यक आहे असे मानले जाते. त्यात पुन्हा नाडी दोष याला आठ गुण दिले जातात. यावरून काही जण स्त्री व पुरुष दोघांची नाडी एकच असल्यास दोष मानला जातो. त्याचा संबंध संतती शी लावला जातो. परंतु बऱ्याच वेळेला असे काही आढळून येत नाही.
खरं तर गुण मिलन ह्या भागामध्ये मानसिक व शारीरिक मिलनाचा भाग विचारात घेऊन कुंडलीची जुळवणूक करण्याचा भाग मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गुण मिलन म्हणजे वैवाहिक सौख्य लाभणार याची ग्वाही देणारं भविष्य कथन नव्हे! माझ्या पाहण्यात बऱ्यापैकी गुण जळून देखील ( अगदी 28 /32 वगैरे ) वैवाहिक सौख्य न लाभलेली, घटस्फोट झालेली अनेक जोडपी पाहण्यात आहेत.
कोणत्याही व्यक्तीचं जन्म कुंडलीतील सप्तम स्थान, चालू दशा महादशा अंतर्दशा, कुंडलीतील शुक्र / चंद्र हा भाग विचारात घेऊन.... त्याबद्दल भविष्य वर्तविणे किंवा अंदाज बांधणे योग्य ठरेलं! नुसत्या गुण मिलनाने काहीही काहीही साध्य होत नाही. काही विशिष्ट गुणधर्म कळण्यास मदत होते एवढेच!एवढं सगळं करून देखील... जोडीदाराशी मनोमिलन कितपत जुळून येतं हाच भाग महत्त्वाचा ठरतो. अगदी महादशा नकारात्मक असल्या तरी Bonding / wavelegth च्या जोरावर अनेक वर्ष संसार केलेली जोडपी माझ्या पाहण्यात आहेत.
त्यामुळे गुण मिलन याद्वारे मिळालेल्या गुणांवर संसार यशस्वी होईल.... वैवाहिक सौख्य लाभेल.... हा कयास करणं फोल ठरतं.
गुण मिलन नाही...तर...
मनोमिलन जास्त महत्त्वाचं ठरतं. गुण मिलनातून काही स्वभावाचे पैलू दिसून येतील. परंतु गुण मिलनात जास्त गुण प्राप्त झाल्याने सर्व काही आनंदी आनंद होईल... संसार यशस्वी होईल... याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. जन्म पत्रिकेतील दशा महादशा, सप्तम स्थानाचा गणित घातल्यावरच याबद्दल ज्योतिषी भविष्य वर्तवू शकतो.शुक्र हा वैवाहिक सौख्याचा कारक आहे. तसेच तो भावनांचाही कारक आहे. त्याचबरोबर चंद्र हा मनाचा कारक आहे. मन आणि भावना ह्या द्वारे हृदयाशी संवाद साधला जाऊ शकतो. सुखी संसारासाठी दाम्पत्यामध्ये मन आणि भावनांचा सुसंवाद आवश्यक असतो. मनाच्या तारा जुळल्यास इतर कोणत्याही बाबींची आवश्यकता भासत नाही. 💞💞💞