ज्योत " म्हणजे शरीरातील" दिव्य चैतन्य" अर्थात आत्मतत्त्व होय."ईश " म्हणजे ईश्वर रूप होय. ज्योत + ईश=ज्योतिष... हा शब्द तयार होतोज्योत.मानवी शरीराच्या अंतर्गत असलेली दिव्य ज्योत ही जीवात्म्याच्या स्वरूपामध्ये पंचकोश (अन्नमय कोश , प्राणामयकोश, मनोमय कोश, विज्ञानमयकोश व आनंदमयकोश )... चार देह, सप्तचक्र यामध्ये बद्ध होऊन संसाराच्या महासागरात व्यस्त झालेला असतो. ह्या जिवात्म्याची होणारी होरपळ व त्याचे कर्म भोग यातून हळुवारपणे सुटका करून घेण्यासाठी ... व ईश्वरा प्रत पोहोचण्यासाठी निर्मित केले गेलेले शास्त्र म्हणजे ज्योतिष शास्त्र होय. थोडक्यात शरीरा अंतर्गत असलेल्या "ज्योतीचे"... "ईश्वरा" प्रत होणारा प्रवास- सुखकर होण्याचे हे साधन होय.
आता ज्योतिष शास्त्रा संबंधी काही महत्त्वाचा भाग पाहू!
1) बारा भाव व नवग्रह यातून मानवाचे पूर्वजन्मीचे कर्म व्यक्त होत असते. पूर्वजन्मीच्या कर्मानुसार ह्या जन्मीचे प्रारब्ध प्रत्येकाला प्राप्त होत असते. पूर्व जन्माच्या कर्माचा आरसा म्हणजे " कुंडली "होय. पूर्वजन्माच्या कर्माचा आलेख कुंडली द्वारे दर्शविला जातो. त्यामध्ये दशा महादशा अंतर दशा हे काळमापन करून काही प्रमाणात दिशा दर्शवू शकतात.
2) "कुंडली" हा शब्द "कुंडलिनी" पासून आलेला आहे. कुंडलिनी शक्ती ही आपल्या मानवी शरीरात सूक्ष्म देहामध्ये ( astral body ) वेटोळं घालून स्थित असते. कुंडलिनी शक्ती म्हणजेच मानवी शरीरातील चैतन्य होय. थोडक्यात पंखा, एसी,मिक्सर,गिझर, बल्ब, वॉशिंग मशीन.... ही घरात अस्तित्वात असली तरी....त्याला विजेची( electricity )गरज भासते. अगदी तसेच आहे.... मानवी शरीरात चैतन्य नसेल तर त्याला प्रेत संबोधण्यात येत." शक्ती" शिवाय "शिव " म्हणजे "शव" होय. मानवी शरीरातील शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती होय.
मानवी शरीर रुपी घड्याळाला ही कुंडलिनी नामक शक्ती... कर्मरूपी ... चावी देत राहते. त्यामुळे मनुष्य जीवन पुढे पुढे घड्याळ्याप्रमाणे सरकत राहते. हेच ह्या विश्वातील महान रहस्य आहे. कुंडलिनी शक्ती.... पूर्व कर्माप्रमाणे मानवाला फळ प्रदान करत असते. जीवनाची दिशा दर्शवणारे साधन म्हणून आपण कुंडलीचा अभ्यास करतो. व त्या माध्यमातून पूर्वकर्माचा आढावा घेऊन त्यावर दैवी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो.
3) ग्रह हे फक्त माध्यम आहे. ग्रहातून मानवाचे कर्म प्रकट होत असते. रवी हा आत्म्याचा कारक आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. बुध हा बुद्धीचा कारक आहे. मंगळ हा साहसाचा धैर्याचा कारक आहे. गुरु हा ज्ञानाचा व अध्यात्माचा कारक आहे. शनि हा कर्माचा व चिकाटीचा कारक आहे. राहू हा पितरांचा कारक आहे. केतू हा पूर्वकर्माचा, मातृ घराण्याचा कारक आहे. नेपच्यून हा अंतःस्फूर्तीचा कारक आहे. हर्षल हा संशोधनकारक आहे. शुक्र हा वैवाहिक सौख्य प्रेम याचा कारक आहे. ग्रहांच्या माध्यमातून ही वेगवेगळी मानवी कर्म अभ्यासण्याचा आपण प्रयत्न करतो.
4) अनेक वेळा वर्तमानपत्रांमध्ये.... राशिभविष्य या सदराखाली काही बाही भविष्य देण्याचा प्रयत्न केला जातो. आता एक लक्षात घ्या.... उदाहरणार्थ... एका शहरात साठ लाख माणसं आहेत. बारा राशी प्रमाणे पाच लाख माणसं एका राशीची आहेत...असं समजू! म्हणजे मेष राशीची पाच लाख माणसं त्या शहरात उपलब्ध आहेत. तर मेष राशीचं एखाद्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा वेबसाईटवर दिलेलं भविष्य हे पाच लाख लोकांना लागू होईल का?ते खरं असेल का? ढोबळ मानाने हा भाग दिला जातो. त्यामध्ये काहीही अर्थ नसतो. ते एक करमणुकीचे साधन किंवा एक सवय लागून गेल्यामुळे राशिभविष्य पाहण्याकडे माणसाचा कल जातो. अगोदर वर्तमानपत्राच्या सदरात... राशिभविष्य... यामध्ये.. मेष रास :-मनस्ताप होईल... वृषभ रास :- प्रवास घडेल.... मिथुन रास :- नातेवाईकांशी गाठीभेटी होतील... असं भविष्य देण्यात येत असे. त्याकाळची लोकं ते चवीने वाचत असतं. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये... राशी त्याच असत.... फक्त मजकूर इकडे तिकडे केलेला असे. थोडक्यात" मनस्ताप होईल "हे वाक्य कुठेतरी दुसऱ्या राशीला चिकटवून जशास तसे देण्यात येई.
या विश्वामध्ये प्रत्येक व्यक्ती ला एक प्रकारचं स्वतंत्र अस्तित्व आहे. ज्याप्रमाणे आधार कार्डातील हातांचे बोटांचे ठसे वगैरे भाग दुसऱ्याशी जुळणारे नसतात. एक युनिक आयडेंटिटी म्हणून त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र भविष्य आहे. एकाच घरामध्ये वेगवेगळ्या भावंडाच भविष्य हे परस्पर विरोधी असतं. अगदी जुळ्या भावंडांची आवड निवड देखील वेगवेगळी असते. त्यावरूनच कर्माचं गणित ठरवलं जात असतं.याकरिता कुंडली शास्त्राचा वापर केला जातो..
.. मानवाची कुंडली म्हणजे त्याच्या कर्माचा लेखाजोखा होय. यातूनच मानवाच्या यशाच्या अपयशाचं गणित थोडं फार आपल्याला ज्ञात होऊ शकत.
5) हल्लीच्या काळात उपायांचा भाग म्हणून नवरत्न, रुद्राक्ष, अंगठ्या, यंत्र, पेंडंट, सुरक्षारक्षक कवच... अनेक प्रकारचे वेगवेगळे विधी सुचविले जातात. त्याचा जबरदस्तीने संबंध कुठे ना कुठे लावून.... अशा प्रकारच्या वस्तू जातकाला दिल्या जातात. परंतु बऱ्याच वेळा ह्याचे फक्त मानसिक परिणाम ( psychological effects) सोडून काहीही उपयोग होताना दिसत नाही. फक्त अमुक अमुक पूजा करून घेतली..... अमुक अमुक रत्न,रुद्राक्ष धारण केलं... याचा समाधान फक्त प्राप्त होत असतं. त्याचे नियम देखील ज्योतिषाकडून सांगितले जात नाही.
6) अनेक उपासना साधना याचा प्रत्यक्षता ज्योतिषाला काही अनुभव नसतो. त्याने कुठेतरी तीन महिने किंवा सहा महिन्याचा कोर्स करून... तो काहीही अनुभव नसताना कुठचा पण मंत्र किंवा विधी, रत्न रुद्राक्ष ... धारण करायला सांगतो. अशी अनेक लोक आहेत त्यांनी काहीच साधना केलेली नसते. ती माणसं इतरांना साधना सांगून.... नियमात न बसणारं काहीतरी... व्यक्तीच्या माथी मारून देतात.... त्यामुळे आणखी त्रास निर्माण होताना दिसतो... अथवा त्याचे काहीच शुभ परिणाम दिसून येत नाहीत.
इथे एक ध्यानात ठेवा! यातील कोणताही भाग म्हणजे जादू नव्हे! ज्या व्यक्तीला कॅल्शियमची कमतरता आहे.... त्या व्यक्तीला कॅल्शियम पुरवणाऱ्या घटकाची गोळी दिली तरच फायदा होईल. अन्यथा फारसा परिणाम दिसून येणार नाही.
श्री गणेश ही हा विघ्नविनाशक, बुद्धीकारक म्हणून ओळखला जातो. श्री लक्ष्मी ही धनाची कारक म्हणून ओळखले जाते. सरस्वती ही विद्येची कारक आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची गरज आहे त्या तत्वाची उपासना करणे गरजेचे आहे. अर्थात ह्या सर्वाचे शुभ अशुभ परिणाम ज्याच्या त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे प्राप्त होतील, यात शंका नाही.
प्रत्येकाच्या पिंडाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला जी ती उपासना फळत असते. काली उपासना,काळभैरव उपासना सर्वांनाच फळेल असं नाही! काही व्यक्तींना त्याचा त्रास देखील होऊ शकतो. कोणतंही खाणं खाल्लं तरी ते पचणं जरुरी आहे! अन्यथा अजीर्ण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे उपासना पचली पाहिजे. उपासना करताना ते विशिष्ट तत्व, दैवत... त्यापासून प्राप्त होणारी स्पंदन आपल्याला जुळणारी आहेत का हे पाहणं गरजेचे आहे! अन्यथा जगातील कोणतंही दैवत हे अशुभ नाही! त्याचा आपल्याला येणारा अनुभव हा महत्त्वाचा आहे.
हे सर्व करत असताना... प्रत्येक कर्मामागील मानवाचा विचार महत्त्वाचा ठरतो. थोडक्यात सुरीचा वापर... भाजी कापण्याकरिता, ऑपरेशन करण्याकरिता व खून करण्याकरिता देखील होऊ शकतो. सुरी किंवा चाकू हे निर्जीव आहे पण.... त्यामागील जी व्यक्ती कर्म करते त्याला ते कर्म चिकटत असते... हे ध्यानात घ्या. सुरी एकच आहे पण त्या मागील motive / प्रेरणा वेगवेगळी असू शकते. त्याप्रमाणे मानवाची कर्म बनते. हेच कर्म जन्मोजन्मी त्याला विविध फळ देत असते. असो!
अधिक माहिती पुढील भागात पाहू! इथे एक ध्यानात घ्या.. हा फार मोठा आवाका असलेला विषय आहे.. त्यामुळे एक दोन लेखांमध्ये ह्याचं स्पष्टीकरण देता येणार नाही. ज्याप्रमाणे मी लिहिलेले कुलदैवत, पुनर्जन्म, स्वप्नांचा विश्लेषण यावरील लेख.... वाचल्यास तुमच्या लक्षात येईल! या प्रत्येक विषयावर दहा हजार लेख लिहिले तरी पण ते फार कमी आहेत. कारण ह्या विषया ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे ते मुळीच नाहीत. प्रत्येक भागामध्ये विसंगती आढळून येत असल्याने.... मत मतांतर असल्यामुळे.... वाद टाळण्यासाठी काही भाग मी मुद्दामहून टाळतो. माझ्यामते फक्त अनुभव हाच श्रेष्ठ आहे. काही लोक वाचून चित्रविचित्र मत प्रकट करतात... त्यांचा अनुभव हा त्यांच्या पुरता मर्यादित असतो.... सदर भाग लिहिताना मी अनेक लोकांचे अनुभव घेऊन... स्वतःचं मर्यादित मत मांडण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच ह्या भागांवर जे विश्वास ठेवतात त्याकरिता हे सर्व अस्तित्वात आहे. जे लोक नास्तिक आहेत.... किंवा कोणताही दैवी भाग मानत नाहीत..... त्याकरिता अनेक कथा, कादंबऱ्या,मनोरंजनाच्या गोष्टी... उपलब्ध आहेत त्या त्यांनी वाचाव्यात! इथे कोणी कोणाला सक्ती करत नाही! पण बऱ्याच वेळेला जी लोकांना स्वतःला अनुभव नाहीत.... ते यावर टीका करताना आढळतात. ज्या टीकाकारांचं संशोधनच नाही.... त्यांनी नुसतं मत मांडण्याच्या भानगडीत पडू नये! स्वतः वैयक्तिक त्या गोष्टीचा अभ्यास करावा, कारण टीका करणं सोपं असतं. हा भाग मी मुद्दामहून वेळोवेळी मांडत असतो.
उपासना हा भक्ती किंवा प्रेमाच्या द्वारे साध्य करण्याचा भाग आहे. त्याला आव्हान किंवा चॅलेंज करून काहीही पदरात पडणार नाही.असो!🙏🙏🙏🙏🙏✍️💐