आपल्या जीवनामध्ये नियती पुढील घडणाऱ्या घटनांचे शुभाशुभ संकेत देत असते! आपण ते ओळखणे फार गरजेचे असते. शिव व शक्ती यापैकी....शक्तीपासून निर्मित झालेला निसर्ग हा आपल्याला भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत प्रदान करत असतो. सृष्टीतील प्रत्येक घटनेवर ईश्वराचे पूर्णतः नियंत्रण आहे.... मग ती चांगली असो वा वाईट! आपण आपली "जाणीव"( consciousness ) जागृत ठेवल्यास आजूबाजूला घडणाऱ्या संकेता वरून भविष्यकालीन निर्णय घेण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.
पूर्वीच्या काळी कोणत्याही कार्यास निघाले असता अथवा सहजपणे भारद्वाज पक्षी अथवा मुंगूसाचे दर्शन घडल्यास शुभ संकेत मानला जात असे. अजूनही काही जणांना तशा पद्धतीचे अनुभव येतात. परंतु शहरांमध्ये असा भाग दुर्मिळच अनुभवायला मिळतो.मांजर रस्त्यावरून आडवे गेल्यास अशुभ संकेत समजला जात असे. मांजर ह्या प्राण्यावर राहू ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे कार्यामध्ये अडथळा येईल असा समज होता. परंतु काही माणसं अमुक अमुक पावलं मागे सरकत असत.. त्या मागची कारणमीमांसा अशी की... त्या ठराविक वेळेच्या चौकटीतून आपली सुटका व्हावी. काही माणसं अशा पद्धतीने मांजर आडवे गेले असता अथवा कोणी शिंकले असता.... काही काळ थांबून मग अपेक्षित कार्यासाठी गमन करत असत. त्यामध्ये ठराविक नकारात्मक काळ निघून जावा.... व त्यापासून आपली सुटका व्हावी... हा भाग असे!