रुद्रस्वामींचा चेहरा जरा चिंतित होतो.
‘‘म्हणजे? आम्ही समजलो नाही. आमच्यापासून तुम्हाला कोणता धोका आहे? माझ्या माहितीप्रमाणे युध्दसंहाराव्यतिरिक्त आमच्या हस्ते तुमच्यापैकी कुणाचाही वध झालेला नाही. आणि राहिला प्रश्न नामशेष होण्याचा, आमच्या मनात तसा विचार देखील आलेला नव्हता.’’
‘‘आम्ही आपल्या विधानाशी पुर्णतः सहमत आहोत. आपण आमच्या संहाराचा विचार देखील मनात आणला नव्हता. मात्र या सृष्टीचा हा नियमच आहे, तुम्हाला तुमचा कूळ वाचवायचा असेल तर ज्याच्यापासून तुम्हाला धोका आहे त्याचा समूळ नाश करा.’’ सुर्वज्ञ दिर्घ श्वास घेतात.
रुद्रस्वामी आपल्या अनुयायांना त्यांचे बांधलेले हात सोडायला सांगतात. अनुयायी सुर्वज्ञचे हात सोडतात. एक अनुयायी त्यांच्यासाठी जल घेऊन येतो. रुद्रस्वामी आपल्या विश्वासू अनुयायांबरोबर त्यांच्यासमोर बसलेले असतात. जलप्राशन केल्यानंतर सुर्वज्ञ पुढे बोलू लागतात.
‘‘आपण ज्या भुतलावर आहात त्याला पृथ्वी असे म्हणतात. ही पृथ्वी गेल्या 350 अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे. आधी हा फक्त एक गोळा होता ज्यावर कोणताही जीव नव्हता. पृथ्वीवरील वातावरण अगदी अस्थिर होतं. ऋतू सतत बदलत असायचे. अशातच पृथ्वीवर पाणी निर्माण झालं आणि त्या अनुशंगाने पृथ्वीवर जीवांची निर्मिती सुरु झाली. आधी किटकरुपात असलेले हे जीव कालांतराने पाण्यात पोहू लागले. त्यांचा शारीरिक विकास चांगला झाला तेव्हा पोहणाऱ्या जीवांनी त्या किटकांचा नाश केला. त्यानंतर जलचरांमध्ये वेगवेगळ्याा हवामानानुसार आणि स्थानानुसार आणखी बदल होऊ लागले. काही जलचर पाण्यातच राहू लागले तर काही जमिनीवर आले. त्याच वेळी काही जलचर सरपटू लागले. सरपटणारे जीव आमचे पूर्वज होते. जसजसे शारीरिक बदल होऊ लागले तसतसे आकाशात उडणारे जीव सुध्दा या पृथ्वीवर दिसू लागले. या सर्व कालावधीमध्ये खुप मोठा काळ लोटला गेला. अनेक जाती निर्माण झाल्या आणि लगेच नष्ट झाल्या तर अनेक जातींनी शेवटपर्यंत तग धरला. सर्वांमध्ये इतके बदल होत होते की पृथ्वीवर शेकडो जाती अस्तित्वात आल्या. आल्या आणि आपापल्या अस्तित्वासाठी एकमेकांना संपवू लागल्या. ज्या वाचल्या त्यांनी आपल्या वंशजांना अधिक विकसित करण्याचं कार्य सुरु ठेवलं. आमचे पुर्वज मात्र या सर्वांपासून खुप दूर उत्तरेकडे (आत्ताचे युरोप) होते. मात्र आमच्यापैकी काही जाती मागे राहिल्या असतील असं त्यांना सतत वाटत होतं. तरीही आमच्या पुर्वजांनी बाहेरच्या जगाशी संपर्क पुर्णतः बंद केला आणि आमचे पुर्वज एका वेगळ्याा विश्वात विकसित होत गेले.’’ रुद्रस्वामींच्या अनुयायांना सुर्वज्ञ थापाड्याा वाटत होता. पण, रुद्रस्वामींना त्याच्या बोलण्यावर पुर्ण विश्वास होता.
YOU ARE READING
अग्निपुत्र
Science Fictionवर्षभरात अग्निपुत्र कादंबरीला सर्व स्तरांवर ५,००,००० पेक्षा जास्त वाचकसंख्या लाभली. हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने पुस्तक Wattpad वर उपलब्ध करण्यात आले आहे.