आपल्या सर्व अनुयायांना जगभरातील विविध ठिकाणी पाठविल्यावर रुद्रस्वामी पूर्वेच्या दिशेने जातात. प्रचंड अंतर पादांक्रांत केल्यानंतर रुद्रस्वामी आपल्या विश्वसु अनुयायी आणि काही विद्वानांसह समुद्रमार्गे पूर्वेला पोहोचतात. बोटीतून किनाऱ्यावर उतरताच त्यांना तिथले लोकजीवन दिसते. अर्ध-भटकी जीवनशैली, शिकार करून जगणे, पाण्यावरील लाकडीघरे व अविकसित शेती ही तिथली जीवनपद्धत त्यांना स्पष्टपणे दिसत होती. बारीक डोळे असलेले आणि चेहऱ्यावर सतत आनंद असलेले मनुष्य पाहून सोबत असेलेले सार्वजन आनंदी झाले.
"स्वामी, आता आपल्याला काय करावयाचे आहे?" एक अनुयायी प्रश्न विचारतो.
स्वामी वर आकाशाकडे बघतात, पक्षी मोठमोठे थवे करून समुद्राहुन जमिनीच्या दिशेने उड़त होते. स्वामींना नैसर्गिक आपत्तीची कल्पना आधीपासूनच होती. ते आपल्या बरोबर असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करतात. सर्वजण एका उंच ठिकाणी जातात आणि काही क्षणातच त्या भागाला त्सुनामिची मोठी धड़क बसते. अनेक पशु, वनस्पती आणि मनुष्य आणि त्यांची घरे वाहून जातात. क्षणात होत्याचं नव्हतं होतं. सर्व अनुयायी हा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघत असतात. थोड्या वेळापूर्वी आनंदाने आपली कामे करणारे आता मृतावस्थेत पडलेले होते.
"स्वामी, हे काय आहे? निसर्गाचं इतकं रौद्र रूप आम्ही कधी पाहिलं नव्हतं. आपल्याला याची कल्पना होती का?" एक विद्वान विचारतात.
"होय, आम्हाला या आपत्तीची पूर्ण कल्पना होती." रुद्रस्वामी त्याच्याकडे न बघतच उत्तर देतात.
"स्वामी, मग आपण त्या निष्पाप मनुष्यांना का नाही वाचवले? आपण त्या सर्वांना वाचवू शकला असता."
"आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते ठिकाण म्हणजे मृत्यूचे माहेरच आहे.इथे पावलापावलावर तुम्हाला मृत्यू दिसेल. इथल्या मनुष्यांना मृत्यूची सवय आहे. भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ, हिंस्त्र पशुचा हल्ला अशी अनेक कारणे आहेत की जरी ह्या प्रदेशावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडत तरी सर्वात हिंस्त्र भूमी फक्त हीच आहे." स्वामी खाली बघतात तेव्हा त्यांना सर्व शांत झालेले दिसते. ते पुढे म्हणतात, "आता प्रत्येकाने कमीत कमी दोन व्यक्तींचे शव आपल्याबरोबर घेऊन चला. मला १०० मृत माणसे हवी आहेत."
YOU ARE READING
अग्निपुत्र
Science Fictionवर्षभरात अग्निपुत्र कादंबरीला सर्व स्तरांवर ५,००,००० पेक्षा जास्त वाचकसंख्या लाभली. हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने पुस्तक Wattpad वर उपलब्ध करण्यात आले आहे.