सहा महिने निघून जातात, पण अग्निपुत्राची कोणतीही हालचाल समोर येत नाही. अनेक माध्यमं अग्निपुत्र मृत्यू पावल्याचं सांगत होते तर, तज्ज्ञ मंडळी तो पुन्हा येणार असं भाकित करत होते. डॉ.अभिजीतला आणि त्याच्या तलवारीला सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेत गोपनीय ठिकाणी ठेवण्यात येतं. अंटाक्टिका खंडामध्ये अनेक ठिकाणी सॅटेलाईटद्वारे शोधून देखील अग्निपुत्र न सापडल्याने आता धोका टळला असल्याचं सर्वांकडून बोललं जातं आणि याच निमित्ताने अमेरिकेतील मॅनहॅटन शहारामध्ये अमेरिकी लष्करातर्फे छोटासा समारंभ आयोजित करण्यात येतो, ज्यामध्ये अनेक देशांचे प्रतिनिधी, लष्कर अधिकारी, नामवंत व्यक्तीमत्व, सिनेकलाकार, उद्योगपती आणि अग्निपुत्राविरोधात असलेल्या मोहिमेतील सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात येतं, ज्यामध्ये जॉर्डन, डॉ.मार्को, डॉ.एरिक, अॅंजेलिना, लिसा, जॉन यांचा समावेश असतो.
"आज आपण त्या सर्वांचं स्मरण करणार आहोत ज्यांना अग्निपुत्राविरोधात असलेल्या लढाईमध्ये वीरमरण प्राप्त झाले आहेत. या लढ्यामध्ये मृत्यूमूखी पडलेल्या प्रत्येकाच्या प्राणाचं मोल अमुल्य आहे. कुणाचंही बलिदान वाया गेलं नाही. जगावर संकट आल्यावर सर्व देशांनी आपापसांतील वैर विसरून एकत्र येऊन लढा दिल्याने अग्निपुत्र नावाच्या दानवाला कळून चुकलं असेल की त्याचा सामना तोडीस तोड असलेल्या मानवप्राण्याशी झाला आहे. "अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे शब्द ऐकताच संपुर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होतो.
"मी आपणा सर्वांसमोर डॉ.अभिजीत, जॉर्डन, जॉन, डॉ.मार्को, डॉ.एरिक, अॅंजेलिना आणि लिसा यांना आमंत्रित करू इच्छितो." सर्व मान्यवर उभे राहतात आणि सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो.
डॉ.अभिजीतची टीम रेड कार्पेटवरून तिथे चालत येते, त्या सर्वांच्या पुढे असतो डॉ.अभिजीत आणि त्याच्या हातामध्ये ती दैव्यशक्ती असलेली तलवार असते.
"अग्निपुत्राला पळवून लावण्यामध्ये आपले योगदान मोलाचे आहे. कृपया आपला अनुभव इथे व्यक्त करावा." अमेरिकेचे राष्ट्रपती डॉ.अभिजीतला मंचावर बोलावतात. तलवार हातातच ठेवत डॉ.अभिजीत भाषणाला सुरूवात करतो.
YOU ARE READING
अग्निपुत्र
Science Fictionवर्षभरात अग्निपुत्र कादंबरीला सर्व स्तरांवर ५,००,००० पेक्षा जास्त वाचकसंख्या लाभली. हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने पुस्तक Wattpad वर उपलब्ध करण्यात आले आहे.