534 2 1
                                    


रेल्वेची सूचना झाली, “नागपूरहून मुंबईला जाणारी रेल्वे, क्र.११४०११ दीड तास उशिरा येत आहे.”
सूचना ऐकताच त्याला जरा हायसंच वाटलं. उशीर होईल म्हणून तो त्याच्या  २ जड बॅगा आणि एक लॅपटॉपची सॅक घेऊन प्लॅटफॉर्म पर्यंत पळत आला होता. त्याने त्याचा ओला चेहरा त्याच घामाने भिजलेल्या ओल्या शर्टाच्या बाहीने पुसला आणि एक दीर्घ उसासा सोडला.
“ए तुला बसायचंय का रे?” आं?”
शेजारच्या बाकावर बसलेल्या पंच्याहत्तरीच्या माणसाने विचारलं.
“अहो नाही काका, ठीक आहे मी.”
“अरे ठीक कसला, दीड तास उभा राहणार का रे तू? आं? ये बस असा इथे आरामात”
“थँक्यू हं काका”.
“अरे थँक्यू कसला रे? आं? अरे तुझ्या बापाच्या वयाचा मी. आमचा काळ असता तर तुझ्या आजोबाच्या वयाचा. ते काय ते फार्मालिटी दाखवते काय रे म्हाताऱ्याला? आं? हां पण तू गप्पा मारल्यास माझ्याशी तर बरं वाटेल हां मला.”
तो हलकेच हसला आणि म्हणाला, “ होss, मारू की गप्पा. तसंही दीड तासाशिवाय ट्रेन काही येत नाही आता.” त्या वयस्कर माणसाच्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटले.
“मी मेहता. तुझं नाव काय म्हणालास?”
“माझं नाव प्रकाश.” त्याचं नाव ऐकून मेहता  क्षणभरासाठी कुठेतरी हरवला.
लगेच सावध होऊन मेहता बुवांनी पुढचा प्रश्न टाकला. “ काय मुंबईला काय सुट्टीसाठी का कामासाठी? आं?”
“अहो मी मुंबईचाच. कामासाठी नागपूरला आलो होतो चार दिवस.”
“घरी कोण कोण असतो तुझ्या?”
“मी आणि माझी बायको. दोघंच.”
“चांगलंय चांगलंय. एकाला दुसरो तरी आहे ना.” मेहतांच्या चेहऱ्यावर एक निराशेची सुरकुती पडली.
“तुम्ही कुठले?” प्रकाशने प्रश्न केला.
“मी इथलाच. तसा आत्ता इथलाच.”
“आत्ता म्हणजे?” प्रकाशने विचारलं.
हलकेच हसत मेहता म्हणाले, “अरे म्हणजे जन्म झाला तेव्हा गुजराथेत होता म्हणे. मला काही आठवत नाही, बाप सांगायचा. नंतर चौथीपर्यंत कोकणात, मॅट्रीक बेळगाव पास, कॉलेजला नाशिक आणि पुणे, कामासाठी काही वर्ष मुंबईला. आमच्या काळचा एकदम पैसेवाला बिझनेसमन बरं का मी. आणि आता आम्ही नागपूरवासी.”
प्रकाशच्याचेहऱ्यावर आश्चर्य दाटलं. “ अरे बाप फिरतीवर असायचा ना रे. मग त्याच्याबरोबर आई आणि आम्ही दोन लेकरं पण फिरतीवर. त्यामुळे माझ्या भाषेत अधून मधून इकडचे तिकडचे शब्द येतात.” स्वत:च्याच बोलण्यावर ते थोडं हसले.
“आता घरी कोण असतं?” प्रकाश.
ती निराशेची सुरकुती परत मेहतांच्या चेहऱ्यावर आली. “ एकटाच रे एकटाच. बरीच वर्ष झाली एकटाच असतो. माझा भाऊ गेला गुजराथात. बरोबर बापालाही घेऊन गेला. संबंध ठेवले नाहीत नंतर त्यांनी आमच्याशी काहीच. बाप नक्की मेला असेल. भाऊ आहे का नाही त्या बापालाच ठाऊक.”
“संबंध का तोडले?” प्रकाशने आतुरतेने विचारले.
“अरे इंटरकास्ट लग्न केलं ना रे मी. माझी बायको, अस्सल मराठमोळी मुलगी. दोघांच्याही घरच्यांना मान्य नव्हता. मग काय, गेलो पळून!” मेहता अगदी हसून खुशीत हे सगळं सांगत होते.”परत आलो तर भावाने तोंड फिरवलं आणि गेला तिकडे.”
“मग बायको?” – प्रकाश.
मेहतानी दीर्घ श्वास घेतला. “सोडून गेली. माझ्या दहा महिन्याच्या मुलाला घेऊन मला सोडून गेली. अरे भावाने आणि बापाने पाठ फिरवून फार काळ गेला नव्हता आणि..आणि तेवढ्यात ती ही मला सोडून गेली. तिचं जायचं नेमकं कारण काय अजून कळलं नाही हं मला.” मेहतांच्या डोळ्यात पाणी तरळलं.”मुंबईलाच होती म्हणे इतकी वर्ष. मागच्या वर्षी गेली असं कळलं.”
“तुम्हाला कसं कळलं?”प्रकाशचा पुढचा प्रश्न.
“अरे प्रेम करायचा रे तिच्यावर. तिने जरी मला सोडलं असला तरी मी तिला सोडला नव्हता.  माझे काही मित्रलोक होते मुंबईत, त्यांना ठेवला होता खबरी म्हणून.” थोडं हसले आणि म्हणाले,” तिने मला सोडला पण मी काय तिच्यासाठी जगणा सोडला नाही. आशा होती कधीतरी परत येईल म्हणून. चिक्कार पैसा कमवला. हं पण तो माझ्यापुरताच!” मेहता हसण्याखाली त्याचं दु:ख लपवित म्हणाले. “ धंदा बंद करून सुद्धा १०-१२ वर्षं झाली. तेव्हापासून रोज असा बसलेला असतो प्लॅटफॉर्मवर, एकटाच. लोकांची गर्दी बघत, रेल्वेच्या सूचना ऐकत, तिकीट कलेक्टरची मजा बघात आणि असा तुझ्यासारखा कोण भेटला की बसायचं मन मोकळं करत.”
प्रकाश शांतपणे मेहतांकडे बघत बसला. त्याला नक्की काय बोलायचं ते कळेना.
“ए तुला बोर नाही ना झाला रे?आं?”
“छे, उलट बरं वाटलं बोलून.”
तेवढ्यात प्रकाशची गाडी लागली. तो पटकन बॅग उचलून निघाला. दोन पावलं टाकून परत मागे आला आणि चटकन मेहताना नमस्कार केला. “पुन्हा नागपूरात आलो तर नक्की भेटू. येतो.”
मेहता हसून म्हणाले, “पुन्हा भेटायची खात्री नसेल तर जातो म्हणावं.” त्यावर प्रकाश म्हणाला, “मग भेटू पुन्हा!” दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आलं.
प्रकाश गाडीत चढला आणि गाडी मुंबईकडे निघाली.

अपुरी इच्छाWhere stories live. Discover now