191 1 0
                                    

प्रकाश मेहतांच्या बंगल्याच्या दारात उभा राहिला. चांगला दोन माजली मोठा प्रशस्त बंगला होता. बंगल्याभोवती बाग होती. बंगल्यात मात्र काळाकुट्ट अंधार होता. पण दाराला कुलूपही नव्हतं!
थेट बंगल्यात शिरण्यापूर्वी प्रकाशने शेजारच्यांकडे चौकशी करायची ठरविले. मेहतांचा बंगला सोडून दोन घरे पलीकडे असलेल्या घराच्या दारावरची बेल प्रकाशने वाजवली. साधारण २-३ वेळा बेल वाजवल्यानंतर एक तिरसट म्हातारा आतून ओरडत बाहेर आला.
“कोण आहे रे?” म्हातारा खेकसला.
“नमस्कार. मी...”
“रात्रीचे ९ ही काही नमस्काराची वेळ नाही. कामाचं बोला.” इति म्हातारा.
“मला सांगा, या मेहतांच्या घरात...”
प्रकाशचं बोलणं अर्धवट तोडत म्हातारा पुन्हा ओरडला, “कोणी नाही राहात तिथे.” असं म्हणून  म्हातारा  प्रकाशच्या तोंडावर दार आपटणार तेवढ्यात थांबला. दार उघडून त्याने प्रकाशकडे परत एकदा नीट वरपासून खालर्यंत पाहिलं आणि संशयित स्वरात विचारलं, “तुम्ही कोण?”
“मी काही महिने त्यांच्या आश्रमात होतो.”  प्रकाशने जे सुचलं ते ठोकून दिलं.
“तुम्ही त्यांच्या आश्रमात होता म्हणता आणि तुम्हाला एवढी पण माहिती नाही!” म्हातारा पुन्हा खेकसला. “त्या घरात आता कोणीच राहत नाही. आली तर संस्थेची माणसं येतात फक्त.” असं म्हणून म्हातारा दार बंद करायला लागला. त्याला मध्येच थांबवत प्रकाशने त्यांना वर्तमानपत्रातील ती पंच्याहत्तरीची माहिती दाखवली आणि म्हणाला, “तुम्ही ह्याच मेहतांबद्दल बोलत आहात ना?” प्रकाशने खात्री करून घेण्यासाठी विचारलं.
म्हत्ताऱ्याने त्या पेपरकडे एक कटाक्ष टाकला. “तुम्हाला जुने पेपर वाचायची सवय आहे वाटतं?” असं जमेल तेवढ्या उपरोधिकपणे म्हणत प्रकाशच्या तोंडावर दार आपटलं.
‘जुना पेपर’ म्हणल्यावर प्रकाश बातमीच्या पानावरून पहिल्या पानावर आला आणि तारीख बघितली. आणि प्रकाश गारच पडला. ते वर्तमानपत्र एक आठवड्यापूर्वीचं होतं!
प्रकाशला आता काहीच समजत नव्हतं. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घातल्यासारखे त्याला वाटू लागले. तो मेहतांच्या बंगल्यापर्यंत नीट कसा पोचला याचे देखील त्याला आश्चर्य वाटले. पुढे काय करायचे, कसे करायचे ह्यातले काहीच प्रकाशला कळात नव्हते, सूचत नव्हते.
वर्तमानपत्रावरची तारीख बघून त्याचे हातपाय गळून पडले. तो एकटाच त्या निर्मनुष्य रस्त्यावर उभा होता. एकटक शून्यात बघत होता. डोक्यात विचारांचे वादळ उठले होते. पुन्हा एकदा. पुढचा सगळा रस्ता अंधारात होता!
थोडासा भानावर आला तेव्हा त्यांची नजर मेहतांच्या बंग्क्यार पडली. त्य वास्तूकडे बघून एक क्षण त्याला भिती वाटली. त्याचे विचारांचे वादळ सुरूच होते, पण आता त्याने ठाम निश्चय केला होता. ते सगळे गुंतागुंतीचे विचार डोक्यात घोळत असतानाच त्याने मेहतांच्या बंगल्यात पाऊल टाकले.

अपुरी इच्छाWhere stories live. Discover now