प्रकाशच्या हृदयाचा ठोका चुकला. तोंडाला कोरड पडली. क्षणाभर त्याला जीवाचीही भिती वाटली. त्या आवाजाच्या दिशेने तो मागे वळला. कोणीही नव्हतं. कुठलाच सामान्य माणूस हवेत गायब होऊ शकत नाही. पण...पण हा झाला. लांबून कुठूनतरी आवाज येणं शक्य नव्हतं कारण तो आवाज त्याच्या कानात कुजबुजून गेला. आणि असं होतं तर इतक्यात ती व्यक्ती कशी गायब होईल? प्रकाश डोळे फाडून त्या सुन्न रस्त्यावर बघत होता.
इतक्यात परत एक आवाज त्याच्या उजव्या कानात कुजबुजला, “माझ्या मागे.”
प्रकाशने पटकन मान वळवली. पण मागे कोणीच नव्हते. जेव्हा प्रकाशने परत पुढे बघितले, साधारण दहा फूटाच्या अंतरावरून एक काळी आकृती चालताना दिसली. प्रकाश फक्त बघत राहिला. रात्री दोन वाजता त्या निर्मनुष्य रस्त्यावर एक काळी आकृती त्याच्या कानात सांगून त्याला बोलावत होती.
प्रकाशने निश्चयच केला. जर त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील त्याला हे धाडस करणं भागच होतं. जर ही त्याच माणसाची आकृती असेल तर.. पण नाही तो मेहतांना भेटला होता. ही आकृती त्यांची नक्की नव्हती. ही आकृती वेगळ्याच माणसाची होती. तरीसुद्धा त्या आकृतीमागे जावं असं प्रकाशला वाटलं.
तो चालू लागला. त्या आकृतीच्या हालचाली निरखत. प्रकाशला वाटलं , आपण त्याच्या मागून येतोय का नाही हे बघायला एकदा तरी तो मागे वळेल. पण एकदाही मान वळली नाही, म्हणजे खात्री असावी. प्रकाशबद्दल.
आता प्रकाशने त्याचे भविष्य त्या आकृतीच्या हाती सोपवले होते. ती नेईल तसा प्रकाश मागे चालत होता. रात्रीच्या अंधारात परिसर तर काही दिसत नव्हता, पण प्रकाशने तसा प्रयत्नही नाही केला. एका वळणावर प्रकाशला रस्ता जरा ओळखीचा वाटला. तो तसाच चालत राहिला.
एका फाटकापाशी ती काळी आकृती गायब झाली. प्रकाश धावत त्या फाटकापाशी आला. त्याला ती जागा ओळखीची वाटत होती. एक पाऊल मागे सरकून त्याने चंद्राच्या प्रकाशात त्या घराकडे बघितले. हाच. हाच तो बंगला. मेहतांचा बंगला.
प्रकाश डोळे विस्फारून बघत होता. अचानक घराचे दर उघडले. प्रकाश आत गेला. काही तासांपूर्वी जसा तो त्या घराच्या दारात उभा होता तसाच आत्ता पुन्हा एकदा उभा होता. संपूर्ण बंगल्यात पसरलेला तसाच अंधार. तसाच तो एक छोटा दिवा, मेहतांच्या फ्रेमवर प्रकाश टाकणारा. कारण नसताना परत त्याने दिवाणखान्यात नजर फिरवली. परत त्याला एक सावली हालताना दिसली. ती सावली सुद्धा तशीच हलली जशी काही तासांपूर्वी हलली होती. प्रकाशनेही एक पाऊल तसेच टाकले आणि अचानक सावध होऊन त्याने मागे बघितले. पण ह्या वेळी मागे कोणी नव्हते. तो इसमही नव्हता, तो ‘भाऊ’ही नव्हता. आणि इतर कोणीच नव्हते.
पण बाकी सर्व तसेच होते जसे काही तासांपूर्वी प्रकाशाने बघितले होते. पण नजर फिरवताना प्रकाशला एक फरक जाणवला होता. टेबलावरचे कागद. आता मेहतांच्या फ्रेमवर प्रकाश पडणारा दिवा अजून एका गोष्टीवर प्रकाश टाकत होता. त्या कागदांवर.
YOU ARE READING
अपुरी इच्छा
Mystery / Thrillerप्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलां...