प्रकाशने एक पाऊल आत टाकले. परत थांबून चाहूल घेतली. त्याने परत ती सावली कुठे आहे का हे बघायला नजर फिरवली. पण ह्या वेळी त्याला काहीही दिसले नाही. तो सावधपणे त्या टेबलापाशी चालत गेला. कागद हातात न घेता त्यांच्यावर जरा दुरूनच नजर टाकली. ते एक पत्र होतं. त्याच्यासाठी लिहिलेलं. प्रकाशसाठी लिहिलेलं. स्वत:चं नाव वाचून त्याने पटकन ते पत्र हातात घेतलं आणि वाचायला लागला.
‘ प्रिय प्रकाश,
नाव प्रकाशच आहे ना रे अजून? असेल, नाव नाही बदलायची.
मला कल्पना आहे की हे पत्र वाचताना तू खूप गोंधळात पडला असशील. तुला अनेक प्रश्न पडले असतील. आपल्या आयुष्यात काय घडत आहे, काय घडणार आहे याची तुला कल्पना असण्याचे काहीच कारण नाही. पण तुला कल्पना नसण्याची अनेक कारणे आहेत. नशीब म्हण, परिस्थिती म्हण, प्रेम म्हण, तिरस्कार म्हण, स्वप्ने साकारण्याची धडपड म्हण किंवा स्वभाव म्हण. पण एक गोष्ट नक्की की ह्या सगळ्यात तुझी काहीही चूक नाही. तू ह्या पत्रापर्यंत पोचलास हेच खूप आहे.
तसं नेमकी चूक कोणाची हे मलासुद्धा पडलेलं एक कोडंच आहे. ह्या कोड्याचं मला कधी उत्तर सापडलं नाही आणि मी तसे प्रयत्नही केले नाहीत. नशिबाला दोष दिला आणि पुढे चालत राहिलो.
माझी माझ्या बायकोकडून एवढी एकच इच्छा होती की, तिने आमच्या मुलाला माझ्याबद्दल किमान सांगावे तरी! एकटी असली तरी ती तुला नीट वाढवेल ह्यात शंकाच नव्हती. पण केवळ काही वर्षे सुख बघायला मिळाले नाही म्हणून आयुष्यभर तिने तुला अंधारात ठेवले. मी लोकांची मदत करतो हे आवडायचं नाही तिला. अर्थात तिला मी छान आरामात जगावं असंच वाटत असेल. पण फक्त तिच्या हट्टापोटी मला तुला आयुष्यभर भेटता आलं नाही.
खरं तर ह्यातसुद्धा माझीच चूक म्हणावी लागेल. मीच तुला सुखात ठेवू शकलो नाही. पण थोडा वेळ थांबायचं ना रे! आं? तुला हाच प्रश्न पडला असेन ना आता..माझी भाषा..माझ्या आड..
आपल्या आडनावावर जाऊ नकोस, मला शुद्ध पुणेरी मराठी पण येते आणि ग्रामीण पण..
होय! आपलंच आडनाव. मी तुझा बाप. जनार्दन मेहता.’

YOU ARE READING
अपुरी इच्छा
Mystery / Thrillerप्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलां...