182 0 0
                                    

रात्रीचे साधारण दहा-साडे दहा वाजले होते. शहर जागे असले तरी तो परिसर मात्र शांत होता. निवृत्त झालेल्या श्रीमंत व्यावसायिकांच्या त्या विशाल बंगल्यांच्या गर्दीत भलतीच शांतता होती. रस्त्यावरच्या दिव्यांचासुद्धा फारसा प्रकाश पडत नव्हता. वातावरणात एक वेगळाच गारवा निर्माण झाला होता. अशीच एक वाऱ्याची झुळूक प्रकाशच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली. हा गारवा त्याच्यासाठी अजून अजून थरारक अनुभव घेऊन येत होता. पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर संथ वाहत असलेला वारा त्याच्या मणक्यापर्यंत जात होता. त्याच घाबरलेल्या अवस्थेत तो घराच्या दाराकडे बघत उभा होता. त्या आतल्या दारालाही कुलूप नव्हते. फक्त कडी लावली होती. त्याच्या हृदयाच्या धडधडीपुढे कडी उघडण्याचा आवाजसुद्धा फिका पडला. दार उघडलं. आत काळाकुट्ट अंधार पसरला होता. दिवाणखान्याच्या मध्यभागी भिंतीवरच्या मेहतांच्या फ्रेमवर उजेड टाकणारा दिवा मात्र तेवढा सुरु होता. दोन मिनिटे प्रकाश ती खोली निरखत उभा होता. प्रत्येक सेकंदाबरोबर त्याचा श्वासोच्छ्वास आणि डोक्यातले विचार वाढतच होते. आजूबाजूला सर्वत्र निरव शांतता पसरली होती. खोलीभर नजर टाकत असताना त्याला कुठेशी एक सावली थोडीशी हलल्यासारखी वाटली. 
प्रकाशने अत्यंत सावधपणे आत पाऊल टाकले. त्याच वेळी मागून कोणीतरी त्याची कॉलर पकडली. प्रकाशने पटकन मागे वळून पाहिलं.
“काय रे ए! चोरी..चोरी करायला आलास ना इथे?” एका मर्दाचा भारदस्त आवाज खोलीभर घुमला. आणि त्याचबरोबर प्रकाशच्या एक सणसणीत कानाखाली बसली. आपल्याबरोबर नक्की काय घडतंय हे कळायच्या आधीच त्या इसमाने त्याला कॉलरला धरून बाहेर ओढत आणलं. बाहेर अजून ३-४ माणसे उभी होती.
“चल रे. गाडी काढ. ह्याला पोलिसात देऊ.” दुसऱ्या व्यक्तीने लगेच गाडीचं दार उघडलं.
“भाऊ, तू घरी थांब. आम्ही येतोच.”
त्या आडदांड इसमाने प्रकाशला गाडीत कोंबले आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारीच आली. त्याने फक्त गाडी सुरु होण्याचा आवाज ऐकला आणि पुढे त्याला काहीच समजेनासे झाले.

अपुरी इच्छाWhere stories live. Discover now