173 0 0
                                    

प्रकाशने डोळे उघडले. स्वत:चा जबडा जरा वाकडा-तिकडा हलवत तो सरळ बसला. आजूबाजूला बघितल्यावर त्याला जाणवलं, की तो तीन बाजूने बंद असलेल्या आणि एक दार असलेल्या एका खोलीत आहे. पण ती कोठडी नाही हे कळण्याइतपत तो भानावर आला होता.  पोलिस ठाण्यामधल्याच एका खोलीत तो बाकावर बसला होता. बाहेरच्या खोलीत सुरु असलेल्या पोलिस आणि त्या इसमामधील संभाषण त्याला ऐकू येत होते.
“अहो काय हे? चोर म्हणण्यासारखा दिसतो तरी का तो? जरा कपडे बघा त्याचे.” त्या इसमाने एकदा स्वत:च्या कपड्यांकडे नजर टाकली आणि आत प्रकाशने.
“आता पोलिसाची नजर चुकत नाय. बरोबर आहे तुमचं. पण तरी एकदा तपासणी केली का साहेब?”
“हा काय सवाल झाला का आता? तुम्ही मेहता साहेबांची माणसं म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून त्याचं पाकीट तपासलं. तर बघा काय मिळालं”, असं म्हणत साहेबांनी प्रकाशच्या पाकिटातील दोन कार्ड त्या इसमाच्या समोर ठेवली. “कंपनीचं नाव वाचलं का? शिक्षण बघितलं का? अहो मुंबईवरून आले आहेत.”
“आता ते मला कसं कळायचं साहेब?”
“कसं म्हणजे? ठाण्यात आणायच्या आधी विचारता नाही आलं का तुम्हाला त्यांना? का धरली कॉलर, आपटलं ठाण्यात.” साहेबांनी जरा वर्दीतला आवाज लावला.
“आता येवढे शिकलेले हायेत तर चोर म्हणल्यावर ऐकून कसं घेतील?  काही म्हणायला नको का की दादा मी चोर न्हाई. कमीत कमी हात उचलल्यावर तरी बोलावं मानसानं काहीतरी. पण ते काहीच बोलेना. आम्हाला वाटलं चोरी पकडली म्हनून मूग गिळून गप बसला असल.” त्या इसमाच्या आवाजात प्रकाशला चांगलाच फरक जाणवला.
तेवढ्यात साहेबांच्या टेबलावरचा फोन वाजला. “हॅलो, इन्स्पेक्टर..” साहेबांचं वाक्य अर्ध्यातच थांबलं. “हो हो, देतो एक सेकंद.”
“ओ तुमच्यासाठी आहे” असं म्हणून साहेबाने फोन त्या माणसाच्या हातात दिला.
साधारण दोन-मिनिटे तो इसम फक्त ऐकतच होता. काहीच बोलला नाही. शेवटी “अस्सं होय” म्हणून त्याने कपाळावर हात मारून घेतला. “माफी, माफी. लगेच आणतो त्यांना...अच्छा..हो हो..बरं.” म्हणून त्याने फोन ठेवला. लगेच हाक आली “अहो प्रकाशराव.” ए चोराचा ‘प्रकाशराव’ झालेला ऐकून प्रकाशच्या आणि साहेबांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. प्रकाश शांतपणे बाहेच्या खोलीत आला.
“अहो काय प्रकाशराव तुम्ही, सांगायचं ना आम्हाला.”
“काय?” प्रकाश.
“अहो तुम्ही आमच्या मालकांचे पाव्हणे. लगेच सांगायचं ना. आम्हास्नी कसं कळणार? माफी हां.” 
त्या माणसाच्या माफीला काय प्रतिक्रिया द्यावी हे प्रकाशला कळत नव्हते. त्याच्या डोक्यात एकच शब्द अडकला होता “मालक.”

अपुरी इच्छाWhere stories live. Discover now