220 0 0
                                    


नागपूर स्टेशनच्या जवळ शिरवळकरांनी गाडी थांबवली. “इथून ५ मिनिटांच्या अंतरावरच आहे माझं ऑफिस. मी जातो इथूनच. तुम्ही जा तुमच्या मित्राकडे.” प्रकाश म्हणाला.
“नक्की?” शिरवळकर.
“हो काका, खरचं जातो मी इथून. जवळच आहे.”
“तसं माझ्या मित्राचं घर पण इथून फार काही लांब नाही. ५-६ किमी.च असेल.” काका म्हणाले.
“बरं बरं , मी पळतो आता. आणि हो.. थँक्यू!”प्रकाश निघता निघता म्हणाला.
“यू आर मोस्ट वेलकम हो!” शिरवळकर उपरोधिकपणे पण गंमतीने म्हणाले.”मुंबईला निघताना फोन कर म्हणजे परत एकत्रच जाऊ.”
“हो चालेल.” प्रकाश म्हणाला आणि काकांनी गाडी सुरु केली.

प्रकाश त्या स्टेशनवरच्या गर्दीत घुसला. त्याच प्लॅटफॉर्मवर. साधारण तीच वेळ. तीच मुंबईला जाणारी गाडी समोर दिसत होती. प्रकाशला वाटायला लागलं की परत तो माणूस दिसेल..तिथेच..त्या चहाच्या टपरीजवळ..पण नाही. आज तो बाक रिकामा होता.
प्रकाश त्या चहावाल्यापाशी गेला. “बोला साहेब, कटिंग का फुल?” चहावाल्याने नेहमीचा प्रश्न टाकला.
“एक कटिंग दे.”प्रकाश इकडे तिकडे बघत म्हणाला.
प्रकाशने चहा घेत घेत विचारलं,” काय रे, ह्या बाकावर रोज एक आजोबा बसायचे ना?”
“काय पन सवाल करता साहेब तुम्ही, रोज शेकडो म्हातारी टाळकी असतात इथं. आमी काय त्यांच्याकडं बघत बसू का? कोण बसतं , कोण जातं काय माहित आता..” चहावाला दुसऱ्या गिऱ्हाईकाला चहा देता देता म्हणाला.
त्यावर काय बोलावं प्रकाशला कळेना. त्याने कप ठेवला आणि पैसे देऊन बाहेर जाण्याच्या मार्गाला लागला. वाटेत त्याला पेपरवाला दिसला म्हणून थांबला. त्याने गठ्ठ्यातला एक पेपर घेऊन चाळायला सुरुवात केली. मधल्या पानावर पोचताच त्याचे डोळे पुन्हा मोठे झाले. त्यावर ठळक अक्षरात बातमी होती “समाजसेवक मेहता यांची पंच्याहत्तरी उत्साहात साजरी.”

अपुरी इच्छाWhere stories live. Discover now