343 0 0
                                    

दारावरची बेल वाजली. सुनंदाने दार उघडलं आणि प्रकाशने पटकन हातातल्या दोन्ही बॅगा खाली ठेवल्या. त्याने त्याची लॅपटॉपची बॅग सुनंदाच्या हातात दिली आणि कोचावर येऊन पडला.
“काय रे? जास्त दमला आहेस?” तिने बॅग आत नेत विचारलं.                    
“फार नाही तसं, पण थोडा दमलो आहे.” तो उसासा सोडत म्हणाला.
थोड्याच वेळात सुनंदाने सवयीप्रमाणे चहा आणि पेपर प्रकाशच्या समोरच्या टेबलावर ठेवला. प्रकाशने चहाचा घोट घेतला आणि पेपर वाचायला लागला. त्याने मधलं पान उघडलं आणि त्यावरची बातमी वाचताच त्याचे डोळे मोठे झाले. त्याने पटकन कप खाली ठेवला आणि ताडकन उठून उभा राहिला.
“अगं ए...सुनंदाsss” त्याने जोरात हाक मारली. सुनंदा लगबगीने बाहेर आली.
“काय रे, काय झालं एवढं ओरडायला?” तिला त्याच्या आश्चर्यचकित चेहऱ्याचा अंदाज येत नव्हता.
“मला सांग, हा आजचाच पेपर आहे?”
“नाही, तुला दोन दिवसांपूर्वीचे पेपर दिले ना मी.” सुनंदाला काहीच अंदाज येत नव्हता.
“अगं, कसं शक्य आहे?” तो हतबल होऊन उद्गारला.त्याने टेबलाचा आधार घेत पुन्हा  नीट वाचले. त्याला खूप मोठा धक्का बसल्यासारखं सुनंदाला वाटलं. “का? का नाही शक्य?” तिने विचारलं.
“अगं, हे वाच, ही बातमी. नागपूरमधील ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन मेहता यांचे निधन. बरेच दिवस प्रकृती ठीक नसल्याने ते नागपूरच्या मनोहर खाजगी रुग्णालयात होते. काल रात्री १ वाजता त्यांचे दु:खद निधन झाले. जनार्दन मेहता यांचे कोणीच नातलग न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले.” प्रकाश अगदी अस्वस्थ होऊन बातमी वाचत होता.
“मग, त्यात शक्य नसायला काय झालं?” तिला अजूनही प्रकाशला नक्की काय म्हणायचे आहे ते कळेना.
“अगं, तू म्हणलीस हा पेपर दोन दिवसांपूर्वीचा आहे. पण मी ह्या माणसाला काल भेटलो!” प्रकाशचं बोलणं ऐकताच सुनंदा अवाक् झाली. तो जे बोलत होता ते खरंच वाटत नव्हतं.
“काय?” तिने परत विचारलं. “अगं हो! मी ह्या माणसाला काल भेटलो नागपूर स्टेशनवर.”
“चल, काहीतरीच काय? कसं शक्य आहे?” ती म्हणाली. “ते मला पण काळत नाहीये सुनंदा की ज्या माणसाचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालं तो माणूस मला काल कसा भेटला!” प्रकाशला काहीच सुधरेना. तो खाली बसला.
“असं कसं होईल अरे? तुला भास झाला असेल.” सुनंदा त्याचं बोलणं फेटाळत म्हणाली.
“दीड तास!” प्रकाशने जरा आवाज लावला. “भर संध्याकाळी, माणसांनी गचागच भरलेल्या स्टेशनवर एका म्हाताऱ्याशी मी दीड तास गप्पा मारत असल्याचा भास झाला!! अगं मी काय मनोरुग्ण आहे का? आणि ह्याच माणसाचा कसा भास झाला? ह्याला मी कधी पाहिलेलं नाही आणि त्याचा मला दीड तास भास झाला असं म्हणतेस तू??”
“ते मला काय माहित? तुला काय मेलेली माणसं दिसतात का?” आता सुनंदाची चिडचिड व्हायला लागली होती. तिच्या दृष्टीने त्याचं बोलणं निरर्थकच होतं.
“मला काय माहित म्हणजे? काय म्हणायचं आहे तुला? मी काय गंमत करतोय?”   
आता दोघांमध्ये वादाचे स्वर लागले. “ ते काही मला माहित नाही. मेलेली माणसं दिसत नाहीत एवढं नक्की.”
“अगं पण मी तुला सांगतोय ना की ह्या जनार्दन मेहताला मी काल भेटलो, बोललो त्याच्याशी. काय छान माणूस होता सांगू तुला.” प्रकाश अगदी त्याच्या नात्यातलं कोणीतरी गेल्यासारखं गहिवरून बोलत होता.
सुनंदा आत जाऊन तिच्या कामाला लागली. ती त्याचं बोलणं फक्त कानावर घेत होती. ती खरंच किती ऐकत होती तिलाच ठाऊक. पण प्रकाश मात्र मनापासून द:खी झाला होता.
“इतका गंमतीशीर म्हातारा मी आजपर्यंत पहिला नाही. आयुष्यात एवढं दु:ख सोसूनसुद्धा ओठांवरचं हसू कुठे जात नव्हतं. त्यांनी इंटरकास्ट लग्न केलं म्हणून त्याच्या भावाने आणि वडिलांनी पाठ फिरवली. त्यानंतर दोनच वर्षांनी त्याच्या १० महिन्यांच्या मुलाला घेऊन बायको सोडून गेली. तरीसुद्धा हा माणूस थांबला नाही. त्यांच्या काळातला श्रीमंत माणूस होता म्हणे तो. त्याने त्याच्या बायकोच्या काळजीपोटी तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या मुंबईमधल्या मित्रांना खबऱ्या म्हणून ठेवलं होतं. आणि त्यांची शेवटची खबर म्हणजे त्यांची बायको मागच्या वर्षी गेली. सुनंदा तुला सांगतो, हे सांगतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं गं! ‘आयुष्यात सारं काही बघून झालं’ या भावनेचं हसू. ते बघून माझ्याच काळजात चर्रर्र झालं.”
क्षणभर थांबून प्रकाश आठवत म्हणाला, “ त्यांनी त्यांच्या आईबद्दल नाही सांगितलं काही.”
“मग विचारायचसं ना आपणहून” सुनंदा आतून कडकडली. “एवढ्या चौकश्या करून झाल्याच होत्या तर त्याच्या आईबद्दल पण विचारून घ्यायचं. तेवढंच कशाला..त्याच्या आख्ख्या खानदानाची माहिती काढून घ्यायची ना.” प्रकाशने आल्या आल्या हे मेहतापुरण सुरु केल्यामुळे सुनंदा वैतागली होती.
“हे बघ, मी विचारत नव्हतो त्यांना. ते स्वत:हून बोलत होते. मन मोकळं करत होते त्याचं.”प्रकाश.
“हो ना! आणि तू गोष्ट ऐकावी तसं ऐकत बसलास. काय रे त्या मेहतांच एवढं. कोण कुठला मेहता, तुला काल भेटला काय आणि दोन दिवसांपूर्वीच्या पेपरात त्याच्या निधनाची बातमी आली काय! आणि तुला काय रे काळजी त्यांची एवढी? एवढ्या कसल्या चौकश्या? स्वत:च्या वडिलांबद्दल कधी विचारलस का एवढं आईंना?” सुनंदाने आता थेट घाव घातला. “ मागच्या वर्षी आई गेल्या. तेव्हा तरी त्यांनी काही सांगितलं? तू काही विचारलंस? का नाही? नाही माहित वडिलांबद्दल तर नाही माहित. काय करायचं आहे जाणून आता? हो ना!” सुनंदा उपरोधाने म्हणाली. “काही तरी कोण त्या मेहताचं सांगत बसला आहेस मला.”
“विचारलं होतं ना, विचारलं होतं” प्रकाश राग आवरत म्हणाला. “माझ्या शेवटच्या वर्षाच्या निकालाच्या दिवशी विचारलं होतं मी आईला. ती म्हणाली, ‘फसवणूक झाली रे माझी, फसवणूक झाली.म्हणाला होता, प्रेम करतो तुझ्यावर. सुखात ठेवीन. म्हणून मी पण लग्न केलं त्या माणसाशी. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन लग्न केलं. त्याच्या घरी गेलो तर त्याच्या घरच्यांनी नातं तोडलं. कसलं सुख आणि कसलं काय? त्याच्याकडे ना पैसा, ना धड नोकरी. तो काय मला सुखात ठेवणार? मूल झालं तर नोकरी करेल म्हणून तू झालास. पण तो काही सुधारला नाही. माझी नाही कधी घरात मदत केली, पण लोकांच्या घरी जाऊन मदत करणार हा. शेवटी तुला घेतलं आणि आले मुंबईत.दहा महिन्याचा होतास फक्त. तेव्हा एक छोटी खोली घेतली, नोकरी केली, तुला एवढं मोठं केलं, शिकवलं. पण ह्या माणसाचा कधी फोन नाही की पत्र नाही.”
“नाव काय होतं त्यांचं?” सुनंदाने विचारलं.
“ते मात्र तिने शेवटपर्यंत नाही सांगितलं. मागच्या वर्षी ती जाण्यापूर्वी जेव्हा आजारी होती तेव्हा पण विचारलं मी. पण नाही सांगितलं.” प्रकाश हताश होऊन म्हणाला.
“सॉरी. जरा जास्त बोलले मी.” सुनंदा शांत होत म्हणाली. “हे तू आधी का नाही सांगितलंस मग मला?”
“नाही सांगावसं वाटलं” प्रकाश म्हणाला.
“म्हणजे? ते मेहतांचं बरं सांगावसं वाटलं!”
प्रकाशने चटकन तिच्याकडे रोखून पाहिलं.
“बरं बरं सॉरी”, सुनंदाने लगेच माघार घेतली. “पण मला सांग, आईच्या माहेरच्यांनी का नातं तोडलं?”
“इंटरकास्ट लग्न केले ना तिने. पळून गेली. म्हणाली तो माणूस म्हणजे माझे वडील जेव्हापासून आयुष्यात आले आहेत तेव्हापासून सगळी नाती तुटत गेली.” प्रकाश.
“आणि अजून एक प्रश्न. विचारू ना?” सुनंदाने जरा अंदाज घेत विचारलं.
“हं”, त्याने कोरडा होकार दिला.
“तुझी आई मुंबईत आली म्हणजे आधी कुठे होती?”
“लग्नानंतर दुसरीकडे होती ना. कुठे होती बरं..?” प्रकाश आठवत म्हणाला, “हं, नागपूरात..” तो म्हणाला खरं सहज, पण लगेच त्याचे डोळे मोठे झाले.
“छे छे! असं कसं होईल?” प्रकाश स्वत:शीच पुटपुटला.
“काय कसं होईल?” सुनंदा.
पण प्रकाशचं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो स्वत:शीच विचार करत काहीतरी बोलत होता. ‘आई म्हणाली होती की फार गरीब परिस्थिती होती. पण मला भेटलेले तर म्हणाले होते की ते खूप श्रीमंत होते....”
प्रकाश काय आणि कशाबद्दल होलात होता ते सुनंदाला काहीच काळात नव्हतं.
“कशाबद्दल बोलत आहेस अरे?”                                                                 
“हां..काय?” प्रकाश भानावर आला.                                                     
“काही नाही, जेवणाचं काय आहे?” सुनंदा जरा तणतणतच स्वयंपाकघरात गेली. पण प्रकाश तिथे सोफ्यावर बसून राहिला. त्याची विचारचक्रे आता वेगाने फिरु लागली होती.

अपुरी इच्छाWhere stories live. Discover now