आई काय करते
भाग ३
आता सरांना सुद्धा उत्सुकता लागली होती की या सुंदर मुलीची आई कशी दिसत असेल, म्हणून त्यांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम वर जाऊन श्यामलीचे प्रोफाइल चेक केले. जेणेकरून तिच्या आईचा फोटो नजरेस पडावा. श्यामलीचे प्रोफाइल सरांना लगेच सापडले पण तिचे प्रोफाइल लॉक होते. तिथे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सुद्धा श्यामली ते ॲक्सेप्ट करेल याबाबत शंकाच होती. अशा प्रकारे श्यामलीची आई बघण्याचा हा प्रयत्न फोल ठरला. पण सरांच्याच आतले जनावर त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.दुसऱ्या दिवशी सरांनी श्यामली पुढे नवा डाव मांडला. तिला सर्व वर्गासमोर फळ्याजवळ उभे करून तीन अवघड गणिते घातली. हि गणिते बरीच अवघड होती.
ती ड गटातील म्हणजे पुस्तका बाहेरील पण अभ्यासक्रम निगडित गणिते होती. पण पूर्व सरावा शिवाय सोडवणे हे अवघड होते. नेमके श्यामलीला पण जमले नाही. सर श्यामली वर नाराज झाले. श्यामली मात्र सॉरी सॉरी बोलून त्यांची माफी मागत होती. पण सर तिच्याकडे सहानुभूतीने पाहण्यास तयार नव्हते. शेवटी सरांनी ज्या गोष्टीसाठी घाट घातला होता तेच केले. सर तिला म्हणाले की उद्या शाळा सुटली की तुझ्या आईला मला भेटायला बोलव. जर उद्या तुझी आई आली नाही तर परवा माझ्या वर्गात बसू नको.
असे तडकाफडकी सांगितल्यावर श्यामली साठी कोणतेच मार्ग राहिले नाहीत. जणू काही एखाद्या नेत्याला इडीची नोटीस आल्यावर त्याला सर्वच रस्ते बंद होतात. तसेच काही श्यामली बरोबर झाले. घरी जाऊन तिने सर्व कहाणी आपल्या आईला सांगितली.. आई पण थोडी चिंतेत आली.. पण दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर ती श्यामलीच्या शाळेत गेली. सर्व मुले शाळेतुन गेल्यावर शाळा जवळपास रिकामी झाली. तेव्हा श्यामली आणि तिची आई ही रोहित सराच्या वर्गात गेली. रोहित सर वर्गात बसून काही नोटबुक चेक करत होते. वर्गात एकही विद्यार्थी नव्हता. वर्गातील फॅन गरागरा असे फिरत होते. जणू काही सर्व फॅन फिरता फिरता डोळे वटारून ते श्यामली कडे बघत होते. श्यामली तर त्यांना रोजच दिसत असेल. पण आज श्यामली बरोबर श्यामलीची आई सुद्धा हजर होती.