भुताचा पोस्टमन

18 0 0
                                    

© Copyright (2019)
by (Yogesh Rangnath Nikam) - All rights reserved.

It is not legal to reproduce, duplicate, or transmit any part of this document in either electronic means or printed format. Recording of this publication is strictly prohibited.

ही हास्य तसेच भयकथा पूर्णपणे काल्पनिक असून तिच्याशी, तिच्यात आलेल्या व्यक्तींशी, स्थानांशी कुणाचे नामसाधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.

ही कथा फक्त मनोरंजन करण्याच्या अगदी स्वच्छ हेतूने लिहिलेली असून वाचकांनी तिचा, त्याच दृष्टीने आस्वाद घ्यावा.

‘भुतेखेते म्हणजे मानवी मनाच्या ‘भय’ या भावनेस पछाडणारे काल्पनिक भ्रम असतात हे लेखकाचे अगदी स्पष्ट मत आहे’ याची नोंद घ्यावी.



एक

“ओ आजोबांनो, ‘धोंडो कुलकर्णी’ आहे का या गावात कुणी? सगळा गाव शोधून दमलो बघा. काय कुठे पत्ता लागत नाही.” विशीबावीशीचा पोस्टमन पारावर बसलेल्या म्हातार्‍यांना विचारात होता. पन्नास-साठ कुटुंबं असलेल्या ‘दोन पांदी’ या गावात यायची त्याची ही पहिलीच वेळ होती. गाव कसलं, वाडीच म्हणायची ती. पोस्टमन पारावर आला त्यावेळी दुपारचा एक वाजला असल्याने डोक्यावरचा नारायण भयंकर तापला होता. त्यातच हवासुद्धा पडलेली असल्याने घामाळ वातावरणात फारशी हालचाल नव्हती.

“कोण रं बाबा तू? नवखा दिसतो आमच्या गावात.” सत्तरीतल्या एका म्हातार्‍याने विचारले.

“आसं काय करतो आप्पा. डरेसवरून ओळखाया येतंय नव्हं. पोस्टमास्तर हायेत ते. पण आमचे समाधानपंत पोस्टमास्तर कुठशी गेले म्हणायचे न सांगता?” दूसरा एक म्हातारा म्हणाला.

“पोस्टमास्तर नव्हे पोस्टमन. मी विकास. या गावचा नवा पोस्टमन. सहा महिन्यांपूर्वीच लागलोय पोस्टात. ट्रेनिंग पूर्ण झालं आणि या पंचक्रोशीची जबाबदारी दिलीये माझ्याकडे पोस्टखात्यानं. कारण तुमचे समाधानपंत समाधान पावले ना. म्हणजे रिटायर्ड झाले बाबाहो. ते जाऊ द्या. ‘धोंडो कुलकर्णी’ आहे का कुणी या गावात ते सांगा.” पोस्टमनने आपली सविस्तर ओळख करून दिली.

“अशे कशे? ‘समाधान गेले आणि विकास आला’ अवघडच आहे म्हणायचं. खरंतर गरज नसताना ‘विकास करण्याची खुमखुमी’ आधी निर्माण झाली आणि त्यामुळे मग ‘समाधान भंग पावलं’ असा क्रम असायला हवा.” चश्मा जरा आणखी बुब्बुळांशी भिडवत, छानपैकी कपडे केलेल्या एका शिडशिडीत आजोबांनी कोटी केली.

“तुम्हीच रिटायर्ड मुख्याध्यापक कदम असणार. बरोबर ना आजोबा?” पोस्टमन त्यांच्याकडे वळून शेवटच्या शब्दांशी हेल काढत पुढे म्हणाला, “तुमच्या घरी हेडमास्तरीणबाई संतापल्यात. तुम्ही कुठं दिसलात की सरळ घरी धाडून द्यायची सक्त ताकीद दिलीये त्यांनी मला.” पोस्टमनचं बोलणं ऐकून कदम मास्तर गडबडले. चपला घालत ते निघणार तेवढ्यात,

“अशे कशे? अशे कशे? माझा प्रश्न न सोडवताच कुठे निघालात गुरुजी? तुम्ही मुख्याध्यापक. सगळ्यांचे दाखले लिहिणारे. आठवा, जरा पटसंख्या आठवा. येतोय? कुणी येतोय ‘धोंडो कुलकर्णी’ नावाचा विद्यार्थी डोळ्यांसमोर?” पोस्टमनने अडवले तसे डोळ्यांसमोर उभा राहिलेला आपल्या बायकोचा संतापलेला चेहरा, चश्म्यासह बाजूला सारून, कदम सर पुन्हा चपला काढत पारावर मांडी घालून बसले.

“धोंडो कुलकर्णी म्हणजे... कुणाचा कोण असावा बरे हा मुलगा? व्रात्य होता की शांत? हुशार होता की ढ? आं..” गुरुजींनी तंद्री लावली.

“नाय आठवायचं बगा तुम्हाला कदम गुर्जी. तुमच्या पटावर नवतं बगा ‘धोंडो भडजी’. साठ वर्सामागंच माती झाली त्यायची. या आप्पालाबी नाय आठवायचं कायी. मीच पंधरा वर्साचा व्हतो तवा. आख्ख्या गावात ‘लिवणं-वाचणं’ करणारं ते एकटंच होतं बगा. गेलं तवा काय पन्नास वर्साचं आसंल.” बर्‍याच वेळापासून विचार करत बसलेल्या साधारण पंचाहत्तरीतल्या रामाबांनी सांगितले.

“काय? हाऊ इज पॉसिबल? त्यांच्या नावाने पत्र कसं येऊ शकतं मग?” पोस्टमन जरा उडालाच.

“अशे कशे? साठ वर्षांपूर्वीच देवाघरी गेलेल्या धोंडो कुलकर्णींना आज कोण बरे पत्र पाठवणार? दाखवा. कसलं पत्र आहे ते पाहू.” वरच्या खिशातला चश्मा काढून तो डोळ्यांवर चढवत कदम गुरुजी म्हणाले.

“अशे कशे? अशे कशे? त्यांचं पत्र मी तुम्हाला कसं देणार गुरुजी? चला जाऊ द्या. माझं काम तर झालं. ‘धोंडो कुलकर्णी’ हयात नाहीत असे लिहून मी पत्र आल्या ठिकाणी परत पाठवून देतो.” असे म्हणत त्या विकास नावाच्या पोस्टमनने काढता पाय घेतला.

______________________________

भुताचा पोस्टमन Where stories live. Discover now