सहा
“चला बसा पटकन.” बाकीचे स्वारगेटला जमा झाले तोपर्यंत संतोष आपल्या बोलेरोमधून सोनाली आणि विशाखाला घेऊन आला होता. गाडी निघाली तेंव्हा रात्रीचे बारा वाजले होते.
“विकासला भ्रम झालाय. तो सांगत असलेली सगळीच कहाणी असंबद्ध आहे. हे असं कुठल्यातरी प्रचंड मानसिक दबावामुळे होऊ शकतं. तो पुण्यात होता तोपर्यंतचं त्याचं सगळं बॅकग्राऊंड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पुणे सोडल्यावर नेमकं काय झालं? याबद्दल कुणाला काही माहिती आहे का?” सगळ्यांच्याच मनात काय शंका असतील याचा अंदाज घेऊन पुष्कराजने चर्चेला सुरवात केली. गाडी आता पुणे सोडून सोलापूर हायवेला लागल्याने सुसाट धावत होती.
“मी काही एम.पी.एस.सी. पास होणार नाही’ असे म्हणून तो पुण्यातून गावी निघून गेला तो गेलाच. नंतर तो पोस्टात लागल्याचंदेखील फोनवरच कळालं ना आपल्याला. त्यानेच सांगितलं तसं. याच्यापलीकडे मला नाही वाटत की कुणाला काही ठाऊक असेल म्हणून.” संतोष म्हणाला तशी सगळ्यांनी सहमती दर्शवली. संतोष हाच विकासचा सर्वात जवळचा मित्र असल्याने त्याच्यापेक्षा जास्त कुणाला काही माहिती असण्याची शक्यताही नव्हती.
“त्याचा फोन कसा बंद झाला असेल पण?” आकांक्षा काळजीत पडली होती.
“अगं, काहीही होऊ शकतं. खेड्यातलंच मोबाइल टॉवर ते. रेंज गेली असेल किंवा फोनची बॅटरी संपली असेल.” गाडी चालवणार्या संतोषशेजारी बसलेला नीलेश स्वत:लाच समजावण्यासाठी म्हणाला खरा, पण त्यालाच ते पटत नव्हतं. शेवटी, “तूच सांग पुष्कराज.” असं म्हणून त्याने मागे पहिले.
“तू म्हणतो तसं झालं असेल तर उत्तमच. शेवटी तिथे गेल्यावरच समजेल नेमकं काय झालं ते. बरं, आता झोप काढून घ्या सगळ्यांनी. उद्या नेमकं काय वाढून ठेवलं असेल समोर कुणास ठाऊक.” असं म्हणून पुष्कराजने बोलणं टाळलं. शेवटचं वाक्य तो हळूच स्वत:शी म्हणाला.
______________________________