सव्वीस
एका वर्षांनंतर...
“कसे आहेत ते? काही सुधारणा?” येरवडयाच्या वेड्यांच्या हॉस्पिटलमधे पोहोचलेली विशाखा डॉक्टरांना विचारत होती.
“काहीच नाही. तो फक्त आमच्याकडून कोर्या वह्या व पेन्सिल घेऊन आपल्या खोलीत काहीतरी करत बसतो. त्या वह्यांमधे काय आहे ते कळालं तर त्याच्यावरच्या उपचारांमध्ये काही मदत होण्याची शक्यता आहे. तो त्या वह्या फक्त तुम्हालाच देणार असं म्हणतोय. त्यामुळे आम्ही तुम्हाला बोलावलं.” डॉक्टर म्हणाले.
“माझीही खूप इच्छा होती याआधी त्याला भेटायची. पण धाडसच झालं नाही.” विशाखा केविलवाण्या स्वरात म्हणाली. तिचा तो स्वर ऐकून डॉक्टरांनाही गलबलून आलं.
“समजू शकतो आम्ही.” डॉक्टरांना सगळी हकीकत माहिती होती.
“मी भेटू शकते त्यांना?” विशाखा मनाशी हिम्मत बांधत म्हणाली.
“अर्थातच.” असं म्हणून डॉक्टरांनी वॉर्डबॉयला बोलावण्यासाठी बेल मारली.
______________________________विशाखाच्या भेटीनंतर दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी...,
तीस वर्षांपूर्वी भूकंपात गडप झालेल्या ‘दोन पांदी’ या छोट्याश्या गावात, एक वर्षापूर्वी घडलेल्या विचित्र घटनांचे साक्षीदार असलेल्या पीयूष या कॉन्स्टेबलने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘दोन पांदी’तील घटनेचा त्यांच्यावर प्रचंड आघात झाल्याने ते मनोरुग्ण झाले होते. यासंदर्भात हाती आलेली अधिक माहिती अशी की, ‘दोन पांदी’तील काही घटनांची साक्षीदार असलेली दुसरी तरुणी ‘आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी’ पीयूष यांना भेटायला आली होती. या तरुणीच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव रुग्णालय तसेच पोलिस प्रशासनाने तिच्या संबंधी काहीही माहिती जाहीर करण्यास नकार दिलेला आहे.
_________________________________________
दहा वर्षांनी वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी...,