दोन
“साला, काय भंकस करून ठेवलीये लोकांनी तुझ्या नावाची. ह्या.. ह्या.. ह्या.. हा घ्या म्हणा आमचा ‘विकास’. ह्या.. ह्या.. ह्या..” संतोष म्हणाला त्यावेळी विकास पोस्टमनची आपल्या जिवलग मित्रांशी मोबाइलवर ग्रुप कॉलिंग चालू होती. विकासने सांगितलेला किस्सा ऐकून फोनवरचे सगळेच मित्र हसत होते.
“आणि गावाचं नाव तरी काय? तर ‘दोन पांदी’ आहे म्हणे. फांदी ऐकली होती बाई. ही पांदी कुठून आली मधेच?” विशाखाने विचारले.
“ए कॉन्वेंट. पूर्वी खेडेगावातल्या छोट्या मातीच्या रस्त्याला ‘पांदी’ म्हणत हं. आणि मुख्य रस्त्याला ‘सडक’ म्हणत.” पुष्कराजने कमेंट केली.
“ओ पुस्तकी किडे असलेले मराठी साहित्यिक. तुम्ही राहूच द्या.” नीलेशने पुष्कराजची खेचली.
“राहू द्या म्हणजे? मी माहिती देतोय फक्त. तर तुला काय झालं एवढं भडकायला? तरी बरं विशाखाने तुझं ‘आय लव्ह यू’चं प्रपोजल अजून स्वीकारलं नाहीये.” पुष्कराजही काही कमी नव्हता.
“असं? तू विशाखाला प्रपोज केलंस? ते ही मला सोडून? आय हेट यू नीलेश....” सोनालीने लांबलचक नाटकी हेल काढला.
“ए रांडीच्यांनो..... आता बास की. आं...” संदीप म्हणाला.
“हे बघा गावराण मेंढरू. आय.ए.एस.ची तयारी करतंय म्हणे. भाषा बघा त्याची. ते ही ग्रुपमध्ये महिला सदस्य आहेत हे माहिती असून.” इति नीलेश.
“ही शिवी नाय काय. प्रेमाच्या माणसांना आश्याच हाका मारतात त्यांच्याकडे. आणि त्याचा आय.ए.एस.शी काय संबंध? आपल्या भाषेचा अभिमान बाळगावा माणसाने.” संतोष.
“ते मारू दे सगळं. पण तू शेवटी केलंस काय त्या पत्राचं? वाचलंस का तू ते?” विशाखा सगळ्यांना पुन्हा मूळ विषयाकडे घेऊन आली.
“नाही गं. लोकांची पत्र वाचणं आमच्या नियमात बसत नाही. मी ते पत्र जेथून आलं होतं तेथे परत पाठवून दिलं.” विकासने प्रामाणिकपणे सांगितलं.
“ह्या.. ह्या.. ह्या.. ह्या.. ह्या.. ह्या.. लोकांची पत्र वाचणं नियमात बसत नाही? साल्या, मला आकांक्षाने पाठवलेली पत्र बरी चोरून वाचत होतास.” संतोष पुन्हा खिदळला.
“संतोष जरा शिस्तीत रहा हं. सांगून ठेवते. मी कधी रे तुला पत्र पाठवली? उगाच लोकांचा गैरसमज व्हायचा.” आकांक्षा ओरडली. ती नुकतीच शाळेत शिक्षिका म्हणून जॉइन झाली होती.
“गम्मत केली जरा मास्तरीणबाई. एवढं काही ओरडायला नको. पण तेवढ्यात रांडीच्या संदीपचा जीव झुरणीला लागला असेल बघ. ह्या.. ह्या.. ह्या..” संतोष.
“अच्छा.. असं आहे तर. म्हणजे शिवराळ भाषा असणार्या गावराण मेंढराच्या आतही काळीज आहे म्हणायचं. मी उगाच नीलेशच्या मागे लागले होते. आय लव यू संदीप...” सोनालीने पुन्हा तोच लांबलचक नाटकी हेल काढला.
“बरं झालं. येड्याला खुळी भेटली ते. चला बाय. ह्या.. ह्या.. ह्या..” असं म्हणून संतोषने पटकन फोन ठेवला तसे एकेक जण ग्रुप कॉलिंगमधून बाहेर पडले.
______________________________