वीस
आपल्या जवळून पुढे गेलेल्या नीलेशकडे पीयूष कॉन्स्टेबल झाडीच्या फटीतून पहाट होते. संतोषजवळ पोहोचलेला नीलेश त्याला हळू आवाजात हाका मारत होता. विहीरीकडे एकटक बघत दोरी ओढत असलेला संतोष हाका मारत नाहीये म्हटल्यावर नीलेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचबरोबर एखादी निर्जीव वस्तू खाली पडावी तसा संतोष अलगद विहिरीत पडू लागला. त्याला वाचवण्यासाठी धडपडत नीलेशने विहिरीवर ओणवा झाला तेंव्हा आणखी अंधार झाल्याने पीयूष कॉन्स्टेबलला पुढचं काही स्पष्ट दिसेना. पुढची पाच मिनिटं तसंच बसून राहिल्यावर त्यांना आपल्याकडे कुणीतरी रोखून पहात असल्याचा विचित्र भास व्हायला लागला. त्यामुळे मन घट्ट करत ते विहीरीकडे जाण्यासाठी निघाले. ते सावधपणे विहीरीपर्यंत पोहोचले तेंव्हा त्यांना पाठमोरा नीलेश दिसला. तो हरवल्यासारखा कुठेतरी निघाला होता. त्याच्या दोन्ही हातात काहीतरी होतं. पीयूष कॉन्स्टेबलने डोळे बारीक ते काय आहे याचं निरीक्षण करायला सुरवात केली.
‘ते संतोषचे पाय आहेत.’ पीयूष कॉन्स्टेबलच्या मेंदूने आपले मत नोंदवले तशी त्यांच्या तोंडातून अस्फूट किंचली फुटली. पण तिचा आवाज बाहेर आला नाही कारण त्यांचं तोंड कुठल्यातरी बळकट हाताने घट्ट दाबून धरलं होतं.
______________________________
एकवीस
“यात काय आहे तू बघणार आहेस का? की मी एकटाच बघू? काहीही झालं तरी आवाज मात्र अजिबात करू नकोस. ओके?” असं म्हणून संदीपने मघाशी रेकॉर्ड केलेली व्हिडिओ चालू केली. त्याआधी त्याने स्क्रीनलाइट एकदम कमी केला होता तसेच मीडियाचा आवाजही म्यूट केला होता.
मुख्य रस्त्यावरुन चार जण आकांक्षाला खांद्यावरून गल्लीपर्यंत घेऊन आले होते. माणसांसारख्या त्या आकृत्या होत्या खर्या पण त्यांचं मांस अनेक ठिकाणी हाडांवरून खाली लटकत होतं. त्यातून सतत रक्त खालच्या जमिनीवर टपकट होतं. डोळ्यांची ठेवण विचित्रपणे खालीवर बिघडली होती. कान वर कवटीकडे सरकले होते. गल्लीत आल्यावर त्या विचित्र जिवांनी आकांक्षाला खाली ठेवलं. ती जीवंत होती आणि असहाय्यतेने तिच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. शरीरात त्राण नसल्याने ती शिथील पडली होती. आकांक्षाला खाली ठेवलं तशी तिथल्या पाच-पंचवीस जीवांनी तिच्यावर झेप घेतली.
पुढे काय असेल याची कल्पना आल्याने संदीप सुन्न झाला होता. त्याच्या शेजारी भीतीने आपण ओरडू नये म्हणून तोंडात स्वत:चाच रूमाल कोंबून बसलेल्या सोनालीची अवस्था सुद्धा तशीच झाली होती. संदीपने व्हिडिओ बंद करून सोनालीला मिठीत घेतले व तिला थोपटत तो शांतपणे भिंतीला रेलून बसला.
______________________________
बावीस
“हिरीकडून खात्या हाताला नीट म्होरं जा. मारुतीचं मंदिर लागंल. तिथंच लपून बस. कायबी झालं तरीबी बायेर निगू नगंस.” असं म्हणून कुणीतरी आपलं दाबलेलं तोंड सोडून दिलंय हे पीयूष कॉन्स्टेबलच्या लक्षात आलं. नीलेश कधीचाच निघून गेला होता. आपल्याला कुणी पकडून ठेवलं हे बघण्यासाठी पीयूष कॉन्स्टेबल वळाले नाहीत. कारण तो आवाज त्याने सकाळी सुद्धा ऐकला होता. ते रामाबा होते. त्यांच्या सूचनेनुसार तो चालत निघाला. तो मारुतीच्या मंदिरात पोहोचला तेंव्हा त्याची शुद्ध हरवली होती.
______________________________
