तेवीस
अचानक कुठूनतरी गाडीचा आवाज आला तशी संदीपची डुलकी मोडली. त्याने स्वत:चा हात चाचपत मनगटावरचं घड्याळ बघितलं. रात्रीचा एक वाजला होता. आपल्या मिठीतील सोनालीचं शरीर थंडगार पडल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्या थंडगारपणामुळे त्याला शिशिरी आली. त्याने सोनालीला अलगद जमिनीवर झोपवलं. आणि तो तिच्या तोंडावरून हात फिरवू लागला. त्याच्या हाताला तिच्या तोंडातला रूमाल लागला तेंव्हा तिचा श्वास कधीचाच बंद झाला असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
त्याने हलकेच उठून खिडकीतून बाहेर पहायला सुरवात केली. गाडी गल्लीत येऊ शकत नसल्याने मुख्य रस्त्यावर थांबली होती. तिच्या प्रकाशात त्याला विकास बाहेर पडताना दिसला. ते पाहून संदीपचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. विकासने दुसर्या बाजूला जाऊन दरवाजा उघडला. तो कुणाचेतरी शरीर बाहेर काढत होता. ते खांद्यावर घेऊन त्याने गल्लीत प्रवेश केला. विकास खिडकीखालून जाताना त्या शरीरावरचे कपडे संदीपला ओळखता आले. तो पुष्कराज होता.
विकास गल्लीच्या दुसर्या टोकाला निघून जात असताना अजून चालू असलेल्या गाडीचा आवाज ऐकत संदीपच्या डोक्यात एक कल्पना चमकली. जागेवरून सरकत तो घरच्या दरवाजाकडे निघाला. त्याच्या पायात मधेच सोनालीचे शरीर आल्याने तो अडखळला. तिची मनोमन क्षमा मागत त्याने क्षणात दरवाजा गाठला. आता त्याला क्षणभरही तिथे थांबायचे नव्हते.
______________________________
चोवीस
पळून पळून दमलेली विशाखा हक्कहुल्ळी - नांदुर्णी रस्त्यावर पोहोचली तरीही तिची थांबायची तयारी नव्हती. त्या रस्त्यावरूनसुद्धा तिने तसंच पळायला सुरवात केली. भानावर नसल्याने तिची दिशा मात्र चुकली होती. ती नांदुर्णी ऐवजी हक्कहुल्ळीच्या दिशेने पळत होती. बरंच अंतर गेल्यावर अतिश्रमाने शुद्ध हरवून ती रस्त्याच्या कडेला गवतात कोसळली. त्या रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने दुसर्या दिवशी सकाळी चार वाजेपर्यंत तिच्याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. सकाळी चारला मात्र हक्कहुल्ळीवरुन दूध संकलन करून निघालेल्या एका ट्रकवाल्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. बेशुद्ध पडलेल्या विशाखाला त्यांनी तालुक्याच्या दवाखान्यात भर्ती केलं. ती शुद्धीत आली तेंव्हा घाबरलेल्या अवस्थेतील तिची हकीकत ऐकून डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून घेतलं. आपलेही दोन कॉन्स्टेबल या मुलांसोबत गेले होते व ते परत आलेले नाहीत, ही माहिती मिळाल्याने तिथले तरुण पी.एस.आय. जरा जास्त गंभीर झाले. त्यांनी आपली आपली सगळी टीम सोबत घेतली व ते दोन पांदीच्या दिशेने निघाले.