9 भुताचा पोस्टमन

3 0 0
                                    

नऊ

“इथूनच ती ‘दोन पांदी’कडे जाणारी वाट असायला पायजे.” संदीप म्हणाला तसे करकचून ब्रेक मारत संतोषने गाडी थांबवली.

“ए गधड्या, टाळकं आपटला ना माझं.” समोरच्या सीटखाली उडालेला आपला मोबाइल शोधून झाल्यावर नीलेश शिव्या घालत गाडीतून उतरला. त्याआधी सगळ्यांनीच पटापट खाली उड्या घेतल्या होत्या.

“इथे कुठेही ‘दोन पांदी’ असा बोर्ड नाही.” विशाखाने घड्याळाकडे पहात आपले निरीक्षण नोंदवले तेंव्हा सकाळचे साडेनऊ झाले होते.

“पण तिकडे एक टेकड्यांची माळ दिसतेय बघ.” डाव्या बाजूला लांबवर बोट दाखवत सोनाली म्हणाली.

“पण जायला रस्ता कुठे आहे?” विशाखा म्हणाली तसा संदीपने तिला कधीकाळी ‘आपण अस्तीत्वात असल्याचा दाखला देणारा मार्ग’ दाखवला. ओढ्याच्या काठाने जाणार्‍या त्या रस्त्याचे आता काही मोजकेच दगड शिल्लक होते. मधे मधे उगलेल्या झुडुपांनी रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण केले होते.

“आपण आता उंचावर आहोत. इथून समोरच्या त्या टेकड्यांच्या माळेकडे सगळा उतार आहे. म्हणजे आपला चढाचा हा भाग आणि त्या टेकड्या यांच्या बेचक्यात ‘दोन पांदी’ हे गाव ते तिथे असणार.” आकांक्षा म्हणाली तसे नीलेशाने आपल्या मोबाइलमधे घातलेले डोके वर काढून ती दाखवत असलेल्या दिशेकडे पाहिले.

“एकदम बरोब्बर अंदाज. इथून साधारण चार किलोमीटर अंतरावरची ही आपली ‘दोन पांदी’ आणि त्याच्या पलीकडचा तो ‘भुताचा माळ’ बरोबर इथे असला पाहिजे.” समोरच्या दृष्याची आणि गुगल मॅपवरच्या व्हयूची सांगड घालत नीलेशने संगितले. त्याने मॅपवर आणखीही काही लोकेशन सेव्ह केले होते.

“या रस्त्यावरून कित्येक दिवसात साधी बैलगाडीसुद्धा गेलेली नाही. अपवाद फक्त मोटरसायकलचा. आणि ती सुद्धा मागच्या काही दिवसातच गेलेली दिसतेय.” पीयूष या कॉन्स्टेबल परत आल्यावर संतोषने आपले निरीक्षण मांडले. ते दोघे डाव्या बाजूने बरेच पुढे जाऊन आले होते.

“पण मला एक कळत नाही, या भागात कुठेही वस्ती का नाहीये?” पुष्कराज बराच वेळ लांबवर निरीक्षण करत होता.

“अहो साहेब. दुष्काळी भाग हा. लूटमारीचे प्रकार होतात. एकट्यादुकट्याने कोण राहील? तसंच, दुष्काळामुळेही शहरांमध्ये आणि परराज्यात गेले इकडचे कित्येक लोक निघून”. पीयूष कॉन्स्टेबल म्हणाले.

“पण तरीही त्यांची रिकामी घरं असायला नको का?” आकांक्षाने विचारले.

“शापीत भाग आहे हा सगळा. तीस वर्षांपूर्वी आलेल्या भूकंपात उध्वस्त झाली इथल्या लोकांची जिंदगी. मी तेंव्हा नेमकाच पोलिसात लागलो होतो. या सगळ्या शेत्या तेंव्हापासून ओसाड पडल्या त्या पडल्याच. कोण येईल मसणवटीत वस्ती करायला?” सिगारेटचा लांब झुरका घेतल्यानंतर धूर आकाशात सोडत काकडे साहेब म्हणाले.

“असं असेल तर विकास साहेबांचा शोध घ्यायला आपण इकडे कशाला आलो मग?” पीयूष कॉन्स्टेबलने विचारले तशी संदीपने सगळी घटना त्या दोघांना विस्तारून सांगायला सुरवात केली.

“बस झाली पाहाणी आणी कहाणी. चला पोस्टमनला शोधूया. पीयूष तू वायरलेसवर कंट्रोलला कळव.” संदीपचं बोलणं मधेच तोडून काकडे साहेबांनी अर्धवट जळालेली सिगारेट बुटाखाली चुरडली आणि ते गाडीत जाऊन बसले. त्यांचा एकदम पालटलेला नूर पाहून बाकीच्यांनीही आपापल्या जागा घेतल्या.

______________________________

भुताचा पोस्टमन Where stories live. Discover now