आठ
“ते रांडीचं 'दोन पांदी'च का?” गुगल मॅपवर सेव्ह केलेल्या लोकेशनला आपल्या करंट लोकेशनशी जोडत संदीपने विचारलं.
“फायनल डेस्टिनेशन तेच असलं तरी आपल्याला आधी ‘भुत्याचा माळ’ शोधायला हवा.” कधीपासून शांत असलेली सोनाली म्हणाली तसं सगळ्यांनी तिच्याकडे डोळे वर करून पहिलं.
“बरोबर सांगतीये ती.” विकासच्या कथेत पुढे काय झालेलं असू शकतं, याचा सोनालीने बरोबर अंदाज केलेला पाहून पुष्कराज कौतुकाने म्हणाला.
“ठीक आहे. मी माझ्या गुगल मॅपवर सॅटेलाइट व्ह्यू ऑन करून 'दोन पांदी' च्या आसपास कुठे उघडाबोडका माळ सापडतो का ते पाहतो.” नीलेशने सुद्धा मोबाइलमधे डोकं खुपसलं.
“डोन्ट माइंड नीलेश. पण व्हॉट इज मिन्स ‘उघडाबोडका माळ’?” इति विशाखा.
“अगं... उघडाबोडका माळ म्हणजे... ओपन स्पेस.” विशाखाला परत कुणी कॉन्व्हेंट म्हणायच्या आधी आकांक्षाने उत्तर दिलं.
“ह्या... ह्या... ह्या... काय मास्तरीणबाई? नुसतीच ओपन स्पेस? वाट लागली मग आमच्या पोरायची. अगं विशाखा, उघडाबोडका माळ म्हणजे ज्याच्यावर झाडेझुडुपे उगवत नाहीत अशी टेकडी बरं का गं. आणि नीलेश त्याच्यावर पिंपळाचं एक म्हातारं झाड पण असायला हवं बरं.” गाडी चालवणारा संतोष मुलींच्या आवाजाचा हेल काढत म्हणाला.
“ए गप्प बस ना नीलेश. प्रसंग काय अन तू खिदळतोस काय असा?” सोनालीने त्याला झापले.
“इथे मात्र तू चुकलीस हं सोनाली. परिस्थिती खरंच गंभीर असू शकते. पण याचा अर्थ आपणसुद्धा टेंशन घेऊनच ती हाताळायला हवी असे नाही. उलट आपण नेहमीसारखे नॉर्मल असलो तरच जास्त बरं होईल. ओके? आपण पिकनिकला आलोय असं समजून चला सगळे.” पुष्कराजला कुणीही मानसिक दडपणाखाली यायला नको होतं कारण तो बाहेर रस्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या खुरट्या झाडाझुडपांच्या जंगलाकडे पहाट होता. मागच्या तीन/चार किलोमीटर पासून शेती कमी – कमी होत जाऊन जंगल लागलं होतं. अर्थात हे काही खरंखुरं जंगल नसून शेती कसायची सोडून दिल्याने मागच्या काही दशकांत निर्माण झाल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. पुष्कराजच्या दृष्टीने ही खटकणारी बाब होती.
______________________________
