बारा
“तिकडे विकासची मोटरसायकल पडली आहे.” पुष्कराज धावत सांगायला आला तेंव्हा काकडे साहेब आणि संदीप परत आले होते. पुष्कराजचं बोलणं ऐकून सगळेच धावत निघाले.
“अॅक्सिडेंट झालेला नाही. ही मोटरसायकल विकासनेच इथे स्टँडवर उभी केलेली असणार. खालची वाळू सरकल्यामुळे ती स्टँडवरुन पडली असणार. गाडीच्या फार जवळ कुणी जाऊ नका. पुरावे नष्ट होतील.” काकडे साहेब आपल्या अंनुभवातून सांगत होते. ते सगळे कोरड्या ओढ्यातून पलीकडच्या बाजूला चालत आले होते. विकासची गाडी ओढ्यातच आडवी पडलेली होती.
“विकास इथून तर चालत गेला नसेल ना?” वरच्या बाजूला जाणार्या पायवाटेकडे बोट दाखवत आकांक्षा म्हणाली.
“चला, तर मग. वाट कसली पहाताय.” असं म्हणून नीलेश पुढे जाणार तोच काकडे साहेबांनी त्याला अडवले.
“तिकडून नको. तिकडून गेलो तर आपल्याला गाडीच्या फार जवळून जावे लागेल. विकासच्या पायाचे ठसे नष्ट होतील.” काकडे साहेब.
“या. इकडून या सगळे.” पुष्कराज म्हणाला त्यावेळी तो ओढ्यात असलेल्या एका दगडावरुन वरच्या बाजूला चढून गेला होता. एकमेकांना हात देत सगळे वर चढले व पायवाटेला लागले.
“आपली गाडी पूलावरून आली असती तर इथपर्यंत सहज आलो असतो आपण.” संतोष मागे पहात म्हणाला. ते सगळे ओढ्यावरचा कोसळलेला पूल बरेच मागे सोडून आले होते.
“मला वाटतं याच रस्त्याने सरळ गेलं की, ‘भुताचा माळ’ असेल.” नीलेश मोबाइल पहात म्हणाला.
“आणि या डाव्या बाजूच्या रस्त्याने आत गेलं की, ‘दोन पांदी’त पोहोचू आपण.” आकांक्षाने बोट दाखवले त्याचवेळी नीलेश, “पण हे काय इथे तर रेंज गेलीय माझ्या दोन्ही सिमची.” असे ओरडला.
“अरे खरंच की. आमच्याही कुणाच्याच फोनला रेंज नाही.” विशाखा म्हणाली तेंव्हा सगळ्यांनी आपापले मोबाइल तपासले होते.
“ओके. डोन्ट बी पॅनीक. दोन टीम करुयात आपण म्हणजे वेळ वाचेल. मी, नीलेश, पुष्कराज आणि पीयूष साहेब ‘भुताच्या माळा’कडे जातो.” विशाखाने तिची टीम तयार केली.
