चार
"नमस्कार, पोस्टमन साहेब. आज कशी वाट चुकलात आमच्याकडे?" डॉ. नांद्र्यांनी विचारलं. डॉक्टरांचं क्लिनिक आणि विकासचं पोस्ट ऑफिस एकाच गावी होतं.
"काही नाही. जरा कणकण वाटतीये कालपासून." विकास म्हणाला.
"जरा कणकण कसली? चांगलाच ताप चढलाय की तुम्हाला. औषधं देतोय माझ्याकडची. पण दोन दिवस आराम करणे हा सर्वोत्तम उपाय आहे." डॉ. नांद्रे बरणीतून गोळ्या काढत होते.
"आज जाणारच नाहीये कुठे आणि उद्या रविवार. त्यामुळे जमेल आराम करायला. पण मला एक सांगा नांद्रे साहेब, तुम्ही सुद्धा आजूबाजूच्या खेडोपाडी फिरून औषधोपचार करता पेशंट्सवर. 'दोन पांदी'त जायचं काम पडलं का हो कधी?" विकासने उठून बसत विचारले.
"दोन पांदी? हे कुठलं नवीन गाव शोधून काढलंत? आख्ख्या पंचक्रोशीत फिरतो मी दहा वर्षांपासून. पण हे नाव नाही बुवा ऐकलं कधी. का? काय झालं? पत्रबित्र आलंय की काय 'दोन पांदी'त कुणाला? पांढरी गोळी सकाळी उठल्यावर अनोश्या पोटी. पिवळी गोळी दिवसातून तिनदा." डॉ. नांद्रेंनी विकासच्या हातात गोळ्यांचं पाकिट ठेवलं.
"अं... काही नाही... हो ना... पत्रच आलंय." विकास बोलत असतानाच त्याला पुन्हा घाम फुटत होता.
"असं बघा पोस्टमन साहेब. इथल्या तालुक्याचं जे नाव आहे ना, त्या नावाची आणखीही गावं आहेत महाराष्ट्रात. चुकून दुसरीकडचं एखादं पत्र इकडे आलं असेल. तुम्ही तुमच्या आधीच्या समाधान साहेबांना का विचारून बघत नाही?" डॉक्टर नांद्रे विकासच्या कपाळावर गोळा होणार्या घामाकडे बघत म्हणाले, त्यावेळी त्यांच्या स्वत:च्या कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या.
"हो. करतो. असंच करतो." विकास स्वत:ला सावरत उठला.
______________________________