तीन
“कदम गुरुजी नाही आले का आज?” ‘दोन पांदी’त आल्यावर विकासने आपली मोटरसायकल सरळ पाराकडे आणली, त्यावेळी संध्याकाळचे सव्वा सहा झाले होते. पारावर मोजकीच मंडळी हजर होती.
“आत्ता येतीलच की. मघाशीच मंदिरात गेल्यात गुर्जी. पण तुवं तोंड का आसं उतरलंय पोरा? काय जालं?” रामाबांनी काळजीने विचारलं.
“नंतर सांगतो. पण मला आधी कदम गुरुजींशी बोलायचंय.” असं म्हणून विकास मंदिराकडे जाण्यासाठी वळाला, तोच त्याला गुरुजीच पाराकडे येताना दिसले.
“काय पोस्टमास्टर? संध्याकाळच्या यावेळेला इकडे कुठे वाट चुकलात?” डोळ्यांवरचा चश्मा खिशात घालत गुरुजी पाय खाली सोडून पारावर बसले. तोपर्यंत नेहमीची मंडळी तिथे हजर झाली होती. शेतातून परतणार्यांपैकीसुद्धा बरेच जण तिथे उभे राहिले.
“मी माघारी पाठवलेलं ‘धोंडो कुलकर्णी’ यांच्या नावाचं ते पत्र परत माझ्याकडेच आलं.” विकास गंभीरपणे म्हणाला.
“का बरं?” कदम गुरुजींनी विचारले.
“पत्रावर ज्या पोस्ट ऑफिसचा शिक्का आहे ते पोस्ट ऑफिस चाळीस वर्षांपूर्वीच बंद झालेलं आहे. ते ज्या गावात होतं ते गाव त्यावेळी पुरात वाहून गेलं होतं आणि धरण फुटल्यामुळे तो पूर आला होता.” विकासने चिंतित चेहर्याने सांगितलं.
“माजं ऐकतू बाळा. टाक फाडून ते ‘धोंडो भटाचं पत्र’ आणि जा इसरून. तुला ‘दोन पांदी’त यायचं पुना कामबी पडायचं नाई.” रामाबा म्हणाले.
“असं कसं? धोंडो पंतांपर्यंत त्यांचा निरोप पोहोचलाच पाहिजे की.” कदम गुरुजी अचानक तीक्ष्णपणे म्हणाले.
“काय म्हणालात?” विकास दचकला.
“नाही म्हणजे, मला असं म्हणायचं होतं की, ‘धोंडो कुलकर्णींना आलेला निरोप’ तुम्ही कुणापर्यंत तरी पोहोचवायलाच हवा ना. तुमचं ते कामच नाही का?” कदम गुरुजींनी सावरून घेतले.
“अर्थात, त्यासाठीच तर आलो मी परत. हे घ्या पत्र आणि वाचा काय निरोप आहे तो.” विकासने आपल्या कातडी पिशवीतून पत्र काढून एकदम समोर धरलं तसे गुरुजी दचकले. आपले लोंबकळणारे पाय वर ओढून घेत ते मांडी घालून सावरून बसले.
“नाही. तुम्ही मागच्या वेळी म्हणालात त्यावर मी बराच विचार केला. तुमचं म्हणणं बरोबर आहे. अशी दुसर्यांची पत्र आपण वाचू शकत नाही.” कदम सरांनी मागच्या वेळी घेतलेली आपली भूमिका पूर्ण बदलल्याचं पाहून विकास चाट पडला.
“असं.. आता काय करता येईल मग?” विकासने पुढचा प्रश्न विचारला.
“तुम्हीच वाचा की ते पत्र. तसंही पूर्वीच्या काळी पोस्टमनच लोकांची पत्र लिहून द्यायचा – वाचूनही दाखवायचा.” कदम सर म्हणाले.
“तसं करता आलं असतं खरं. पण त्यासाठी ज्याच्या नावे पत्र आलंय ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या नातलगांपैकी तरी कुणी समोर हवं ना.” विकासने शांतपणे उत्तर दिलं.
“मंग तुम्ही आसं का नाही करत पोस्टमन साहेब. धोंडो भटजींना जिथं कुठं माती दिली आसंल त्या जागेला साक्षी ठेऊन वाचा की पत्र.” एक चाळीशीचा गृहस्थ मधेच हसत म्हणाला तसे रामाबा सोडून सगळेच हसायला लागले. हसणार्या लोकांचे ते हास्य विकासला आचकट-विचकट वाटले.
“रामाबा.. कुठं माती दिली व्हती रं ‘धोंडो भडजीला?” एका म्हातार्याने विचारलं.
"ते तिकडं पार माळाकडं माती द्यायचे तवा... पिंपळाच्या जुन्या झाडाजवळ. तुमी लोकं 'भुत्याचा माळ' म्हणत्या तिकडं.." बऱ्याच वेळापासून आपल्याच तंद्रीत हरवलेले रामाबा सहज बोलून गेले आणि पुढं हा प्रश्न का विचारला गेलाय हे लक्षात आल्याने एकदम चपापले, "तूमी ध्यान देऊ नगा बगा पोस्टमास्तर. जावा बगा घरला आणि फाडा ते पतर. आंधार हुवाया लागलाय. निगा बगा, पयलं निगा हिथून." आसं म्हणत रामाबा पारावरून उठले. त्यांनी पोस्टमनला जबरदस्ती त्याच्या मोटारसायकलवर बसवले आणि तिथून काढले.
'दोन पांदी'तून मोटरसायकल बाहेर पडता पडता अंधार गुडुप झाला होता. काठी टेकवत गावात प्रवेश करत असलेली एक म्हातारी आणि तिची गुरंढोरं रस्ता अडवून उभी होती. त्यामुळे विकासला आपल्या मोटरसायकलचा हॉर्न सतत वाजवावा लागत होता. त्या हॉर्नमधून येणाऱ्या कर्कश्श आवाजाच्या पार्श्र्वभूमीवर विकासचं म्हातारी अन् जनावरांकडे लक्ष गेलं. ते सगळे लालसर चमकणाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होते. ते पहाणं अगदी भयाण होतं. गाडी कशीबशी पुढे दामटत असताना विकासच्या लक्षात आलं की, जी जनावरं गाडीच्या दिव्याच्या कक्षेत नाहीत त्यांचे डोळे देखील तसेच चमकताहेत. हे लक्षात आल्याने त्याला दरदरून घाम फुटला.
______________________________