अठरा
“पीयूष साहेब ते कुणीतरी विहीरीतून पाणी काढताना दिसतंय समोर.” नीलेश कुजबुजत म्हणाला तेंव्हा सूर्य मावळतीला निघाला होता. दिवसभर ते या रानातून त्या रानात वेड्यासारखे फिरत होते. आपण सारखे सारखे आधीच्याच जागी परत येतो आहोत हे लक्षात आल्यावर पीयूष कॉन्स्टेबल अचानक, ‘आपल्याला ‘चकवा’ झाल्याचं’ नीलेशला म्हणाले. कथा-कादंबर्यांमधून ‘चकवा’ ही गोष्ट वाचली असली तरी नीलेशचा त्यावर कधी विश्वास बसला नव्हता. पण ती गोष्ट त्यांच्यासोबत आता प्रत्यक्ष घडत होती. त्याचबरोबर त्या रानामधे कुठेही चिटपाखरू दिसत नव्हतं. त्या रानात भरदिवसा कुठलीतरी अनामिक भयाण शांतता वावरत असल्याची जाणीव झाल्याने ते दोघे जरासे घाबरलेही होते. कुठल्याही परिस्थितीत आपण रात्र होण्याआधी इथून बाहेर पडायला हवं, हे त्यांना कळत असलं तरी बाहेर पडण्याचा मार्ग उमजत नव्हता. संध्याकाळ होताहोता एक टिटवी डोक्यावरुन उडत गेली तेंव्हा अचानक त्यांचा ‘चकवा’ सुटून ते एका दिशेला लागले आणि इथपर्यंत येऊन पोहोचले होते.
“बादली कुठे येतेय वर?” पीयूष कॉन्स्टेबल कुजबुजले तेंव्हा ते दोघे एका झाडीच्या आडोशाला लपून समोरचे दृष्य पहात होते.
“हा वेडाबिडा तर नसेल ना?” नीलेश म्हणाला.
“काय करुयात? चालायचं का पुढे?” अंधार पडू लागल्याने पीयूष कॉन्स्टेबल अस्वस्थ झाले होते.
“आयडिया.” असं म्हणून नीलेशने आपला मोबाइल बाहेर काढला व कॅमेरा झूमआऊट करत पाणी काढणार्या त्या माणसाचा फोटो काढला. फोटो तसा अंधुक आला होता पण त्याचं बारकाईने निरीक्षण करणारा नीलेश, “हा तर आपला संतोष आहे.” असं म्हणून सरळ पुढे निघाला. पीयूष कॉन्स्टेबल लगेच त्याच्या मागे न जाता, पुढे काय होतंय याची वाट पहात झाडीच्या आडोश्यालाच थांबले.
______________________________
एकोणीस
“खरंच सुगंध येतोय स्वयंपाक तयार करण्याचा.” सोनाली कुजबुजली त्यावेळी पारावरच्या झाडवरून अनेक मुंडकी उलटी खाली लोंबकाळली होती. त्यांच्या बाहेर आलेल्या जिभा हावरटपणे वळवळत होत्या.