सात
“हे आलं विकासचं पोस्ट ऑफिस असलेलं गाव. पोलिसांची गाडी दिसत नाहीत पण. तू निरोप दिला होता ना त्यांना?” संतोष गाडी कडेला लावत असताना पुष्कराजने संदीपला विचारलं, तेंव्हा सकाळचे पावणे आठ झाले होते.
“मी परत फोन करतो.” असं म्हणत गाडीतून खाली उतरणासाठी संदीपने दरवाजा उघडला. तोच फोन उचलला जाण्याऐवजी कट करत समोरच्या हॉटेलातून एका पोलिसाने त्याला आवाज दिला.
“आम्ही रात्री दोन वाजता तिथे पोहोचलो तेंव्हा विकास साहेब जिथे भाड्याने रहातात त्या घराचा दरवाजा फक्त लोटलेला होता. विकास साहेबांची मोटरसायकल घराबाहेर उभी नव्हती. घरात जाऊन पाहिले तर लाईट्स ऑन होते. ड्रॉइंग रूममधे एक मोबाईल फरशीवर पडला आहे. त्याची काच फुटली असून मागचे कवर व बॅटरी पलंगाखाली उडाले आहेत. आमच्या कयासानुसार मोबाईल भिंतीवर आपटला गेला असण्याची शक्यता आहे. तसेच झटापट झाल्याची कुठलीही खूण नाही. जेवणाचा डबा पूर्ण संपवून व्यवस्थीत लाऊन किचनमध्ये ओट्यावर ठेवलेला आहे. तुम्हाला बघायचंय का ते घर?” पुष्कराजच्या सूचनेनुसार सगळे हॉटेलात बसून वडा रश्श्यावर ताव मारत होते तेंव्हा पीयूष हा तरुण कॉन्स्टेबल माहिती देत होता. दुसरे काकडे कॉन्स्टेबल मात्र वयस्कर होते. त्यांची सेवानिवृत्ती जवळ आली असावी.
“नको. काय उपयोग नाय जाऊन तिथं. पण तुम्हाला गावात काही माहिती मिळाली का विकासबद्दल? म्हणजे ते रांडीचं कुठे गेलं आसंल? जाताना कुणाला काही बोललं का? इत्यादि इत्यादि.” संदीपने विचारले.
“मीच पहिलं पोस्टमन साहेबांना जाताना. रात्रीचे बारा – सव्वा बारा झाले असतील. मी हॉटेल बंद करत होतो तेंव्हा इथूनच नांदुर्णीकडे गेले बघा पोस्टमन साहेब. मी जोरात ओरडलो, ‘इतक्या रात्रीचं कुठं निघाला म्हणून?’ पण काही उत्तर न देता तसेच स्पीड वाढवत निघून गेले बघा ते.’ हॉटेलमालक स्वत: चहाचे ग्लास सगळ्यांच्या हातात देताना सांगत होता. हीच माहिती त्याने थोड्या वेळापूर्वी पोलिसांनासुद्धा दिली होती.
“थॅंक यू मालक या माहितीसाठी. किती झाले?” खिशातून पाकीट बाहेर काढत पुष्कराज म्हणाला. आपला चहा भरर्कन संपवत त्याने सगळ्यांना निघायची खूण केली होती. पोलिसांनी आपल्या मोटरसायकलला चाबि लावली तसे संदीपने त्यांना त्यांची गाडी तिथेच ठेऊन आपल्यासोबत यायची विनंती केली. पोलिस आपल्या गाडीत बसल्याने पुष्कराज व संदीप सोडून बाकीच्यांना नाही म्हणयला जरा अनकन्फर्टेबलच फील झालं.
______________________________
