त्या छोट्याश्या खोलीत जिथे फक्त एक प्रकाशाचाच मला सहारा वाटत होता. त्या बंद खोलीमुळे तो प्रकाश सुद्धा कोंडला गेला होता. मी तरुणपणीचा शहाणेपणा आणि बालपणीचा बालिशपणा यामध्ये फसले होते. खरंतर त्या परिस्थितीत रडण्याशिवाय मी काहीही करू शकत नव्हते. मी काही हळूहळू रडत नव्हते. मी हंबरडा फोडून कोणीतरी माझे रडणे ऐकावे या उद्देशाने रडू लागले. कोणी नाही ऐकले तर निदान अनुजने तरी ऐकावे या उद्देशाने रडत होते. मी खूप रडले. माझा आवाज न निघेपर्यंत रडले. अश्रु सुकेपर्यंत आणि रडणे खूप झाले असे म्हणेपर्यंत रडले. जेव्हा माझे रडणे थांबले तेव्हा सार्या चिंता एकसाथ डोक्यात भिनभिनू लागल्या. 'आता माझे पुढे काय होणार?' 'माझा वाईट कामासाठी तर उपयोग नाही ना होणार?' 'मी अनुज सोबत येऊन सर्वात मोठी चूक केली का?' 'प्रेमाला अति उच्च दर्जाचे मानुन चूक केली का मी?' नाही, मी कशी चुकणार? उभ्या आयुष्यात मी कधी चुकले होते का? माझ्या आयुष्याचे महत्वाचे निर्णय आई आणि बाबांनी घेतले होते. हा पहिला निर्णय असला तरीही मी चुकणार नाही याची मला खात्री होती. मी आज घर सोडून किती तरी जग फिरले होते परंतु मला जे हवं ते अजूनही मिळाले नव्हते. 'प्रेम आणि स्वातंत्र्य' या शोधाच्या प्रवासात स्वातंत्र्य होते परंतु शांती नव्हती. प्रेम तर माझ्या नजरेसमोर होते पण त्यात सत्यता कुठे होती! माझ्या हृद्याच्या कोपर्यात अजूनही अनुजचे माझ्यावर प्रेम असावे ही भावना होती. त्यानेच मला इथे कोंडले होते, नाही का?
प्रेम होते तरी असा का वागला असावा तो?
'आई!' आज पहिल्यांदा माझ्या तोंडून अजाणतेने का होईना पण तिची आठवण निघाली. आईचा तो मायेचा स्पर्श, बाबांसमोर माझ्या स्वयंपाकाची केलेली खोटी खोटी स्तुती, कधी नटले असताना मीठ मोहरीने माझी काढलेली नजर, इतकंच काय तर परिक्षेत कमी गुण मिळाल्याने लाटण्याने मारलेले सुद्धा आठवले. खर्या प्रेमात नेहमीच काळजी असते. असं अनुज सारखे दरीच्या उंच टोकावर एकटीला सोडून निघून जाण्यात प्रेम नसते. 'आई, बाबा तुमची खूप जास्त आठवण येत आहे. मला निघायचं आहे इथून.' मी पुटपुटले.
YOU ARE READING
24 - आठवणीतील तास
Mystery / Thrillerवय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका...