15. संध्याकाळचे 5

38 2 0
                                    

कितीतरी चिंताजनक वातावरण होते. मी तिथे चालून जाईपर्यंत मला माझ्याच हृदयाची धडधड ऐकू येत होती. तिथे पोहोचण्याआधीच मला त्या शवाचा हात दिसला. हात नाही फक्त ते बोट दिसले. ज्यातील अंगठी हुबेहूब वीणाच्या बोटातील अंगठी सारखी होती. मी किंचाळले. माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. फक्त 'अंगठी' इतकेच बोलू शकले. माझे पाऊल पुढे जातच नव्हते. मी तिथेच खाली बसले. ती वीणा होती का? हे कसं शक्य आहे? माझी मुलगी अजूनही जिवंत आहे. मला खात्री आहे. ती पुन्हा येईल ठाऊक आहे मला. मग समोर असलेले काय होते? आपली वीणा अशी परत आली का? वीणा.... मी रडू लागले. 'एकदा इथे येऊन बघ तरी.' वीणाचे बाबा म्हणाले. मी मान जोराने डोलावत नकार दिला. माझी हिम्मतच होणार नाही तिला अश्या अवस्थेत बघण्याची. मी पुन्हा रडू लागले. 'एकदा येऊन बघ वहिनी. मला नाही वाटत ही आपली वीणा आहे.' वीणाचे काका म्हणाले. ते असं म्हणताच मला आधार वाटला. वीणाच्या बाबांनी माझा हात धरून मला उठवले. माझा हात धरतच त्यांनी मला तिथपर्यंत नेले. तिला पाहताच मी सुटकेचा निश्वास टाकला. 'ही वीणा नाही.' नशीब! परंतु बिचारी कोण असावी ही; म्हणून मी हळहळ व्यक्त केली.

ही आमची मुलगी वीणा नाही हे सांगून आम्ही तिघेही जण शवालयाच्या बाहेर पडलो. 'वहिनी!' वीणाच्या काकांनी मला हाक मारली. वीणाच्या बाबांनी त्यांना हाताने तिथेच थांबण्याचा इशारा केला मला घरी परतण्यास घेऊन गेले. रस्त्याभर त्यांनी माझा हात सोडला नाही. जे काही आता घडलं ते खरंच आमच्यासाठी आश्चर्यजनक होते. नशिबाने ती आमची मुलगी नव्हती. यावरून असे समजते की आपलीही मुलगी सुरक्षित नाही. नक्कीच जिने जग सुद्धा पाहिले नाही अशी एकटीच मुलगी बाहेर असेल तर ती कशी सुरक्षित असणार. भल्या भल्या स्त्रियांना जग फसवायला मागे पुढे बघत नाही. कमजोर व्यक्तीचा फायदा घ्यायला मागे पुढं बघत नाही. त्यात वीणा काय चीज आहे! माहित नाही ती कुठे असेल आणि आतापर्यंत घरी का परतत नसेन!

घरी येताच मी तिची ती अंगठी शोधू लागले. ती अंगठी घरातच सापडल्यावर माझा पुन्हा जीवात जीव आला. 100 टक्के खात्री पटली, ती मुलगी वीणा नव्हती. मी समोरच्या खोलीत वीणाच्या चिंतेने कपाळाला हात लावून बसले. तितक्यात मला अर्धवट राहिलेले वीणाचा शोध घेण्याचे काम आठवताच मी गुपचूप घरातून निघाले. वीणाच्या काकांना फोन करत मी पुन्हा त्या रस्त्यावर गेले. तिथे त्यावेळी मी एकटीच होते. तो रस्ता एकटीनेच पार करायचा होता. आमच्या ठरलेल्या बेताप्रमाणे. परंतु संयम माझ्या मागे राहणार होता. अजूनपर्यंत तो इथे कुठेही नव्हता. त्याची वाट बघण्यात उशीर न होऊ देण्यासाठी मी निघाले. संध्याकाळ झाली होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने लवकरच सूर्यास्त होऊन थंड हवा वाहू लागायची. त्यातही अश्या शांत जागेवर मी एकटीच होते. त्यामुळे आणखीन थंड हवा बोचरत होती. एकटेच चालून चालून मला तो रस्ताही समजला. ते जंगल हरवणारे होते. वाट नीट बघून चालायला हवी. अश्या ठिकाणी मानव निर्मित वाट असतेच. अंधार होण्याच्या आत त्या वाटेवरून परतायला हवे. मी पाऊल जलद गतीने टाकू लागले. 5 मिनिटातच खूप चालल्यासारखे वाटले. माझा फोन वाजू लागला. वीणाच्या बाबांचा फोन होता. मी दुर्लक्षित केले. सध्या वीणा महत्वाची होती. चालता चालता मी एका माळरानावर पोहोचले. जिथे संयम माझी वाट बघत होता. मला पाहताच तो धावत माझ्यासमोर येऊन उभा राहिला. आश्चर्याने तो म्हणाला, 'तुम्ही इथे का?'

24 - आठवणीतील तासWhere stories live. Discover now