17. संध्याकाळचे 7

36 1 0
                                    

संध्याकाळचे 7

पोलीस स्थानकात ते माझी वाट बघत बसले होते. आज त्यांची मान आमच्यामुळे पूर्णतः खाली गेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर अपमानाची झापड उमटली होती. मला बघताच ते पोलिसांच्या समोरील खुर्ची वर जाऊन बसले.  मी त्यांच्याकडे मोठ्या आशेने गेले होते. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर गडद निराशा होती. एक दोन कागद पत्रांवर सई करताच ते पोलीस स्थानकाबाहेर निघाले. पोलीस स्थानकाच्या आवाराबाहेर पडताच ते थांबले आणि खाली मान घालूनच म्हणाले, 'तुला सुद्धा माझ्या आयुष्यातून निघून जायचं असेल तर आताच निघून जा. या पोलीस स्थानकाच्या फेऱ्या आणि हा अपमान मी आणखीन नाही सहन करू शकत.' माझी नजर शरमेने झुकली. त्यांना काय उत्तर द्यावे काहीही समजत नव्हते. जे काही सहन करायला लागले होते ते खरंच अपमानास्पद आणि असहनीय होते.

आम्ही सोबत चालू लागलो. पुन्हा तसेच एकाच गाडीत बाजूबाजूला होतो पण एकमेकांशी बोललो नाही. 20 ते 25 मिनिटाचा प्रवास सोबत केला पण आम्ही सोबत नव्हतो. घरात पाऊल टाकताच मात्र त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला, 'कुठे गेलेली?' 'एकटीच का गेली?' 'तू माझ्या भावाचे म्हणणे का ऐकले?' 'वीणाला शोधणे थांबव!' आतापर्यंत त्यांच्या नजरेपासून वाचत असले असताना मी त्यांच्याकडे पाहिले. त्यांना वाटले मी यासाठी नकार देईल परंतु मी हरले होते. तुम्ही जस सांगणार तस करायला मी तयार आहे. मी होकार दिला. नाही शोधणार मी आता वीणा ला.

'का गेलेली एकटी? आधी वीणा हरवली. आता तू! माझ्या आयुष्यातून एकाच वेळी दोघींनाही निघून जायचे आहे का?'

मी डोळ्यातील अश्रू अडवून नकारार्थी मान डोलावली.

'तू सुद्धा गेली तर कसं होईल माझं आयुष्य? तू विचार केला आहे का कधी?' पुन्हा मी शांत राहिले. बोटाने आपले अश्रू पुसत मी सर्व निमूटपणे ऐकून घेत होते.

'घरपण होतं घराला. आधी घराची जाण गेली आणि आता शान पण जायला निघाली होती. हे बघ, वीणाचा शोध थांबला नाही. तपास चालू आहे. परंतु हे कोणाला समजू द्यायचे नव्हते. तुमच्या या कारस्थानामुळे महत्वपूर्ण सुगावा हाती लागला आहे. बघ वीणा सुखरूप घरी परतेल. तू फक्त शांत घरीच रहा आणि तिच्या तपासाची ही वार्ता या घराबाहेर पडायला नको. मग कितीही शुभचिंतक का असेना.' त्यांचा दाटलेला कंठ सर्व काही सांगून मला दिलासा देत होता. मी होकारार्थी मान डोलावली. स्वतःला स्वच्छ करून मी तुळशीसमोर प्रसन्न असा दिवा पेटवला. 'आपली वीणा लवकर सुखरूप घरी पोहचू दे हेच माझे मागणे आहे.'

24 - आठवणीतील तासWhere stories live. Discover now