03. पहाटेचे ५

162 2 0
                                    

पहाटेचे 5

त्या रमणीय अतुलनीय निसर्गात चालत असताना कधी मी तो रस्ता धरला माहित नव्हते. माझा रस्ता चुकला आहे की मी चालत असलेला रस्ताच बरोबर आहे हे समजण्याच्या पलीकडे माझी मोहित झालेली बुद्धी राहिली नव्हतीच. एक वेळ माझ्या चांगल्याच लक्षात होती. ती म्हणजे 5.10 ची वेळ. ती वेळ लक्षात ठेवण्याची गरज होतीच, त्याचे कारण म्हणजे ती ट्रेन ची वेळ होती. ती ट्रेन आमच्या जिल्ह्याच्या स्थानकावरून येणार होती. सम्पूर्ण जिल्ह्यात फक्त एकच स्थानक होते. इथे कोणालाही विचारले असता मला त्या स्थानकाचे नाव समजेन. फक्त शंका इतकीच की इथे पत्ता विचारण्यासाठी कोणीही नव्हते. रस्ता सामसूम असतानाही मला आभास होऊ लागले. आज मला हा नवीन नियम समजला. ‘आपण जेव्हा सर्वांसोबत असतो तेव्हा एकटे राहावेसे वाटते. आणि आज एकटे आहोत तर मन सुध्दा कोणी सोबत असावे असं म्हणतो.’ मी मागे वळून पाहायचे तर मला सर्पांच्या आवाजाशिवाय कोणीही जाणवायचे नाही. गावी कधीतरी मी सर्प पाहिला असावा. एकदा आमच्या पाठच्या घराच्या अंगणातही पाहिला होता. परंतु कधीच अशी दहशत जाणवली नव्हती. पाऊल पाऊल जपून आणि लवकर लवकर टाकावा लागत होते. चालत चालता ती वाट सम्पू लागली होती. समोर धुक्याने झाकलेला भव्य रस्ता असावा. त्यातून फक्त गाड्यांच्या स्वतःशीच लावलेल्या शर्यतीचे आवाज यायचे. आपली बॅग सांभाळत मी त्या रस्त्याच्या कडेला पाहू लागले. तिथे काही बेघर व्यक्ती पांघरूणातून एकटक माझ्याकडे पाहत होते. तसे तर माझ्या सुंदरतेचे कौतुक मला सुद्धा होते; पण ती नजर मला ओरबाडून काढत होती. ती नजर कोणतीही सुंदरता शोधत नव्हती. ती फक्त बघत होती. घाणेरड्या विचाराने ती फक्त माझ्याकडे रोखून धरली होती. घर सोडताच मला हे सर्व दिसेल याची जाणीव मला अगोदरच होती. तो(प्रियेश) सोबत असेल म्हणून मी याची काळजीच केली नव्हती. त्याच्याशिवाय बस मध्ये चढताना मी हा विचारच केला नव्हता.
आता काय? या गोष्टीमुळे मी मागे फिरणार नव्हते. हा फक्त छोटा खेळ होता. मी नक्कीच जिंकेन. मला लवकरात लवकर रेल स्थानकावर पोहोचायचे होते. मला महामार्ग सापडला होता म्हणजे रेल स्थानकही मिळणार. अजूनही सकाळ झाली नव्हती. माझे अंग थन्डीने गारठून गेले होते. मी तिथे आणखीन राहू शकत नव्हते. लवकरात लवकर रेल पकडायची होती. म्हणूनच सर्व दूर सारून मी पुन्हा गाड्यांच्या दिशेने चालू लागले. जलद चालण्याचा प्रयत्न करू लागले. बॅगमधील उबदार चादर अंगावर ओढून चालू लागले. कोणी दिसले कि मी त्यांना रस्ता विचारायचे. जाता मला एक घर दिसले. त्या घरामध्ये इतक्या पहाटे प्रकाश होता. मुख्य म्हणजे तिथून सूर ऐकू येत होते. मी अगदी लांबून ते ऐकत होते. खरं सांगायचं तर मला संगीत आजिबात नाही आवडायचे. फक्त संगीतच नाही तर मला कोणतीही कला नाही आवडायची. शाळेत चित्रकलेचा विषय निघताच मला कंटाळा यायचा. जेव्हा स्नेहसंम्मेलन यायचे तेव्हा तर 15 दिवस खुशाल माझ्यासाठी सुट्टी असायची. त्यानन्तरही कुठेही कसले कार्यक्रम असले तर मी तिथे फक्त माझ्या प्रियकरांसाठी जायचे. ते सुद्धा फक्त मला पाहण्यासाठी यायचे. कारण मी सुंदर होते. माझे सुंदर असणेच माझ्यासाठी खूप  होते. ही कला वगैरे माझ्यासाठी नव्हतीच आणि मीही कधीही तिच्यासाठी नसेल. तो संगीताचा आवाज माझ्या डोक्यात जाऊ लागला. नशीब लागतं कधी कधी गोड आवाज प्राप्त करायला. त्याहूनही जास्त नशीब लागतं, ते असं सुंदर रूप मिळवायला. ज्यांच्याकडे ते नाही त्यांनाच अशी कलेची गरज लागते आणि मला अश्या व्यक्तींचा अतोनात राग आहे. किती ती मेहनत! इतक्या पहाटे हे सूर जुळवायला गाणे. फक्त गळ्यातून वेगवेगळे आवाज काढून काय होणार!
शक्य तितक्या दूर जायचा मी प्रयत्न करत होते. शेवटी मला काही वृत्तपत्र वाटणारी आणि भल्या पहाटे चहाची टपरी चालवणारी काही मंडळी भेटली. मी त्यांना जवळचे स्थानक कुठे होते ते विचारले. तिथून काहीच अंतरावर ते स्थानक होते. मी एकटीच घराबाहेर पडूनही हरवले नव्हते म्हणून मला स्वतःवर गर्व वाटत होता. अभ्यासाच्या बाबतीत हुशार नसले तरीही जगाच्या व्यवहारात मी हुशार होते. ते स्थानक जवळ येत असल्याचे पाहून मला गड जिंकल्या सारखे वाटू लागले. अजूनही वेळ गेली नसावी. माझ्याकडे घड्याळ नव्हते परंतु फोन होता. त्यात 5 वाजून 5 मिनिटे झाली होती. मी जलद पाऊले टाकू लागले. प्रत्येक पाउलांसोबतच माझी बॅग जड होत होती. काहीही झाले तरीही मी ती बॅग सावरत एका स्थानकाकडे पोहोचले. कोणालाही रस्ता न विचारता मी त्या स्थानकावर येऊन पोहोचले. मोबाइलमध्ये 5 वाजून 10 मिनिटे झाली होती. मी तिकीट काढले. त्यावर आमच्या दोघांचीही नाव होती. आमच्या दोघांचं नाव पुन्हा एकदा सोबत वाचताना मला त्याची आठवण आली. मला भावंडं नव्हती. त्यामुळे घरात मी लाडाची लेक असायला हवी होती. माझ्यावर बहरणारं प्रेम कोणतंही दुभांगणार नव्हतं म्हणून! परंतु मूळतः माझ्या आई वडिलांमध्ये प्रेम नावाचा गुणच नव्हता. त्यामुळे ते दुभन्गणारं नव्हतं. त्याहूनही अधिक ते बहरणार सुद्धा नव्हतं. माझ्यावर प्रेम करणारं कोणीही नव्हतं. म्हणून वयात आल्यापासून मी सतत कोणत्याही रूपात मिळणारं प्रेम मी बाहेर या जगात शोधत होते. नशिबाने मी सुंदर होते. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारे व्यक्ती शोधणे माझ्यासाठी कठीण नव्हतं. त्यात हा प्रियेश! तो माझ्याहून 3 वर्षाने मोठा होता. आमची ओळख सुद्धा 3 वर्षाचीच होती. त्याच्यामते त्याने मला एका दुकानात पहिले होते. जेव्हापासून त्याने मला पाहिले होते तेव्हापासूनच त्याला मी आवडू लागली. पहिल्या क्षणी प्रेम होतं का?  कोणाचंही मन न दुखावता त्याचं प्रेम मला नाकारायचं होतं परंतु ते मला जमलं नाही आणि मीच त्या प्रेमात अडकून पडले. स्थानकावरच्या बाकावर बसून मी आमचाच विचार करत होते. त्याचं हसू, माझ्यावर उगाचच त्याचा हक्क गाजवणे. कधीतरी रागात असल्यावर माझी समजूत काढणं हे कसं त्याला अगदी बरोबर जमायचं. हे सर्व तो कसा करायचा मला समजलेच नाही. जर समजले असते तर मी त्याची समजूत काढली असती आणि तो आज माझ्यासोबत इथे असता. हे शहर सोडून जाताना माझा हात धरला असता. ट्रेन येण्यासाठी आणखीन 5 मिनिटे उशीर होता. मला माझे ध्येय अगदी समोर दिसत होते परंतु ध्येय समोर येता येता अडथळे सुद्धा येतात. माझे सख्खे काका मला रेल्वे पुलाच्या वरून चालत असताना दिसले. मी हे कसं विसरू शकते कि ते रेल्वे कर्मचारी आहे. स्थानकावर अशी त्यांची भेट होणं काही नवीन नव्हते. परंतु सकाळ व्हायच्या आधीच मी जर त्यांना इथे दिसले तर? मग काय होणार? विचार करूनच माझ्या सर्वांगाला थरकाप सुटला. मी माझ्या बाबांना आणि आईला घाबरत होते. जर असा दगा देऊन मी पळून जायचे त्यांना समजले तर ते मला नेहमीसाठी खोलीत मला डाम्बवुन ठेवतील. मला ते नको होतं म्हणून कसलाही विचार न करता मी बॅग घेऊन स्थानकाच्या मागच्या बाजूला गेले. मागच्या बाजूला जाताच नको ती घाणेरडी वस्ती दिसायला लागली. ती वस्ती गरिबांची तर होतीच परंतु कोणालाही नापसन्त असणाऱ्यांची होती. मला काहीच सुचेना. चेहरा झाकत, अंग झाकत मी स्थानकाच्या अगदीच बाहेर पोहोचले. माझ्या गाडीची घोषणा चालू झाली. मला स्थानकाच्या बाहेरून माझे काका अगदीच रेलच्या दिशेने उभे असलेले दिसले. पहाटेची वेळ असल्याने तिथे जास्त प्रवासी किंवा कर्मचारी सुद्धा नव्हते. माझा बेत लवकरच फसू शकला असता. मी तिथेच विचार करत थांबले.
कठीण होते! माझ्यासाठी ते फार कठीण होते. ते ध्येय हातात येता येता निसटून गेलं होतं. जेव्हा ती गाडी आणि काका स्थानकावरून नाहीसे झाले तेव्हा मी पुन्हा त्या स्थानकाकडे गेले. माझी ट्रेन सुटली होती. तिकीट सुद्धा अमान्य झाले होते. आता तिथे थांबणे माझ्यासाठी योग्य नव्हते. 5 वाजून 20 मिनिटे झाले होते. काहीही करून मला तो जिल्हा सोडायचा होता. पुढील ट्रेन कधी असावी मला माहीत नव्हते. कारण तिथे 10 मिनिटे कोणतीही घोषणा झाली नाही. या स्थानकावर काहीही होऊ शकणार नाही हे मला समजले. मी पुन्हा पुलावर गेले तिथं काही स्त्रिया पुढील स्थानकावर जाण्याच्या गोष्टी करत होत्या. त्या कामगार होत्या. पुढील स्थानकावर त्यांना कामाला जायचे होते. हात मजुरी करणाऱ्या त्या स्त्रिया होत्या. नक्कीच स्थानकावर त्यांचे काही काम असावे. त्यांचे कपडे थोडे मळके होते आणि भाषा आमच्या मराठीसारखी नव्हती. मी त्यांचा गुपचूप पाठलाग करून पुढील स्थानकावर जायचा निर्णय घेतला. पुन्हा आपला चेहरा पूर्णतः झाकून मी रमत गमत त्यांचा पिच्छा करू लागले. त्या 30 तासात मी आमचा जिल्हा पाहिला असावा. कधी डोंगर तर कधी मंदिर! कधी विहीर तर कधी हेवा वाटावा असा बंगला!  हिवाळ्याच्या दिवसांमुळे अजूनही दिवस उजाडला नव्हता. त्या अंधाऱ्या रस्त्यावर मी त्यांचा हळूच पाठलाग करत हे सारे अनुभवत होते. त्यांच्यासोबत चालता चालता मी खूप दूर वर पोहोचले होते. अगदीच भर दुपारीही एकटी वाटावी अशी ती वाट होती. रातराणीचा सुगन्ध त्या रस्त्याची शोभा वाढवत होता. मी त्यांच्या पाठलाग करत आहे हे त्यातील एका स्त्रीला कळून चुकले. तिने मागे वळून पाहिले. खरं सांगायचं तर मला तेव्हा भीती वाटू लागली. तिच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता. जणू तिला माझ्या असण्या नसण्याने काहीच घेणं देणं नव्हते. ती कोणाला काही बोलली सुद्धा नाही. फक्त…; एक दुचाकी भरवेगाने माझ्या अंगावर येणारच होती आणि माझे लक्ष विचलित झाले. इतक्या पहाटे मला एकटीलाच पाहून तो दुचाकी स्वार घाबरला आणि अश्या भरवेगाने अंगावर येण्यासाठी माझी माफी मागत होता. मी तर तशी आधीपासूनच चिडकी होते. त्याच्या एक कानाखाली मारावी असे मनात आले. परंतु स्वतःला आवरले आणि फक्त शब्दांचा मारा केला. 'काय रे मूर्खां, चालवता येत नाही तर कशाला शहाणपणा करतो? खिशात नाही झ्याट आणि कॉलर ताट! निघ इथून चल!' अगदीच थरथरत तो माफी मागत मला म्हणाला, 'ताई माफ करा पण इथे कुठे चालली आहे तू? हा रस्ता पोलिसांनी केव्हाच बंद केला होता. भरवेगाने गाडी आणल्याबद्दल क्षमा असावी. परंतु, तू तिथे जाऊ नको. पोलिसांचा तपास अजूनही चालू आहे. तुला मी तुझ्या घरी सोडवून देऊ का?' सतत माझ्या पायाकडे बघत तो म्हणाला. काही क्षणा आधी त्या स्त्रीला घाबरलेली मी पुन्हा निडर झाले आणि अगदीच माझ्या भाषेत त्याला उत्तरले, 'निघ इथून, मी कुठेही जाईन. त्या स्त्रिया, पुढील स्थानकावर जाणार होत्या. चक् चक्! मला घरी नाही जायचे आहे. तू निघ इथून.' त्या वाटेकडे पुन्हा घाबरून पाहता त्याने माझ्या पायाकडे पाहिले आणि पुन्हा भरवेगाने दुचाकीवर निघून गेला. हा सारा किस्सा फक्त 2 ते 3 मिनिटाचा असावा, पण त्यात त्या स्त्रिया अगदीच हवे सारख्या अदृश्य झाल्या होत्या. फक्त त्याच होत्या ज्या मला पुढील स्थानकाकडे नेऊ शकणार होत्या. आजूबाजूला काळा कुत्रा देखील नव्हता. आता मलाच निर्णय घ्यावा लागणार. मी त्या सुगन्धी एकांत वाटेत शिरले. ती नागमोडी वाट पुढे जाऊन आभासांनी भरू लागली. कधी कुठून साप यावा किंवा कोणता हिंस्र प्राणी; काही नाही तर मनुष्य रुपी दानवच! कधी नव्हे ती वीणा आता घाबरू लागली होती. एकदा पाण्यात उडी टाकली की हात पाय मारायलाच लागतात.  ती एकांत पसन्त करणारी वाट आता भयावह आणि कोणाला तरी सोबत म्हणून शोधत होती. तो रातराणीचा सुगंध जणू नष्टच झाला. कसलातरी दुर्गन्ध हवेत पसरत होता. माझ्या मनात आले कि आपण परत फिरू या. खरं सांगायचं तर माझे पाय मला साथ देत नव्हते. मी चालतच होते. जेव्हा मी स्थानकापासून हा प्रवास चालू केला होता तेव्हा मी एकटीच नव्हते. माझ्यासोबत त्या स्त्रिया होत्या. मी त्यांचा पाठलाग करत होते. परंतु आता मी कोणाचा पाठलाग करत आहे? मी कुठे आणि का चालली आहे? 'मी का चालले होते?' हा प्रश्न तर मी आता विचारायलाच नको होता. नवीन आयुष्याच्या शोधात निघालेली वीणा आज अनोळखी अंधारलेल्या विहिरीत हरवून तर नाही ना जाणार? मला काहीच समजत नव्हते. मी तेव्हा इतकी चालले होते की माझे पाय अगदीच दुखायला लागले. आणखीन 2 पाऊलसुद्धा नको. परंतु हे पाऊल माझ्या मनाचं ऐकतच नव्हते. माझ्या खांद्यावर माझ्याच बागेचे ओझे होते. ते खांद्याचं दुखणं तरी परवडले होते पण हे पायाचे दुखणे नाही. मी चालत चालत माझा मोबाईल काढला. त्याचे बटण दाबले तेव्हा त्यात फक्त 5 वाजून 55 मिनिटे झाले असावे. मला आश्चर्यासोबतच भीतीदेखील वाटू लागली. मी माझी ट्रेन 5 वाजून 20 मिनिटाने चुकवली होती. त्यांनतर मी 10 मिनिटे तिथेच घालवले होते म्हणजे 5 वाजून 30 मिनिटे त्यांनतर मी त्या स्त्रियांचा 20 ते 25 मिनिटे तरी पाठलाग केला असावा म्हणजे 5 वाजून 50 किंवा 55 मिनिटे! मग मी इतके चालले तो वेळ गेला कुठे? मी चालत असताना वेळ थांबली होती का? मी कोणत्या जगात होते? माझे सुजलेले पाय मला सांगत होते कि मी खूप दूरवर चालले होते मग त्याला लागणारा वेळ कुठे गेला? हे सारं स्वप्न तर नाही? मी घर सोडलेच नाही का? मी स्वप्नातच आहे का? नाही तसे नव्हते. माझ्या खांद्यावरचे ओझे, पायाचे खरेखुरे दुखणे आणि स्वतःला काढलेला चिमटा हे सारं सत्य असल्याचे सांगत होते. मी घाबरून थकणारच होते की मला त्या स्त्रिया पुन्हा दिसल्या; त्याच बरोबर दूरवर एक शांत स्थानक होते. तो भयावह रस्ता शेवटी सम्पला होता. मला एक कच्चा का होईना परंतु एक रस्ता तरी दिसला. एखाद छोट गाव असावं ते. नाही! गावाच्या बाहेर, खूप बाहेर. मी त्या स्त्रियांकडे पाहिले. त्या स्त्रीने सुध्दा मला पाहिले. जणू डोळ्यानेच तिने मला 'तू इथे काय करते?' असं विचारलं असावं. त्यातील दुसऱ्या स्त्रिया माझ्याकडे बघून विलक्षण हसल्या. सर्वांना गर्वाने दुर्लक्षित करत मी त्या स्थानकावर जाऊन शेवटी माझे पाऊल टेकवून सुटकेचा निश्वास घेतला. तिथे मला ट्रेनचा आवाज येऊ लागला. असं वाटत होत की आता ट्रेन येथील रुळावरून जाईन. तो आवाज जवळ जवळ आणि आणखीन जवळ येत गेला. परंतु तो सुद्धा भास निघाला. तिथे त्या स्त्रियांचा पाठलागापासून फक्त तो गाण्याचा मला न आवडणारा कर्कश्य आवाजच खरा होता बाकी सर्व फक्त एक भास वाटत होता. मला काहीच समजत नव्हते. मी जिथे होते ते एक निर्जीव स्थानक होते. जिथे माझे कान, डोळे आणि हृदय फक्त सहवासासाठी तरसले होते. मी ज्याप्रमाणे इथे आले होते त्याचा विचार करता इथून निघणे मला कठीण वाटत होते. विचार करता करता माझा डोळा लागला. भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा या मणीसारखे मी तिथेच झोपले. कधीही जमिनीवरही न बसणाऱ्या राजकुमारीसारखी राहणारी वीणा आज स्थानकावर मुंगळ्यांच्या मध्ये, हिवाळ्याच्या कडाकाच्या थन्डीत फक्त एक चादर अंगावर घेऊन झोपून राहिली. कोणताही विचार न करता आणि कोणतेही स्वप्न न पाहता मी फक्त झोपले. आणि मी जेव्हा उठले तेव्हा मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच झाला नाही.

24 - आठवणीतील तासTahanan ng mga kuwento. Tumuklas ngayon