आता रात्र झाली होती. वांद्रे वरळी सी-लिंक ब्रिज जवळच समुद्रात एक जहाज होते. ते म्हणजे एक तरंगते हॉटेल होते. "ओशन वाईड डायनिंग" लग्झरी फ्लोटिंग हॉटेल! जहाजावर काही भागांत नाच गाणे सुरू होते. एक सुंदर स्त्री संगीताच्या तालावर मादक हालचाल करत बेली डान्स करत उपस्थित मंडळींना घायाळ करत होती. धनिक लोक या जहाजावर सेलिब्रेशन आणि एन्जॉय करण्यासाठी आलेले होते.
वांद्रे वरळी सी-लिंक ब्रिजच्या बरोबर खालच्या बाजूला असलेल्या समुद्राच्या पाण्यातून पाच काळे विंचू पाणी झटकत झर्रकन वर उडाले आणि पुलाच्या खांबांवरून सरपटत जाऊन वर सरकायला लागले. नंतर ते पुलाच्या खालच्या बाजूला उलटे होऊन चिकटले आणि हळूहळू वर सरकू लागले. सरकत सरकत ते पुलाच्या वरच्या बाजूला गेले.
सुजित लहाने याची व्हॅन वेगाने त्या पुलावरून प्रवास करत होती आणि मागे दोन कार थोड्या अंतराने येत होत्या. व्हॅनमध्ये मागच्या बाजूला सुजित आणि अमित त्या उपकरणांच्या जवळ बसले होते. पुढे ड्रायव्हर जवळ अमितचे वडील होते तर मागच्या त्या दोन कारमध्ये शिक्षक मंडळी होती.
ते पाचही विंचू आता रस्त्यावर आले. पैकी एक विंचू खूप मोठा होता. ते सर्व खरे विंचू नव्हते. टणक धातूने बनवलेले रोबोटिक विंचू होते. सुजितची व्हॅन त्यांच्या जवळ येताच गाडीखालच्या रस्त्यावरून ते व्हॅनच्या खालच्या बाजूने उलट चिकटले. मोठा वगळता इतर चारही विंचू आपापल्या नांग्यांनी गाडीचा खालचा टणक भाग कोरून चिरू लागले तेव्हा ठिणग्या उडू लागल्या. त्यांच्या प्रयत्नातून गाडीला खाली मोठे छिद्र पडले. हे व्हॅनच्या खालच्या बाजूला घडत होते आणि इतक्या वेगाने घडत होते की व्हॅन आणि कारमधल्या कुणालाही ते समजलेच नाही.
पाचवा विंचू डीटोनेटर होता. गाडीखाली आधीच लावलेल्या स्फोटक पदार्थाला त्याने कार्यरत केले आणि क्षणार्धात गाडीत प्रचंड स्फोट होऊन ती पुलावर दोनशे फूट वर हवेत उडाली. व्हॅन हवेत उलटीपालटी होत असल्याने व्हॅनच्या खालच्या बाजूला विंचूंनी पडलेल्या मोठ्या भगदाडातून सुजितने बनवलेले उपकरण निघून तेही हवेत उडाले आणि प्रचंड वेगाने खाली पाण्यात जाऊन पडले. व्हॅन उलटीपालटी होत होत पुलावरच्या रस्त्यावर मागच्या दोन्ही कारवर वेगाने आदळली. प्रचंड आवाज झाला. दोन्ही कारनी पेट घेतला. ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागले. ती व्हॅन तिथून पुन्हा रस्त्यावर आदळून हवेत उडाली आणि स्वत:भोवती गरगर फिरत खाली समुद्रात पाण्याकडे जाऊ लागली. मागच्या दोन्ही कार आणखी मागच्या गाड्यांवर आदळल्या. पुलावर एकच हलकल्लोळ माजला.
YOU ARE READING
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Science Fictionहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!