रात्री झोपण्यापूर्वी सहज चॅनेल बदलले असता सेट मॅक्सवर "जानी दुश्मन- एक अनोखी कहानी" सुरु होता आणि गुहेत तपस्या करत असलेल्या अमरीश पुरीच्या नकळत मनीषा कोईराला आणि अरमान कोहली हे प्रेमात धुंद होऊन गुहेच्या छतावर जोराजोरात पाय आपटत नाचत होते आणि गाणे म्हणत होते- "जिंदगी मैं तुझी पे लुटाऊंगा, मैं तो मर के भी तुझको चाहूंगा, आजा ओ sss आजा!" नंतर गुहेला छतावर मोठे भगदाड पडते आणि ते दोघे अमरीश पुरीच्या अंगावर पडतात मग तो त्यांना शाप देतो आणि त्यांची ताटातूट होते मग पुनर्जन्म वगैरे!
उदित नारायणच्या दर्दभऱ्या आवाजाने भारलेलं ते गाणं ऐकून सायलीला सूर्यप्रतापसोबत घालवलेले क्षण आठवले, तिचे मन अचानक मागचे सगळे आठवून नकारात्मक विचारांकडे ओढले गेले. तिने रिमोटने टीव्ही तडकाफडकी बंद केला आणि डोके दाबून धरले, "ओह गॉड! काय हे? हे बॉलिवूडवाले प्रेमकथांवर वर्षानुवर्षे असंख्य चित्रपट बनवतच राहतात, आणि प्रेमभंग झालेल्यांच्या जखमांच्या खपल्या निघतील अशी दर्दभरी गाणी बनवतच राहतात!"
"झोपेच्या गोळ्या खरं तर मी टाळायला हव्या. मी डॉक्टर आहे, त्याचे दुष्परिणामही मला माहिती आहेत. मी त्या घेणे टाळत आले असले तरीही आता मला वाटतंय की त्या घ्यायला हव्यात!"
तिने ड्रावरकडे हात नेला आणि ते ओढायला लागली तेवढ्यात तिचे हात हलके झाले आणि हळूहळू तळहात, पंजे, मनगट हलके व्हायला लागले आणि त्याजागी तिला हिरव्या रंगाचे 0 आणि 1 हे बायनरी आकडे दिसायला लागले. तिचे शरीर संपूर्णपणे हलके पोकळ होत जाऊन काळसर पार्श्वभूमीवर हिरवे 0 आणि 1 हे असंख्य आकडे खालून वर, वरून खाली, आणि इकडून तिकडे असे पाण्यासारखे वाहत होते. समोर हातात एक बाहुली घेतलेली आणि असंख्य मेमरी कार्ड्स, हार्ड डिस्क, मॅग्नेटिक टेप्स, मेंदूतील नसा आणि विविध भाग, न्यूरल नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट यासारख्या अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम मेमरी स्टोरेज डिव्हाईसने बनलेली नग्न स्त्री आकृती उभी होती. आणि आजूबाजूला सगळीकडे फक्त विविध अक्षरे, आकडे तरंगत होती.
YOU ARE READING
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Science Fictionहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!