सकाळीच रणजित यांचा सुनिलला फोन आला.
"ताबडतोब नाश्ता आटोप आणि नरीमन पॉईंटला ये. तिथून मरीन ड्राईव्हला फिरत फिरत तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे!"
मरीन ड्राईव्ह हा मुंबईतील रस्ता नरीमन पॉईंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटीला संपतो. समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय आहे. मुंबईचे सौंदर्य बघायचे तर या रस्त्याला पर्याय नाही. मुळात हा रस्ताच मुंबईराणीच्या गळ्यातील हार बनून तिचे सौंदर्य वाढवतोय, क्वीन्स नेकलेस बनून!
सीएसटी फास्ट लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्याने तो सीएसटीला उतरला आणि टॅक्सीने नरिमन पॉइंटला आला. ट्रेन मध्ये बसला असतांना खिडकीतून बाहेर बघत त्याने त्याची दूरदर्शन शक्ती वापरण्याचा प्रयत्न केला पण सगळ्या वस्तू एकमेकांत मिक्स होऊन त्याला सगळी भेसळ मिसळ दिसायला लागली, बुब्बुळे छऱ्याच्या गेमसारखी गरागरा डोळ्यात फिरत आहेत असे त्याला जाणवले म्हणून त्याने प्रयत्न तातडीने रद्द केला!!
ट्रायडेंट हॉटेलसमोर उतरला तेव्हा त्याला आता एसएसपी म्हणजे सिनियर सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस झालेल्या रणजित यांची पांढऱ्या कलरची व्हॅन उभी असलेली दिसत होती. त्यातून सिव्हिल ड्रेस मधले रणजित आणि सोबत आणखी दोन युनिफॉर्म मधले पोलीस उतरले आणि एक जण विना युनिफॉर्म गाडीतच बसलेला होता. नुकतीच रणजित यांना बढती मिळाली होती हे सुनिलला माहिती होतं.
सुनिल आणि रणजित मरीन ड्राईव्हच्या रस्त्याला चालू लागले. त्यांच्या पासून थोडे अंतर ठेऊन दोघे पोलीस त्यांच्या मागे मागे सुरक्षेसाठी चालू लागले.
"मी तुला अर्जंट आणि अशा सार्वजनिक ठिकाणी बोलावून घेतले त्याला कारणही तसेच आहे, सुनिल!"
"काय झाले मामा?"
"मी जी तुला माहिती सांगणार आहे ती लीक होऊ नये असे मला वाटते म्हणून अशा ठिकाणी मी तुला बोलावले आणि मीही सिव्हिल ड्रेस मध्येच आहे. मागे स्टेशनवर आपण एका माणसाला पकडलं होतं तुला आठवत असेलच!"
YOU ARE READING
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Science Fictionहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!