जहाजावर दुसऱ्या दिवशी सारंगला सुनिलने त्याच्या घरी पाठवले आणि तो स्वतः नजरेने त्याच्या घरातील दृश्य पाहू लागला. मग सारंगजवळील फोन वरून तो आधी आईवडील मग भाऊ, वहिनी आणि नंतर आत्या यांचेशी बोलला आणि सत्य परिस्थिती सांगितली. त्याला घरची खूप आठवण येत होती. त्यांना प्रत्यक्ष बघून त्याला बरे वाटले, मात्र घरचे फक्त फोनवरून सुनिलशी बोलू शकत होते त्याला बघू शकत नव्हते. सायली आणि निद्राजीता या दोघीही आपल्या घरी फोनवर संपर्क साधून होत्या. दोघींच्या कुटुंबियांना सुनिलने आपल्या दृष्टीने बघून त्याबद्दल दोघींना सांगितले आणि सुनिलही त्यांच्या कुटुंबियांशी बोलला.
सायलीला त्याने आधी जहाजावर लग्नासाठी रीतसर मागणी घातली आणि मग तिच्या आरक्त होऊन लाजलेल्या चेहऱ्यासह मिळालेल्या होकारानंतर फोनवरून तिच्या कुटुंबातील मंडळींनासुद्धा लग्नाचा निर्णय दोघांनी सांगितला. या सर्वांच्या कुटुंबियांना गोपनीयतेची शपथ दिली गेली होती की सायली, निद्राजीता आणि सुनिल हे जे काही काम करत होते त्याबद्दल कुणालाही काहीही सांगायचे नाही. मग जहाजावर त्यांनी सर्वांसमोर सात फेरे घेऊन छोटासा लग्नविधी आटोपला. त्याचे फोटो आणि व्हीडिओ नंतर घरच्यांना पाठवला.
तसेच गेल्या काही दिवसांतील सर्व वेगवान घटनांनंतर सुनिल रात्री विविध शक्यतांचा विचार करू लागला, "हॉस्पिटलमध्ये ती नर्स सायलीला असेच इंजेक्शनमधील स्प्रेचा वापर करून, गायब करून छोट्या पेशीसमूहात रूपांतर तर करणार नव्हती ना? जसे पप्पूचे झाले! जपानचा तो रोबोट एक्स्पर्ट सायंटिस्ट बाथरूममध्ये अशाच पद्धतीने तर गायब झाला नसेल ना? व्यक्तींना गायब करून त्यातून उरलेल्या त्या पेशीसमूहाचे ते लोक काय करत असतील? क्लोन की आणखी काही? त्या पेशी समूहातून त्यांना त्या व्यक्तींच्या जीवनाची सगळी माहिती मिळत असावी का? मला पडलेले ते दिवास्वप्न हेच दर्शवत होते का? त्या स्वप्नानुसार जगातले सजीव हळूहळू अशा रितीने गायब होणार होते का? यामागे नेमके कोण हे आणि त्यांचा उद्देश्य नेमका काय आहे?"
YOU ARE READING
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Science Fictionहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!